Friday, November 19, 2010

सुतक पाळा...सत्कार कसले स्वीकारता ?

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उर्फ दादा हे त्यांना मानाचे आणि जबाबदारीचे पद मिळाल्याबद्दल सत्कार स्वीकारत आहेत. भ्रष्ट वर्तन केल्याचा आरोप ठेवल्यानंतर कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांना पद सोडावे लागले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला वजनदार नेत्यांना कधी कोठे बसावावे, याची सारखी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि महत्वाच्या खात्यांमध्ये सारखे बदल करावे लागण्याची नामुष्की सहन करावी लागते आहे. या जुळ्या भावांना आपले घर सांभाळता येत नाही, त्यामुळे सारखे बदल करावे लागते, हेच या खांदेबदलाचे कारण आहे. त्यामुळे या बदलाचा आनंद साजरा करावा, असे त्यात काहीही नाही. खरे म्हणजे ही कारणे लक्षात घेता या दोघा भावांनी ‘सुतक’ पाळून पदावर बसायला पाहिजे. असे असताना बाबा आणि दादा सत्कार स्वीकारत आहेत, हे काही चांगले नव्हे. खरे म्हणजे यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विचार करता यांनी एकप्रकारे जनतेचा विश्वासघातच केला आहे. त्यामुळे थेट कामाला लागल्याशिवाय यांनी कोणत्याही उत्सवी कार्यक्रमात भागही घ्यायला नको. तरीही सत्कार स्वीकारले जात आहेत, हे आश्चर्य आहे.

वाईटातून काही चांगल्या गोष्टी होतात, असे म्हणतात. महाराष्ट्राच्या 10 कोटी जनतेला अशा किरकोळ बदलातच यापुढे तरी काहीतरी चांगले होईल, असे वाटते आणि त्यांच्या मनात नव्या आशा पल्लवीत होतात. किती भाबडपणा! भूत आणि वर्तमान विसरायला लावून भविष्यातल्या गाजराकडे जनतेचे लक्ष वेधण्याच्या राजकीय नेत्यांच्या कौशल्याला दाद दिली पाहिजे आणि आपण सातत्याने जनतेची फक्त फसवणूकच करत आहोत, याची त्यांना जाणीवही करून दिली पाहिजे. सत्कार समारंभांचे वार्तांकन वाचल्यावर लक्षात येते की वर्षानुवर्षे आपलेच पक्ष आणि तीच तीच माणसे सत्तेवर असताना ‘काल’ कसा वाईट होता आणि ‘उद्या’ कसा उज्ज्वल असणार आहे, असे छातीठोकपणे ही माणसे बोलू शकतात, त्यांना माहीत आहे की उत्सव साजरे केले की जनतेला सर्व गोष्टींचा विसर पडतो. त्यामुळे जनतेला शक्यतो ‘वर्तमाना’त जाग येवूच द्यायची नाही. वर्तमानात फक्त एकमेकांवर कोट्या करायच्या. दुर्दैवाने जनताही आता त्याकडे मनोरंजन म्हणून पाहायला लागली आहे. काही उथळ पत्रकारांनीही वार्तांकनाचा अर्थ या कोट्यांची जंत्री असाच घेतला आहे. शरद पवार हल्ली ज्याला शहरांचे बकालीकरण म्हणायला लागले आहेत, त्यापेक्षा हे मानसिक बकालीकरण अधिक घातक आहे.

