Thursday, February 3, 2011

जागर - विवेकाचा की अविवेकाचा?

जगातले शेवटचे वर्तमानपत्र प्रसिद्ध होण्याचा दिनांक जाहीर करण्याची घाई अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये केली जात असताना भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये वर्तमानपत्रांचे खप वाढत चालले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र ही वाढ गुणात्मक न होता केवळ संख्यात्मक होते आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. एक गोष्ट सातत्याने सांगितली जाते आहे आणि ती म्हणजे भारतात मिळणारी वर्तमानपत्रे जगात सर्वात स्वस्त आहेत. हे असे का आहे, याचे गणित असे आहे की भारत हा जगातला दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे आणि या 120 कोटी लोकांमध्ये 30 कोटी मध्यमवर्ग, 45 कोटी गरीब तर 45 कोटी निरक्षर लोक आहेत. तरीही लोकसंख्येमुळे आणि वाढत्या शिक्षणामुळे वाचकांची संख्या सारखीच वाढतेच आहे. वेगळ्या आणि स्पष्ट शब्दात सांगायचे तर इतर वस्तूंच्या विक्रीसाठी भारत जसा ‘सुपीक बाजार’ बनला आहे, तसाच तो ‘वाचकांचाही बाजार’ बनला आहे. याचा अर्थ असा की ज्याच्याकडे खप जास्त त्याच्याकडे जाहिरातीचे उत्पन्न जास्त, त्यामुळे भारतात भाषिक आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये सध्या खपवाढीची स्पर्धा लागली आहे. ही स्पर्धा आशयाची गुणवत्ता , दर्जेदार मजकूर या दिशेने गेली असती तर भारतीय वाचकांना आणि भारतीय लोकशाहीला मदतच झाली असती. मात्र ही स्पर्धा बहुतांश ठिकाणी संख्यात्मक वाढीची आणि निव्वळ धंदेवाईक स्पर्धा होते आहे, हे नमूद केले पाहिजे.

आता आता म्हणजे नुकत्याच संपलेल्या 2000 – 2010 या दशकात वर्तमानपत्रांमध्ये ‘हे की ते’ असा पेच निर्माण झाल्याचे सांगून आशयच कसा श्रेष्ठ ठरणार, असे सांगितले जात होते. सादरीकरण की मूल्य संवर्धन, एकमार्गी संवाद की दुहेरी संवाद, वरवरचे की मूळातून, बटबटीत की सुटसुटीत असा पेच पडला तर दुसर्‍या मार्गाची निवड केली पाहिजे, असे मान्य केले जात होते. मात्र हे मान्य करता करता अवघ्या दशकात हे पार बदलून गेले असून जे खपवाढीसाठी उपयुक्त त्याचीच निवड, येथपर्यंत वर्तमानपत्रे आणि माध्यमे येऊन पोहचली आहेत. बोलताना किंवा लिहिताना आशयच कसा श्रेष्ठ असे सतत बिंबबिले जाते , मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा आशयघनता मागे पडते आणि सादरीकरण, एकमार्गी संवाद, वरवरचे आणि बटबटीत गोष्टी बाजी मारून जातात. त्याचे समर्थन असे केले जाते की वाचकांना जे हवे तेच आम्ही देत आहोत. जसे चित्रपट निर्माते प्रेक्षकांच्या मागण्या मान्य करत असतात किंवा नव्या इंटरनेट माध्यमाने नंग्यानाचाला खुले केले आहे, तसे आता अनेक वर्तमानपत्रांमध्ये ‘मागणीनुसार पुरवठा’ सुरु आहे. म्हणजे आमच्या समाजाची मागणी दुसर्‍या दर्जाची आहे, हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. यात एक तथ्य आहे, ते म्हणजे नव्याने होणारा वाचक हा सुरवातीला वरवरच्या गोष्टींकडे आकर्षक होतो, पण याचा अर्थ असा नव्हे की त्याचे लगेच लांगुलचालन करा. त्याच्या आवडीनिवडीला आकार देण्याचे काम काही वर्तमानपत्रे करु शकतात. मात्र सर्वच एकमेकांचे स्पर्धक झाल्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये लोप पावत चालली असून माध्यमांचे वेगाने सपाटीकरण सुरू आहे. त्यामुळे विविध वर्तमानपत्र किंवा चॅनेलमधील फरक संपत चालला आहे. अक्षरांमागे विचार नाही म्हटल्यावर यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नाही. आणि विचार द्यायचे मानसिक बळ आहे कोणाकडे?

कोणताही लगाम नसलेले जागतिकरण, टोकाचे , सामाजिक हित-अहित न ओळखणारे व्यापारीकरण, पैशांच्या महत्वाचा अतिरेक, जीवघेणा वाढता वेग, श्रमसंस्कृतीचा अपमान करून सेवा क्षेत्रांचा अनिर्बंध विस्तार आणि लक्ष वेधून घेण्यासाठी वाटेल ते मार्ग अनुसरण्याला प्रतिष्ठा ही दिशा बकाल मनोवृत्तीची लक्षणे आहेत. समाज अशी झापडे लावतो तेव्हा माध्यमांनी विवेकाचा जागर करावा, असे आतापर्यंत मानले गेले. आता या बकालपणात कोण आधी बुडी मारतो, अशीच स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत खरेतर माध्यमांनी भाग घ्यायचा नसतो. मात्र तेही या परिस्थितीला वेगवेगळी नावे देत आपली उमेद्वारी जाहीर करत आहेत, याला काय म्हणावे ?

- यमाजी मालकर , ymalkar@gmailcom

No comments:

Post a Comment