Monday, January 31, 2011

…जेव्हा आपले जग 700 कोटींचे होईल...

जगाची लोकसंख्या वाढली पाहिजे की कमी झाली पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर माणसाला अद्याप मिळालेले नाही. चीन हा जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि तिच्या वाढीचा वेग कमी व्हावा म्हणून ‘एक कुटुंब – एक अपत्य’ हे धोरण चीनने गेले काही वर्षे अवलंबले. पण त्याचे विपरित परिणाम चीनमध्ये आता जाणवू लागले आहेत. एकाच अपत्याला जन्म दिल्यावर त्याला जगात एकटेपणाचा सामना करावा लागतो शिवाय त्या अपत्याचा दुर्दैवाने मध्येच मृत्यू ओढावला तर आईवडिलांना एकटेपणाला सामोरे जावे लागते, हे आता लक्षात यायला लागले असून चीनने हे धोरण काहीसे शिथिल केले आहे. जगात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतात कुटुंब नियोजनाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली त्याला आता चार दशके उलटली आहेत. लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यात भारताला अंशतः यश मिळाले आहे. तिकडे युरोप खंडात आणि ऑस्ट्रेलियामध्ये लोकसंख्या सातत्याने कमी होते आहे. ऑस्ट्रेलियात आणि युरोपीयन देशांमध्ये बाहेरील देशांच्या नागरिकांचे स्वागत केले जाते, त्याचे कारणच मुळी लोकसंख्या वाढून अर्थव्यवहार सुरळीत चालू राहावेत, हे आहे. भारताच्या 120 कोटींपैकी एक कोटी नागरिक आजच जगाच्या कानाकोपर्‍यात नोकरी व्यवसाय करत आहेत आणि त्याचे आपण स्वागतच केले पाहिजे. पुढील दशकात तर ही संख्या आणखी वाढू शकते आणि वाढलीच पाहिजे.

लोकसंख्या कमी असलेले देश मंदीवर लवकर मात करू शकत नाहीत, मात्र लोकसंख्या अधिक असलेले देश मंदीतून लवकर बाहेर पडतात, असे एक अनुमान 2008 च्या मंदीतून काढण्यात आले. त्याचे कारण मंदीतून बाहेर पडण्यासाठी नवा ग्राहक निर्माण व्हावा लागतो आणि तो क्रयशक्ती असणारा लागतो. तसा ग्राहक यावेळी भारत आणि चीनमध्ये होता. त्यामुळे चीन आणि भारताचा विकासदर मंदीनंतरच्या दुसर्‍याच वर्षी जगात सर्वाधिक आहे. याचा अर्थ लोकसंख्या जास्त असल्याचा भारताला यावेळी फायदा झाला. उदारीकरणानंतर आपल्या देशाच्या निम्नमध्यमवर्गाचे आणि मध्यमवर्गाचे दरडोई उत्पन्न वाढले आणि तो ग्राहक म्हणून मंदीतून बाहेर पडण्यास उपयोगी ठरला. चीनमध्येही असेच झाले. मात्र जेथे मुळातच लोकसंख्या कमी आहे, ते युरोपीय देश अजूनही अर्थव्यवस्थेची पटरी दुरूस्त होण्याची वाट पाहात आहेत. अर्थात येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे भारत आणि चीनमध्ये खालच्या थरातील नागरिकांच्या वाट्याला ज्या प्रकारचे लाजीरवाणे जीणे आले आहे, ते अजिबात भूषणावह नाही. त्याची आपल्या सरकारला आणि सुजाण श्रीमंतांना लाजच वाटली पाहिजे.

लोकसंख्येची आज या पद्धतीने चर्चा करण्याचे कारण म्हणजे जग लवकरच म्हणजे येत्या नऊ महिन्यात सातशे कोटी लोकसंख्येचा टप्पा पार करणार आहे. म्हणजे हा टप्पा पार करणार्‍या बालकांनी मातेच्या गर्भात प्रवेश केला आहे. सातशे कोटींचा टप्पा पार करताना भारताची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. भारतात दर मिनिटाला जगात सर्वाधिक म्हणजे 51 बालके जन्म घेतात एवढेच नव्हे तर फक्त उत्तरप्रदेशचाच विचार करावयाचा तर तेथे मिनिटाला 11 मुलांचा जन्म होतो. चीन आणि नायजेरिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा ही संख्या जास्त आहे! चीनची लोकसंख्या आज 131 कोटी आहे म्हणजे भारतापेक्षा 11 कोटी अधिक. त्यामुळे भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्यास आता फक्त दोन – अडीच दशके पुरेशी आहेत.

