Tuesday, November 2, 2010

धोतर्‍याच्या झाडाला मोगर्‍याची फुलं येतील ?

दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीनिमित्त यावर्षी देशात आणि विशेषतः माध्यमांमध्ये जो गलबला झाला, त्यामुळे कोणीही भारतीय भारावून जाईल. गांधींना सलाम करणारी ही फौज या देशात कधी निर्माण झाली, किंवा तिचे डोके ताळावर आले की काय, असा पेच आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. खर्‍या गांधीवाद्यांना तर हर्षवायू होईल आणि गांधी तत्वज्ञानाचा यापेक्षा अधिक प्रसार करण्याची आता गरज राहिलेली नाही, या निष्कर्षापर्यंत ते येतील. नाहीतरी ते बिचारे आता थकले आहेत. गांधीवादाचे बीज लावून ते झाड वाढण्याची वाट होते. असे झाड एकदम एरंडासारखे वर आल्यावर त्यांची हिच गत होणार. आधी तो मुन्नाभाई आणि आता ही सर्व फौज अशीच ही स्पर्धा लागली आहे. हो स्पर्धाच. कारण हल्ली म्हणे स्पर्धा लावल्याशिवाय आणि कोणाला तरी जिंकल्याचे आणि अनेकांना हरविल्याचे जाहीर केल्याशिवाय महत्व सिद्ध होत नाही. तर मुद्दा असा की यांनी तर मुन्नाभाईवरही विजय मिळविला. मुन्नाभाई तरी नट होता असे म्हणता येते, त्याने काय ‘गांधीगिरी’ची भूमिका केली आणि तो पुर्वीसारखी टपोरीगिरी करायला मोकळा झाला. पण यांचे तसे नाही. यांनी मोहोर उमटवली की गांधीवादाशिवाय माणसासमोर, कुटुंबासमोर, गावासमोर, देशासमोर, जगासमोर आणि पृथ्वीसमोरही पर्याय नाही! त्यामुळे आता गांधीवादी होण्याशिवाय पर्याय नाही ! प्रत्येकाने गांधीवादी झालेच पाहिजे, असा जणू फतवाच काढला म्हणे. म्हणजे प्रत्येकाने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एकदातरी गांधीवादाचा जयजयकार केलाच पाहिजे. मग तुम्ही कोणी का असेना . गांधीजी तर चोरांनाही माफ करा म्हणायचे. हेही एक प्रकारे चोरच आहेत म्हणा. मग यांना का ते माफ करणार नाहीत ?

‘जो सर्वात गरीब आणि दुबळा मनुष्य तुम्ही पाहिला असेल त्याचा चेहरा आठवा आणि मग स्वतःला विचारा की तुम्ही जे करू पाहात आहात त्याने त्या मनुष्याचा काय फायदा होईल ?’ असे गांधीजींनीच म्हटले आहे आणि नव्या गांधीवाद्यांना हे वाक्य फार फार आवडले आहे. त्यामुळे त्यांनी ठरवून टाकले, जे काय करायचे ते त्या गरीब दुबळ्या माणसाचे नामस्मरण करूनच करायचे! सामान्य माणसासाठी यांचा जीव आता तटतट तुटू लागला आहे. पंचतारांकित हॉटेलांमधील अन्न गोड वाटेनासे झाले आहे, सर्वत्र त्या गरीब दुबळ्या माणसाचा चेहरा दिसतो आहे. परदेशवारी करा, परिषदा घ्या, मेळावे घ्या, जेवणावळी घाला, सुटबुट घाला, बक्कळ नफा मिळवा, काहीही करा... त्या गरीब दुबळ्या माणसाची सावली चैन पडू देत नाही. त्यावरचा नामी उपाय आम्ही शोधून काढला आहे. आता दोन ऑक्टोबर साजरा करू यात. कोणाला पुरस्कार देवू यात, कोणाचा सत्कार करू यात, कोणाचे , कोणाला उपकाराच्या ओझ्याखाली चिरडून टाकू. गांधी नावाचा जप करू... एका दिवसाचा तर प्रश्न आहे, मग वर्षाचे 364 दिवस आपलेच आहेत. गांधीजींचा खून करण्यासाठी!

1909 साली म्हणजे 100 वर्षांपूर्वी गांधीजींनी लिहिलेल्या ‘हिंद
स्वराज्य’ या छोटेखानी पुस्तकात गांधीजींनी या ढोंगाविषयी फार चपखल भाष्य केले आहे. ब्रिट्नमध्ये त्यावेळी कशी बजबजपुरी माजली होती, याविषयी ते लिहितातः ‘ ते लोक घटकेघटकेला विचार बदलतात. तशी तर त्या लोकांत एक म्हणच आहे की दर सात वर्षांत रंग पालटतो. घड्याळाच्या हेलकाव्याप्रमाणे ते लोक हेलकावे खात असतात, स्थिर होऊच शकत नाहीत. कोणी माणूस जरा जोरदार बोलणारा आणि आडव्यातिडव्या गोष्टी करणारा असला किंवा त्यांना मेजवान्या वगैरे देणारा असला की त्याचे ढोलके बडवायला त्यांनी केलीच सुरूवात’.

इंग्रजांच्या किंवा पाश्चिमात्य सभ्यतेचा गांधींजींनी नेहमीच कडक शब्दात समाचार घेतला आहे. कारण तीत पराकोटीचे ढोंग आणि स्वार्थीपणा त्यांना दिसत होता. भारतात त्याच सभ्यतेचा आज सुळसुळाट झाला आहे. त्यालाच प्रतिष्ठा चिटकवली जाते आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला जातो आहे. साधन आणि साध्य याचा संबंध तोडून मार्केडिंग फंडे शोधले जात आहेत. गांधीवादही या मार्केडिंग फंड्याचा भाग करण्याची बुद्धी व्हावी, या कल्पनेची कीव करावी, तेवढी थोडीच आहे. गांधीजींच्याच शब्दात सांगायचे तर धोतर्‍याचे रोप लावून मोगर्‍याच्या फुलांची अपेक्षा कशी करता येईल बरे ?