Tuesday, November 2, 2010

आयुष्य माणसाचे, नियम मार्केटचे !

आता मुंबईत दादर स्थानकावर शिवनेरी, एशियाड आणि साधी बस उभी असली की शिवनेरी आधी भरते, नंतर एशियाड आणि शेवटी साधी बस. शहर बस वाहतुकीच्या ताफ्यातील वातानुकुलित गाडयांमध्ये आता गर्दी दिसू लागली आहे. घरातील पहिलीच कारची खरेदी असली तरी गाडी मोठी हवी, असे म्हणणारी तरूण पिढी काही घरांमध्ये दिसायला लागली आहे. टीव्हीच घ्यायचा तर ‘फ्लॅट टीव्ही’ घेतला पाहिजे, याविषयी घरात एकमत होते आहे. मोबाईलचे ‘हाय एंड’ चे मॉडेल्स आधी उचलली जात आहेत. शहरातील वाहतूकीचा प्रश्न सोडवायचा तर मेट्रोशिवाय पर्याय नाही, असे छातीठोकपणे वाटणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. महागड्या चित्रपटगृहांतील बाल्कनीची तिकीटे आता आधी संपतात आणि उशिरा तिकीटे काढणार्‍यांना पड्द्या समोरच्या तिकीटांवर समाधान मानावे लागते. टोल असला तरी चालेल पण रस्ता चांगला हवा, यावर आता बहुतेकांचे एकमत होते आहे. देवाच्या लवकरच्या दर्शनासाठी जास्त पैसे मोजणार्‍या भाविकांची संख्या वाढत चालली आहे. हॉटेलात वातानुकुलीत विभागात दर जास्त आहेत हा आता काही चर्चेचा मुद्दा राहिलेला नाही. चार पैसे जास्त गेले तरी चालेल पण सेवा चांगली पाहिजे, हा परवलीचा शब्द झाला आहे. हा बदल जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतो आहे. या बदलाचे कारणही आपल्याला माहीत आहे. भारतातल्या 30 कोटी मध्यमवर्गातील कुटुंब आता दररोज उच्चमध्यमवर्गाचे दार ठोठावत आहेत.
मध्यमवर्गाची व्याख्या करणे अवघड असले तरी तो वेगाने वाढत चालला आहे, हे बाजारात दिसायला लागले आहे. आमची मुले महापालिकेच्या शाळेत शिकणार नाहीत, फी जास्त असली तरी चालेल पण ती खासगी आणि तेही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतील, यावरही मध्यमवर्गाने शिक्कामोर्तब केले आहे. मोठया शहरांमध्ये ‘टु बेडरूम किचन’ किंवा ‘थ्री बेडरूम किचन’ फ्लॅटनाच मागणी आहे, असे जाहीर करून छोटे फ्लॅट काढण्याची गरज नाही, असे बांधकाम व्यावसायिकांनी ठरवून टाकले आहे. परदेशात खर्च करणारा पर्यटक म्हणून भारतीय पर्यट्कांना मागणी वाढली आहे. देशातही भारतीय पर्यट्क महत्वाचा ठरू लागला आहे. टीव्ही, वर्तमानपत्रातील जाहिरातीत उंची सौदर्यप्रसाधनांच्या जाहिराती वाढत चालल्या आहेत. महागाच्या पण ब्रँडेड कपड्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. भारत कधीच धावला नसेल इतल्या वेगाने ‘अपमार्केट’च्या दिशेने धावायला लागला आहे.
देशातल्या 30 कोटी मध्यमवर्गाने बहुराष्ट्रीय कंपन्यांना भुरळ घालावी, अशीच ही परिस्थिती आहे. तीस कोटी याचा अर्थ जवळपास एक अमेरिका आणि जगातल्या बहुतेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा मध्यमवर्ग ! जगाचे लक्ष भारताकडे ज्या इतर अनेक कारणांमुळे आहे, त्यातील सर्वात महत्वाचे कारण भारतातील वाढता मध्यमवर्ग - हे आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण हा वर्ग कसा दिसायला लागला आहे पाहा. सातआठ वर्षापुर्वी पुण्याच्या प्रसिद्ध जंगली महाराज रोडवर मॅकडोनाल्ड हे आंतरराष्ट्रीय साखळी पद्धतीचे हॉटेल सुरू झाले तेव्हा त्याची भलीबुरी चर्चा झाली होती. आता ती चर्चा मागे पडली आहे. आता तुम्ही या रस्त्यावर गेलात तर भारतीय मालाचे दुकान शोधावे लागेल, अशी परिस्थिती आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची दुकाने सजली, याचा अर्थ ती चालतात, म्हणून सजली, हे ओघाने आलेच. म्हणजे हे अपमार्केट आपल्या समाजाने केवळ स्वीकारलेच नाही तर त्यामध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी आपण धडपडतो आहोत. हे चांगले की वाईट हा मुद्दा आता राहिलेला नाही. आरामदायी प्रवास, ब्रँडेड कपडे, उंची सौंदर्यप्रसाधने, मोठी घरे आणि गाड्या ही उच्चमध्यमवर्गाची गरजच झाली आहे.
