Thursday, November 11, 2010

‘ते’ आणि ‘हे’ ओबामा एकच आहेत ना ?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर येत असताना ‘ते’ आणि ‘हे’ ओबामा एकच आहेत ना, हे तपासून घ्यावे लागणार आहे. असं म्हणण्याचं कारण ओबामांनी मानवतावादी जगाच्या वाढविलेल्या अपेक्षा आणि ओबामांचे पूर्वआयुष्य ! आपल्या पडत्या काळात ओबामांनी फार प्रगल्भ असं लेखन केलं. त्यातील ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ हे त्यांचं आत्मचरित्र अमेय प्रकाशनासाठी भाषांतर करण्याची संधी मला मिळाली. हे काम करताना मी ओबामामय झालो होतो. याचं कारण काही महिन्यापूर्वी अमेरिकेबाहेर अजिबात माहीत नसलेल्या ओबामांची जगभर चर्चा सुरू झाली होती आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर होताच ते निवडून येणार असं अमेरिकेने आणि जगाने गृहीत धरलं होतं. सर्वसत्ताधीश अमेरिकेच्या अध्यक्षपदी असा कृष्णवर्णीय, दिसायला अगदीच साधा माणूस सर्वसत्ताधीश होणार हे ‘सरंजामी’ मनाला पटत नव्हते. त्यांचे चरित्र वाचल्यावर तर जगात असे काही होऊ शकते, या कल्पनेनेही जगातल्या परिवर्तवादी विचाराच्या माणसांचा आशावाद दुणावला होता. जग एका माणसामुळे बदलत नाही, हे खरे असले तरी महात्मा गांधींसारखा महापुरूष या बदलाला चालना देऊ शकतो, हे आपण पाहिलेलं होतं. त्यामुळेच ओबामांच्या विजयामुळे आणि त्यांच्या वाट्याला ज्या प्रकारचे आयुष्य आले, ते लक्षात घेता हा आशावाद काही चुकीचा म्हणता येणार नाही.
अमेरिका हा व्यापारी देश आहे आणि जे व्यापाराच्या चौकटीत बसत नाही, त्याची अपेक्षा अमेरिकेकडून करण्यात काही अर्थ नाही, हे अनेकदा बोलले गेले असतानाही हा आशावाद ओबामांनी जिवंत केला आहे, हे महत्वाचे. ओबामांचे ऑडॅसिटी ऑफ होप’ हे पुस्तक वाचताना तर भांडवलशाहीच्या राजधानीत समाजवादी, गांधीवादी माणसाचा उद्य कसा झाला, असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांचं त्यातील हे एक वाक्य पाहा ‘समानसंधी आणि समानता यामुळे आपलं स्वातंत्र्य धोक्यात येत नाही. उलट आपल्या सरकारची लोकमान्यता आणि यशस्वी अर्थव्यवस्थेचं मूळ गमक म्हणजे ही मूल्यंच होत.’ जगाच्या कल्याणासंबंधीचा जो जो म्हणून विचार आपण करतो, तो विचार ओबामांनी त्यात केला आहे. इतका चांगला विचार करणारा माणूस जगाचा नेतृत्व करतो आहे, हे खरोखरच आशादायी आहे.
ओबामा यांच्या दौर्‍याची चर्चा जगातले सत्तासंतुलन आणि व्यापारसंधी म्हणूनच जास्त होईल, याची मला कल्पना आहे. मात्र एका वेगळ्या मुशीत तयार झालेला माणूस म्हणून त्यांच्याकडून जगाच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. जागतिक राजकारणात संवेदनशीलता, माणुसकी आणि वेगळ्या विचाराला स्थानच नाही असे मानण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे आणि जगातला बकालपणा त्यामुळेच वाढतो आहे. या बकालपणाचा ओबामांनी वेळोवेळी वेगवेगळ्या शब्दांत निषेध केला आहे. आता हा निषेध कृतीतून करण्याची वेळ आली आहे. ही संधी ओबामांनी घेतली पाहिजे, असे मनापासून वाटते.
‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ चे भाषांतर करताना त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी आपल्याला उभारी येते. ओबामा हे आपल्या खूप जवळचे वाटायला लागतात. असे वाटते त्यांना भेटून जगाच्या भल्याच्या गोष्टी कराव्यात. पण आपल्याला हेही माहीत असते की जगाचे व्यवहार असे चालत नाहीत. पण हा आशावाद ओबामांनी जागविला , हे निश्चित. हे पुस्तक प्रसिद्ध्‍ झाल्यानंतर या आशावादाला मी पुढीलप्रमाणे शब्दरूप दिले होते. या भावना अर्थपूर्ण जीवनाच्या दिशेने जाणार्‍या असल्याने आपल्यालाही त्या भिडतील, अशी खात्री आहे.