बकालीकरणावरून आठवले. बाबा, दादा हायकमांडच्या आशीर्वादाने पदावर बसले आणि महाराष्ट्रात आनंदीआनंद साजरा झाला. या दोघांचा सत्कार ज्यांना करावयाचा, त्यांनी तर रांगाच लावल्या आहेत. मात्र मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी सर्व छावण्या व्यस्त असल्यामुळे दूधाची तहान ताकावर भागवली जाते आहे. गावोगाव या नेत्यांच्या अभिनंदनाचे मोठमोठे फलक लावले जात आहे. उद्देश हा की आम्ही आनंद साजरा केला हे त्यांना हेलिकॉप्टरमधूनही दिसावे ! त्यांनी खुष व्हावे आणि आपल्याला लक्षात ठेवावे, ही मनिषा. त्यांची काही चूक नाही म्हणा. खुशामत केल्याशिवाय नेते प्रसन्न होत नाहीत. असे सगळे असताना पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार म्हणतात की फलक काढून टाका ! त्यांची भावना कदाचित चांगलीही असेल, पण त्यांचे ऐकतो कोण? आणि का म्हणून ऐकेल? खुषमस्करी हाच जर पदांची पायरी चढण्याचा निकष असेल तर फलक लावणार्‍यांचे काय चुकले सांगा ! हा पुरावा घ्या. अजित पवार गेले तीन वर्षे सांगताहेत, फलक लावू नका. फलक लावले तर मी प्रसन्न होणार नाही. पण ऐकतो कोण? पृथ्वीराजांवर तर असे विद्रूप फलक पाहण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे. त्यांना खरे म्हणजे लोकानुनयाची काहीही गरज नाही. कारण ते थेट हायकमांडच्या सल्ल्याने ‘कठोर’ आणि ‘कटू’ निर्णय घेणार आहेत. तेही कोणी ऐकत नाही, याचा अनुभव त्यांना न येवो. कारण फलक काढून टाका, असा त्यांनी आदेश काढून आठवडा झाला, तरी फलक कोठे निघाले?

म्हणायला सत्कारांचा एक फायदा झाला. या नेत्यांना खरे बोलण्याची संधी मिळाली. ‘देशभरातील राजकारण्यांबाबत सध्या नैराश्याची भावना असून त्यास काही अंशी आपण, काही अंशी जागरूक मेडिया तर काही प्रमाणात जागरूक जनता जबाबदार आहे’, असे विधान मुंबईच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबईतल्या एका मुलाखतीत तर ते असेही म्हणाले की ‘राज्यात गेल्या काही वर्षांत भूखंडांचे आरक्षण बदलणे आणि ‘एफएसआय’चा गैरव्यवहार यातून मिळणारा प्रचंड काळा पैसा राजकारणासाठी आणि गुन्हेगारीसाठी वापरला जात आहे.’ आणि ते असेही म्हणाले की, काळ्या पैशावर पोसलेले राजकारण संपवून स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न राहील. तरी बरे केंद्रात आणि राज्यात सातत्याने कॉंग्रेसचीच सत्ता आहे! देशातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कोणत्याही क्षेत्राविषयी इतके क्रांतिकारी विधान करताना पृथ्वीराज चव्हाण यांना हे भान ठेवावे लागणार आहे. पण आपण असे खरे बोलण्याचे स्वागत करतो. कारण कधीतरी भोळ्या भारतीयांना हे सत्य कळेल आणि आपला मार्ग निवडायला ती समर्थ होईल.

आणखी एक गोष्ट थोडी अधिक स्पष्ट केली पाहिजे. एक माणूस बदलल्याने एवढा बदल होऊ शकतो? मंत्रिमंडळात असलेल्या माणसाचे पद बदलल्याने आता प्रशासन वेगाने पळू शकते? मग पुण्यासारख्या संपन्न, जागरूक आणि पिंपरी-चिंचवडसारख्या ‘श्रीमंत’ शहरात तर अजित पवारांची सत्ता आहेच की! मग तेथे का फरक दिसत नाही? तेथे का काही नोंद घेण्यासारखा बदल दिसत नाही? मग कोणीतरी हळूच म्हणणार की, एवढेही खरे बोलायचे नसते. सर्वसत्ताधीश समजणार्‍या या नेत्यांना याची आठवण करून दिली पाहिजे की तुमची जी कोठली हायकमांड आहे, ती याच भ्रष्ट व्यवस्थेवर पोसली जाते आहे. त्या व्यवस्थेविषयी बोलण्यासाठी कदाचित आज तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागत नसेल, पण काही खरोखर करण्याची इच्छा असेल तर मात्र ते पूर्वपरवानगीशिवाय शक्य होणार नाही.

बाबा, दादा... हा फार मोठा विषय झाला.. व्यवस्था बदलाचे नंतर बघू. तूर्तास फलक हटविण्यापुरते प्रशासन हलले तरी भोळी जनता एक चांगली सुरवात म्हणून हा खांदेपालट आनंदाने मान्य करेल.


- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

No comments:

Post a Comment