एकेकाळी सेवासुविधांचा दुष्काळ असलेल्या भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्या 120 कोटींपैकी 30 कोटी लोक , यालाच आनंदी जीवन म्हटले तर ते जीवन ते आज जगत आहेत. ज्यांना आज त्या प्रकारच्या जीवनाचे स्वप्न पडायला लागले आहे , ते त्या दिशेने वेगाने निघाले आहेत, यातही चुकीचे काही नाही. पण याचा अर्थ हा प्रवास दोषमुक्त आहे, असे म्हणता येणार नाही. त्या दोषांकडे आज दुर्लक्ष केले जाते आहे, आणि ते आपल्या समाजाला परवडणारे नाही. तीस कोटी लोकांच्या वाट्याला सुखसोयींनी बर्‍यापैकी पूर्ण असे जीवन आले, असे म्हणताना 90 कोटी लोकांच्या वाट्याला ते आलेले नाही, हे मान्य करावे लागते. विकासाची ही अपरिहार्य प्रक्रिया आहे, असे कोणी म्हणेल तर तेही मान्य करायला हवे. प्रश्न यासाठी उपस्थित करायचा की 90 कोटी लोकांच्या वाटयाला हे आयुष्य यावे, यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत किंवा त्यांच्यासाठी काही विशेष होताना दिसते आहे काय, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळते आहे.
विकासाच्या फळांचे वाटप सर्व थरातील जनतेपर्यंत झाले पाहिजे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. लोकशाही देशामध्ये अधिकाधिक लोकांच्या हिताची काळजी केली पाहिजे. अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक हित हाच तर लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे 30 कोटी लोकांचे जीवनमान उंचावले, यात आनंद मानताना उरलेल्या 90 कोटींचे जीवन उंचावण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, हे तेवढेच महत्वाचे आहे. हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की 30 कोटीचे ‘मार्केट’ हे जगाच्या दृष्टीने साहजिकच फार मोठे ‘मार्केट’ आहे. त्यामुळे ते मिळविण्यासाठीची स्पर्धा समजण्यासारखी आहे. मात्र या प्रवासात हे ‘मार्केट’ मिळविणारे उत्पादक आणि ग्राहक यांचा इतर 90 कोटींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. आपआपल्या गरजा भागवून 90 कोटींकडे दुर्लक्ष केले तरी चालू शकते किंवा त्यांची आपल्याला गरज नाही, अशी भावना तयार होऊ लागली आहे. भारताच्या ‘अपमार्केट’ ने ही चूक केली, अशी काही लक्षणे सध्या दिसू लागली असल्याने ही चर्चा आवश्यक ठरते.
मोठ्या फ्लॅट्ना मागणी आहे, असे लक्षात आल्यावर छोटे फ्लॅट बांधलेच जात नाहीत. ‘शिवनेरी’ सेवा पैसा मिळवून देते, तसा पैसा साध्या सेवेतून मिळत नाही, हे लक्षात आल्यावर त्या सेवेकडे दुर्लक्ष्य होते. काही दुकानांमध्ये प्रवेश करण्याचे नियम जाचक केले जातात. काही विशिष्ट वस्त्यांचीच खास काळजी घेतली जाते. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातल्या सेवासुविधांनाही बाजाराचे निकष लावले जातात. नागरिक म्हणून काही प्राथमिक सेवांमध्येही भेदभाव केला जातो. भेदभावाची अशी शेकडो उदाहरणे आताच दिसायला लागली आहेत. अशा भेदभावामुळे ‘अपमार्केट’ चा ग्राहक नसलेल्या माणसाच्या वाट्याला जी अवहेलना येते आहे, ती निषेधार्ह आहे. ‘अपमार्केट’ मध्ये सामील व्हा आणि लौकिक अर्थाने चांगले आयुष्य मिळवा, अशी जणू सक्ती केली जाते आहे. माणसाच्या आयुष्याला आणि त्याच्या प्राथमिक गरजांचा ‘मार्केट’ चे नियम लागू करण्याची ही धडपड सर्वसामान्य 90 कोटी जनतेवर अन्याय करणारी आहे. आधुनिक मानवाचा प्रवास समृद्ध जीवनाकडे चालला, असे म्हटले जाते. हे समृद्ध जीवन असे काही समुहापुरते मर्यादित असेल तर ते पूर्वी होतेच की. हे समृद्ध जीवन ज्यावेळी बहुजनांपर्यंत पोहचते , तेव्हाच ते अर्थपूर्ण ठरते, हे कधीही विसरता कामा नये.
- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com