Friday, December 3, 2010

नव्या तंत्रज्ञानाची घाई... संकटात नेई !

आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची अनेकांना इतकी घाई झाली आहे, की ते तंत्रज्ञान आपल्या समाजात आताच रूजेल की नाही, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. विशेषतः पाश्चिमात्य देशांकडे पाहून भारतीय समाजाविषयीचे आडाखे बांधणार्‍यांचा सध्या ऊत आला आहे. हे मान्य आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय , त्याच्या स्वीकाराशिवाय पर्याय नाही. जगासोबत राहायचे तर नव्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. मात्र ते सर्व एखादे श्वान मागे लागल्यासारखे आणि पश्चिमेकडे पाहून करण्याची अजिबात गरज नाही. भारतीय गरजा, बहुजनांची मानसिकता आणि येथे असलेली साधनांची कमतरता याचा विचार करता त्यात काही भारतीय बदल करुनही हे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तसा विचार केला न गेल्याने अनेक माध्यमांमध्ये या प्रयोगांचे कसे माकड होते, याचा अनुभव सध्या आपण घेत आहेत. काही वर्तमानपत्रांचे आणि दूरचित्रवाहिन्यांचे अर्थशास्त्र या सोसापायी कोलमडून पडत असून त्याचा प्रचंड ताण त्या त्या ठिकाणच्या मनुष्यबळावर पडताना दिसतो आहे. साहजिकच वाचक, प्रेक्षक आणि श्रोत्यांच्या समोर येणारा आशय ‘क’ दर्जाचा ठरतो आहे.

मुद्रित माध्यमांचा अंत जवळ आला आहे, अशी हाकाटी गेली दहा वर्षे पाश्चिमात्य देशांमध्ये दिली जाते आहे. तीच पोपटपंची भारतात तथाकथित तज्ञ करताना दिसतात. विकसित देशांमध्ये वर्तमानपत्र, पुस्तकांची वाढ थांबली आहे. दूरचित्रवाणी आणि विशेषतः मोबाइल फोन, इंटरनेट हीच त्यांची माहिती मिळविण्याची साधने झाली आहेत. तेथे तसे ते झाले कारण तेथे साक्षरतेचे प्रमाण जवळपास 100 टक्के आहे आणि मूलभूत गरजा भागविण्याच्या चिंतेतून बहुतांश लोक बाहेर पडले आहेत. त्यामुळे आधुनिक साधनांना ज्या पायाभूत सुविधा आणि शिलकी पैसा लागतो, तो त्या समाजात आहे. जीवनाचा वेग वाढविण्यासाठीही साधनसंपत्तीचा भक्कम आधार लागतो, तो त्यांच्याकडे आहे, म्हणून हा बदल तेथे बर्‍याच चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आपल्याकडे असे बदल लोकांची पिळवणूक करून, त्यांना यंत्रासारखे राबवून केले जात आहेत. भारतीय लोकशाही, समाजव्यवस्थेविषयीचे मंथन असे अन्याय्य पद्धतीने होते, हे किती दुर्दैवी म्हणावे लागेल. आपण जे लिहितो, जे बोलतो आणि जे दाखवितो ते आपल्यालाच पटत नाही, मात्र ते तसे करण्याची सक्ती केली जाते, हा पेच या अर्धवट बदलांमधून जन्म घेतो. भारतीय प्रसारंमाध्यमांकडून आपल्याकडे जो आशय सध्या येतो आहे, त्यामध्ये अशी भेसळ आहे. त्यातली बातमी कोणती आणि जाहिरात कोणती, हे कळत नाही. आशयातील सुसंगती कमी होत चालली आहे. बातम्या आणि लेखांमधून ज्या तत्वांचा आणि विचारांचा पाठपुरावा केलेला असतो, त्याचा त्याच्या शेजारच्या जाहिरातीने किंवा एखाद्या खपवाढीच्या योजनेने पराभव केलेला असतो. इतक्या विसंगतीत आपण नेमका काय संदेश देतो, याचे भान तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे राहात नाही.

इंटरनॅशनल न्यूजमेडिया मार्केटिंग असोसिएशन (आयएनएमए) ची एक परिषद नुकतीच दिल्लीत झाली. अशा परिषदांवाली मंडळी कायम ‘मार्केट’च्या शोधात असतात. तशी ही मंडळी मार्केट्च्या शोधात होती. त्यात जगातील बदलांवर बराच उहापोह झाला. एकाने ठासून सांगितले की भारतासह दक्षिण आशियामध्ये आगामी काळात मुद्रित माध्यमांची मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. भारतासारख्या देशात आजही फक्त 17 ट्क्केच लोक वर्तमानपत्र घेऊ शकतात आणि ती आज ना उद्या वर्तमानपत्र वाचणार आहेत, याची आठवण सर्वांना करून दिली. त्यांना वर्तमानपत्रांपर्यंत कसे आणायचे हे मार्केटिंग आता करावे लागणार आहे. तरी एक जण शिंकलाच. त्याचे म्हणणे असे की 2017 ते 2039 या 12 वर्षांत 52 देशांमध्ये वर्तमानपत्रे कायमची बंद होतील! अमेरिकन तज्ञ तर ती तारीखसुद्धा जाहीर करण्याची घाई करतात. तेवढी घाई या महोदयांनी केली नाही.

ही घाई मला अनावश्यक वाटते. कोणी सांगा, वाचण्यासाठी वर्तमानपत्रे आकर्षक रूप धारण करतील. वाचकांना सोप्या पद्धतीने वाचण्याच्या कल्पना शोधून काढतील. आधुनिक तंत्रज्ञानासोबत जो बकालपणा येतो आहे, तो लोक नाकारतील. एक मान्य आहे, की जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये बदल होतो आहे आणि तो अपरिहार्यच आहे. मात्र त्याचा वापर आपले स्वार्थ साधण्यासाठीच आणि आशय पातळ करण्यासाठीच केला जातो आहे, हे निश्चितच निषेधार्ह होय.

No comments:

Post a Comment