Friday, December 3, 2010

महाराष्ट्राला स्वाभिमानाने उभे करण्याची पूर्वअट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड कॉंगेसने केली याचा तीन कारणांसाठी मला आनंद झाला. पहिले कारण म्हणजे आपले काम शांतपणे करणार्‍या माणसाचीही कदर स्वार्थाची बजबजपुरी माजलेल्या राजकारणात होउ शकते, याचे हे एक सुखद उदाहरण झाले. दुसरे म्हणजे श्री. चव्हाण यांचा प्रशासनाचा आणि प्रश्न हाताळण्याचा दीर्घ अनुभव. हा अनुभव ते या पदाला न्याय देतील, ही आशा जागी ठेवणारा वाटतो. आणि तिसरे म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व. प्रामाणिकपणे काही करून दाखविण्याची त्यांच्या मनात इच्छाशक्ती दडलेली आहे, असे मला त्यांचे व्यक्तिमत्व पाहिल्यावर वाटते. सध्याच्या राजकीय नेतृत्वात काही चांगले, भरीव आणि मूळातून बदल करण्याची इच्छाशक्ती राहिलेली नाही, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे ती इच्छाशक्ती आहे, असे वाटते. राज्यासमोरचे प्रश्न आणि राज्य सोसत असलेल्या जखमांना मलमपट्टया करण्याचा गेली काही वर्षे राजकीय नेत्यांनी जो सपाटा लावला आहे, त्याला कॉंगेसचेच पृथ्वीराज चव्हाण रोखू शकतील काय, हा आज प्रश्नच आहे. राजकारणातून काही होकारात्मक बदल होतील किंवा होउ शकतील, यावरच्या विश्वासाला गेली काही वर्षे तडा बसला आहे. त्याचे रूपांतर आशावादात करण्याचे मोठे आव्हान पृथ्वीराज चव्हाणांसमोर आहे. त्यासाठी काय करावे लागेल, हे भारताचे राजकारण आणि जग पाहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना सांगणारे आपण असू शकत नाहीत, याची कल्पना असूनही या आव्हानाचा उल्लेख यासाठी केला आणि पुढेही करणार आहे ते यासाठी की पृथ्वीराज चव्हाण नावाच्या नव्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात ऐतिहासिक कामगिरीची संधी आज निश्चित आली आहे.

वजनदार मोजक्या लोकांना खुश करा आणि 10 कोटींच्या महाराष्ट्रासाठी काम केले असे म्हणा, हा जणू सध्याच्या राजकारणाचा स्थायीभावच झाला आहे. त्यामुळे सत्ता आणि संपत्ती बाळगणार्‍या 10/15 टक्के वजनदार लोकांचे लांगुलचालन करणे, असे विकृत स्वरूप राज्यकारभाराला आले आहे. या विकृतीला पृथ्वीराज चव्हाण कसे दूर ठेवतात, यावर ही ऐतिहासिक कामगिरी अवलंबून आहे. याचा अर्थ असा की आज ते हायकमांडकडून आले असले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रातील बहुजनांना आपलेसे करावे. बहुजनांची शक्ती आपल्यामागे उभी करावी. बहुजनांसाठी प्रशासन हलवावे. बहुजनांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होतो आहे, तो पुन्हा प्रस्थापित करावा. सार्वजनिक सेवांचा दर्जा पुन्हा पूर्वपदावर आणण्याची मोहीम हाती घ्यावी. आपली भाषा, संस्कृती, प्रथा, परंपरांविषयी नाकारलेपणाची जी भावना मूळ धरते आहे. तिच्यात स्फुलिंग पेटवावे.

हे सर्व करण्यासाठीची एक अट आहे. महाराष्ट्राचे अस्तित्वच मुळी ज्या जगातल्या एका श्रेष्ठ भाषेवर उभे आहे, त्या मायमराठीच्या संदर्भात काही क्रांतिकारी निर्णय त्यांना घ्यावे लागतील. महाराष्ट्रातल्या बहुजनांना लाचार आणि परावलंबी बनविण्यासाठी मराठी भाषेवर गेले काही दिवस सातत्याने अत्याचार होत आहेत. या अत्याचारांचे परिमार्जन करावे लागणार आहे. त्यासाठी कोणाचा सूड घेण्याची अजिबात गरज नाही, मात्र महाराष्ट्रातील व्यवहार ताठ मानेने मराठी भाषेत करण्याचे स्वातंत्र्य 10 कोटी मराठी जनतेला बहाल करावे लागेल. भाषा-संस्कृतीच्या अभिमानी समाजांनी हे करून दाखविल्याची जगात अनेक उदाहरणे आहेत. ब्रिटनमध्ये फ्रेंच भाषेचे वर्चस्व वाढायला लागले तेव्हा कायदा करून इंग्रजांनी इंग्रजीचा वापर वाढविला, हा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर जगातल्या 15 व्या क्रमांकाची भाषा आणि तीही एक श्रेष्ठ भाषा असलेल्या मराठीवरील संकट दूर करण्यासाठी काही क्रांतिकारी निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राला ताट मानाने उभे करण्याची खरे तर ती पूर्वअटच आहे.