लोकसंख्यावाढीचा जगाचा हा प्रवास पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते की लोकसंख्यावाढीचा वेग सतत वाढ्त चालला आहे. जगात आज दर मिनिटाला 267 बालकांचा जन्म होतो. म्हणजे दर तासाला 16000 आणि दर दिवसाला 3 लाख 84 हजार! हा वेग कसा वाढत गेला यासंबंधीची एक आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली असून धक्कदायक आहे. जगात 1800 साली 100 कोटी लोक राहत होते. 100 कोटी लोकसंख्या होण्यास अडीच हजार वर्षे लागली, असे मानले जाते. नंतर हा वेग इतका वाढला की पुढील 127 वर्षांतच म्हणजे 1927 साली जगाची लोकसंख्या 200 कोटी झाली. पुढच्या 100 कोटींसाठी तर केवळ 33 वर्षे लागली आणि 1960 साली ती 300 कोटी झाली. 1974 साली म्हणजे केवळ 14 वर्षांत ती 400 कोटी झाली. नंतर मात्र हा वेग किंचित मंदावला आणि पुढील 13 वर्षांनी म्हणजे 1987 साली 500 कोटी तर नंतर 12 वर्षांनी म्हणजे 1999 साली 600 कोटी माणसांचे जग झाले. आता त्यापुढील 12 वर्षांत म्हणजे या वर्षअखेरीस किंवा 2012 च्या सुरवातीस जग 700 कोटींचे होईल! पुढे मात्र हा वेग काहीसा कमी होईल, असा अंदाज आहे.

जग यामुळे चिंतेत पडले आहे की ही सर्व वाढ प्रामुख्याने चीन, भारत, पाकिस्तान, बांगला देश, इंडोनेशिया अशा आशियातील देशांमध्येच होणार आहे. आजच जगातील 60 टक्के लोक चीन आणि भारताचा समावेश असलेल्या आणि अविकसित किंवा विकसनशील देश असलेल्या आशिया खंडात राहतात. त्यामुळे आशिया खंडातील पाणी, अन्न, तेल, खनिजे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड ताण येणार आहे. आणखी एक विसंगती म्हणजे जगातल्या याच भागात श्रीमंतांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे टोकाची विषमताही आशिया खंडातही पाहायला मिळते आहे. टाईम नावाच्या जागतिक मासिकात जगासमोरील प्रमुख प्रश्नांसबंधी एक निबंधस्पर्धा घेण्यात आली. त्यात पहिला क्रमांक आलेल्या निबंधाचा विषय आशियातील वाढती विषमता हा आहे. दहशतवाद आणि नक्षलवादाचा जन्मच मुळी याप्रकारच्या विषमतेत होतो. आजच दहशतवादाचा सर्वाधिक धोका आशिया खंडातच पाहायला मिळतो आहे. चीन आणि भारतासारख्या देशाचा वेगाने होत असताना दहशतवाद आणि नक्षलवादाला शांत करण्याचे काम पुढील दशकांना करावे लागणार आहे. मंदीपासून वाचविणारी वाढती लोकसंख्या दहशतवाद आणि नक्षलवादाला जन्म देते , हे भान ठेवावे लागेल शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराविषयी व्यापक धोरणांचा अवलंब करावा लागेल.

सातशे कोटी लोकसंख्या होताना जगाला पुन्हा महात्मा गांधींची आठवण करावी लागेल. महात्मा गांधींनी म्हटले आहे...निसर्गाने सर्वांना पुरेल एवढे भरभरून दिले आहे, मात्र अतिलोभ कराल तर यातले काहीच पुरणार नाही. भौतिक प्रगती कितीही केली तरी याचे भान जगाला ठेवावेच लागणार आहे.

- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com