‘मित्रहो, जगाच्या इतिहासाला कलाटणी द्यायला निघालेल्या बराक ओबामा यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगात तर जणू आपणही या पाऊलवाटांच्या ठ्शांचा माग काढते होतो. ओबामाचे एकटेपण, नैराश्य, त्यांचा निश्चय, हिंमत... हे सर्व आपलेच होऊन जातात. जातपात, वर्ण, धर्मपंथ, राज्य, देश आणि खंडांच्याही सीमा पुसून जातात आणि नव्या मानवतावादी... मानवधर्मावर आधारित जगाच्या उभारणीचे आपणही एक शूरशिपाई होण्याचा संकल्प करतो.
आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या अनेक पिढ्यांना सोसावी लागलेली गुलामगिरी ज्याच्या वारसांना टाळता आली नाही. तिसर्‍या जगातील दारिद्र्यामुळे येथील कोट्यवधींच्या आयुष्यात निर्माण झालेली गुंतागुंत ज्याने अनुभवली... अमेरिकन गौरवर्णीय ख्रिश्चन आई, केनियन कृष्णवर्णीय मुस्लीम वडील, आईवडीलांच्या घटस्फोटांनंतर इंडोनेशियात दुसर्‍या वडिलांचा करावा लागलेला स्वीकार... अशा दोन जगात स्वतःला समजावतच जगावे लागूनही मी कोणा एकाचा नाही, हे अमेरिकेला पटवून ‘आपण बदलू शकतो’ ‘येस वी कॅन’ असा नवा दुर्दम्य आशावाद ज्याने जागविला, ते हे बराक ओबामा.
नव्या जगाचे स्वप्न बनलेली अमेरिका आणि जग जोडण्याची ताकद असलेला भारत... या दोन महासत्तामधील साम्यस्थळे सातसमुद्र पार करून जवळ येत आहेत. मी कोणा एकाचा नाही, तर मी सर्वांचा आहे, असे कोणीतरी म्हणावे आणि एका समन्यायी नव्या जगाचे स्वप्न साकार व्हावे, असे ज्यांना ज्यांना वाटते... आपल्या वर्तमानातील गुंता सोडविण्यासाठी आणि आव्हाने पेलण्यासाठी आपल्या सर्वांनाच एकत्र यावे लागेल.. आणि जे शक्य आहे.. यावर ज्यांचा विश्वास आहे.. बदलासाठी राजकारण किती सहाय्यकारी ठरते, हे ज्यांनी समजून घेतले आहे आणि लोकशाहीच्या सामर्थ्यावर आणि सर्वसामान्य माणसांच्या मनोबलावर ज्यांचा विश्वास आहे, अशा सर्वांचा आशावाद ओबामांनी पेटविला आहे.
बहुविधता आणि सर्वसमावेशकता हेच नव्या जगाचे बलस्थान आहे आणि विषमता हद्दपार करण्यासाठीच्या छोट्या-मोठ्या लढ्यांत आज जे जे सक्रिय आहेत... इतिहासाचे ओझे जबाबदारी म्हणून स्वीकारताना वर्तमानात झेपावण्याचा आणि आपल्या विस्तारित परिवाराचं उज्ज्वल भवितव्य पाहण्याचा ज्यांनी संकल्प ज्यांनी केला आहे... अशा सर्व वैश्विक नागरिकांना सांगणार्‍या आणि अजूनही संकुचित अस्मितांवर विषारी फुंकर घालणार्‍याना ‘ आपले प्राक्तन समान आहे,’ असे बजावणार्‍या ... ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’ ते महासत्ता अमेरिकेच्या पहिल्या आफ्रिकन – कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या बराक ओबामांचे समंजस व्यक्तिमत्व कोणत्या मुशीतून घडले असेल ?
महत्वाचा मुद्दा हा की ज्याचे मूळ आफ्रिकेत आहे, ज्याचे नागरीकत्व अमेरिकन आहे , ज्याने आशिया खंडातले दारिद्रय आणि समृद्ध्‍ सांस्कृतिक वारसा पाहिलेला आहे , ज्याने कृष्णवर्णीय म्हणून वाट्याला आलेल्या दुःखातून नाकारलेपणाची वेदना अनुभवली आहे, ज्याच्या वाट्याला केवळ महिनाभर वडिलांचा सहवास मिळाला आहे, ज्याने भांडवलशाहीच्या राक्षसी रूपाचा निषेध नोंदविलेला आहे, ज्याने आपल्या आयुष्यात अनेक पराभव पचविले आहेत आणि अतिशय संवेदनशील मनाने या प्रवासाकडे पाहू शकतो... तो बराक ओबामा नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून सुखदुःखाची खाण असलेल्या भारतभेटीला आला आहे. करार- मदाराचे महत्व कोणी नाकारत नाही, मात्र त्यावरच्या सह्या वैश्विक नागरिकत्वाला न्याय देणार्‍या आहेत ना, हे आपल्यादृष्टीने महत्वाचे आहे. अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला त्याची प्रतीक्षा आहे.

- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com