मराठीच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही, असे व्यासपीठांवर सांगून बहुजनांची दिशाभूल करणार्‍यांचे पीक सध्या माजले आहे. नव्या पिढीत मराठी भाषेचा वापर किती कमी झाला आहे, हे त्यांनी मागे वळून कधी पाहिलेले दिसत नाही. शिवाय मराठी भाषेचे भले म्हणजे टीव्हीवरील मराठी गाण्यांच्या आणि मनोरंजनांच्या कार्यक्रमांना मिळणारा बाजारू प्रतिसाद असा सोयीस्कर अर्थ त्यांनी घेतला आहे. या कार्यक्रमांना हजेरी लावली की आपण मराठीची सेवा केली, असाही समज काहीजणांनी करून घेतला आहे. या कोशातून बाहेर येवून मराठीच्या संवर्धनासाठी मूळातून ज्या गोष्टी करण्याची गरज आहे, त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

जगातली कोणतीही लिखित भाषा आता संगणकाच्या माध्यमातून विकसित होत राहणार आहे. संगणकात ती व्यवस्थित वापराता येते ना आणि लोकांचे पोट भरण्यास ती सक्षम आहे का, या दोन निकषांवर मराठीच्या विकासाची दिशा ठरवावी लागणार आहे. हे दोन निकष ती पूर्ण करू शकत नसेल तर तिचा र्‍हास हा ठरलेला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्रिमंडळाने मराठी भाषा विकासासाठी 10 कोटी रूपयांची तरतूद केली. मात्र गेले दोन-तीन महिने त्याची दिशा स्पष्ट होउ शकली नाही. शिवाय महाराष्ट्र निर्मितीपासून भाषा विकासासाठी काम करणार्‍या संस्थांमधील कोळयांची जाळी वाढतच चालली आहेत. घोषणा केली म्हणजे त्या विषयाचे काम झाले, असा समज राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. मराठी भाषा विकासाचे आतापर्यंत असेच झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव साजरा होतानाही मराठीसाठी भरीव आणि मूलभूत असे काही होताना दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाणांना ते करून दाखविण्याची ही जणू संधीच आहे.

श्री.चव्हाण यांनी राज्यकारभार हाती घेताना मराठी भाषा विकास खाते स्वतःकडे घेतले आणि पत्रकार परिषदेत मराठीतच उत्तर देण्याचा बाणा जाहीर केला म्हणून मराठीसंबंधीच्या आशा निश्चितच वाढल्या आहेत. घोषणाबाज मंत्र्यांचे हे निर्णय असते तर महाराष्ट्राने त्याकडे सवयीने दुर्लक्ष केले असते. मात्र पृथ्वीराज चव्हाणांचा शब्द हा विश्वासार्ह आहे, असे आम्ही मानतो. (पत्रकार परिषदेमध्ये मराठीतच उत्तरे देण्याचा कडवेपणा अपेक्षित नसला तरी सुरवात म्हणून त्यालाही हरकत नाही.)

मराठी भाषाविकासासाठी प्राध्यान्याने काय केले पाहिजे हेही सांगितले पाहिजे. संगणकातील मराठीच्या वापराचे फॉण्ट आणि की-बोर्डचे प्रमाणीकरण झाले पाहिजे. (आज मराठीचे सतराशे साठ फॉण्ट तर 8-10 की-बोर्ड वापरले जातात, तेही विकत घ्यावे लागतात) मराठीचे स्वत्व टिकवून हा वापर सुलभही झाला पाहिजे. जगातल्या 15 व्या क्रमांकाच्या भाषेसाठी हे मागणे फार नाही. नव्या बदलांच्या अनुषंगाने भाषेमध्ये काही बदल करण्याविषयी व्यापक चर्चा केली जावू शकते. नव्या जागतिक बदलांना सामोरे जाताना देशांना आणि माणसांना जसे बदलावे लागले आहे, तसे भाषेलाही बदलावे लागणार आहे. मराठी भाषा लोकांचे पोट भरण्यास सक्षम आहे काय, याचे उत्तर आज ‘नाही’ असे आहे. हे उत्तर होकारार्थी येण्यासाठी प्रशासनात मराठीच्या वापरातील सर्व अडथळे दूर करणे आणि आर्थिक व्यवहारही मराठीत करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. न्यायालयात आणि प्रशासनात मराठीत व्यवहार चालतो, असा दावा आपण करु शकतो, मात्र ते खरे नाही, हे आपल्याला माहीत आहे.

लोकशाहीत देशाच्या भौतिक प्रगतीपेक्षा स्वातंत्र्याला महत्व दिले जाते. या स्वातंत्र्याचा विचार करता आजचा शेतकरी-कामगारांचा महाराष्ट्र या स्वातंत्र्यापासून दूर आहे. त्याला देशाच्या स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळावीत , ही तर त्याची गरज आहेच. मात्र आपल्या राज्यात आपल्या भाषेत आपले व्यवहार करता यावे, हे अधिक महत्वाचे आहे. ते स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य पृथ्वीराज चव्हाण यांच्या हातून या सुवर्णमहोत्सवी वर्षात घडावे.

यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

No comments:

Post a Comment