Thursday, October 28, 2010

त्यांच्या गृहप्रवेशानंतर 'मार्केट' कोसळणार !

अशात घर बांधण्याचा किंवा घर विकत घेण्याचा विचार असेल तर थोडे थांबा. घर बांधू नका, घर विकत घेऊ नका. असा अनाहूत सल्ला देण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण आहे ते मुकेश अंबानी नावाचा माणूस. त्याच्या घराचे बांधकाम पूर्णत्वास आले असून त्याचे कुटुंब नव्या घरात राहायला जाईपर्यंत नव्या घराचा विचार सुद्धा करू नका. आतली बातमी अशी आहे की या ‘महामानवा’चे घर पूर्ण म्हणजे त्याच्यावरून शेवटचा हात फिरेपर्यंत घरांचे भाव उतरण्याची शक्यता नाही. म्हणजे त्या महाघराला ऐनवेळी जी वस्तू लागेल त्या वस्तूचे भाव वाढू शकतात ! एवढेच नाही तर ती वस्तू तुम्हाला मिळेलच याची खात्री नाही. म्हणजे असे होऊ शकते की एक दार लावले आणि पैसे आल्यावर दुसरे घेऊ असे म्हणाल तर ते मिळणार नाही ! त्यापेक्षा काही दिवस थांबल्याने आपल्याला काय फरक पडतो ? सावध यासाठी करतो की तुम्ही घेत असलेला वस्तूचा विक्रेता एकतर मुकेश अंबानीच असू शकतो किंवा त्याचा भागीदार किंवा त्याने विकत घेतलेल्या जंगलातील लाकडे तोडून ते दार केलेले असू शकते ! त्यामुळे लावलेले दार काढून नेण्यासही सरकारी अधिकारी किंवा पोलिस किंवा न्यायालये कमी करणार नाहीत. इतकी नामुष्की ओढ्वून घेण्यापेक्षा चार दिवस थांबायला काय हरकत आहे म्हणतो ?

चार लाख 532.39 चौरस फूटाच्या प्लॉटवर 173.12 मीटर म्हणजे आपल्या भाषेत 27 मजले, प्रत्येक मजला, प्रत्येक खोली वेगळी, पहिले सहा मजले तर नुसते पार्किंग, सातव्या मजल्यावर गॅरेज, आठव्या मजल्यावर मिनी थिएटर, पुढील चार मजल्यावर म्हणजे 12 व्या मजल्यापर्यंत बाल्कनी गार्डन, शिवाय त्यातला नववा मजला आणीबाणीच्या वेळी राहण्यासाठी, दहाव्या आणि अकराव्यावर व्यायामशाळा, क्लिनिक, स्विमिंगपूल, 12 वा आणि 13 वा मजला पाहुण्यांसाठी राखीव, 14 वा आणि 15 वा पुन्हा आणीबाणीच्या काळात राहण्यासाठी, शेवटचे चार मजले खरोखर राहण्यासाठी, गच्चीत हेलिपॅड म्हणजे हेलिकॉप्टर उतरण्याची सोय असा एक न्यारा बंगला आपल्या मुकेश अंबानीने बांधला आहे. या बंगल्याची आणखी दोन- तीन वैशिष्ट्ये सांगायची राहिली. या बंगल्याला नऊ लिफ्ट आहेत आणि जिने चढण्याची वेळ आलीच कधी तर त्यांच्या कठड्यांना चांदीचे पाणी लावलेले आहे. घरात पुर्णवेळ काम करण्यासाठी 600 माणसे काम करणार असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था द्‍याळू मालकांनी याच बंगल्यात केली आहे. म्हणजे त्यांना चांदीच्या पाण्याला हात लावायला मिळणार म्हणायचे !

अंबानीच्या बंगल्याचे एवढे वर्णन यासाठी केले की अशात घर घेण्याची तुमची इच्छा अजिबात होऊ नये. त्याची कारणे तीन. पहिले आणि तिसरे आपल्या थेट हिताचे. ते म्हणजे सर्वच जीनसांच्या किंमती वाढल्या आहेत. दुसरे म्हणजे घर घेताना जो जळफळाट होण्याची शक्यता आहे, त्यातून अंबानी आणि आपल्याला अनेक अनुचित प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. आणि तिसरे म्हणजे त्याचा गृहप्रवेश झाला की ‘रिअल इस्टेट मार्केट’ कोसळणार असून आपल्याला स्वस्त घरे मिळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात निर्णय आपण आपलाच घ्यायचा आहे. कारण एवढा मोठा बंगला बांधल्यावर अंबानीकडे आपल्याला द्यायला पैसे राहिलेले नाहीत , त्यामुळे तो आपल्यातला सर्वात श्रीमंत माणूस असला तरी आपल्याला आपलेच खिसे तपासावे लागणार आहेत. एक मात्र नक्की, ते म्हणजे त्याच्या गृहप्रवेशानंतर जीनसांना मागणी येण्याची शक्यता नसल्याने मार्केट कोसळणार म्हणजे कोसळणार ! असे म्हणतात की त्याच्या बंगल्याचे काम चालू असताना आपल्या काही चलाख बांधवांनी आपापल्या बंगली त्याच मटेरियलच्या हिशोबात बांधून घेतल्या ! एक चर्चा अशी आहे की दिल्लीची राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दिल्लीत( त्यातील काही पुण्यात) आणि त्याच दरम्यान मुंबईत घरे बांधण्याची स्पर्धाच लागली होती. त्यात कोण जिंकले याचे हिशोब अजूनही चालू आहेत. ते मोजणे अशक्य झाल्याने ती जबाबदारी आता प्राप्तिकर खात्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यातूनही आणखी काही बंगली बांधण्यासाठी काही बाबू प्लॉटच्या शोधात आहेत. पण हा परिणाम एवढाही मोठा नाही की मार्केटला सावरून धरेल . त्यामुळे मार्केट कोसळणार यावर विश्वास ठेवा आणि चार दिवस थांबाच !

मुंबईत घरांच्या किंमती 2009 मध्ये 60 ते 100 टक्के वाढल्या होत्या, अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. मालमत्तेच्या किंमती कोसळणार असल्याचे भाकीत त्याच बातमीत करण्यात आले आहे. या घसरगुंडीची चाहूल म्हणून जे दाखले प्रसिद्ध झाली आहेत, ती वाचल्यावर त्याची खात्री पटते. मला खात्री आहे की ही आता तरी तुम्ही घर घेण्याचा किंवा बांधण्याचा मोह आवरता घ्याल. बातमीत म्हटले आहे की, दक्षिण मुंबईत एखाद्या रिअल इस्टेट एजंटने बिल्डरला पाच कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता विकून दिल्यास दोन टक्के दलाली आणि एक स्कोडा फॅबिया गाडी भेट म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. दहा कोटीचा फ्लॅट विकून दिल्यास स्कोडा ऑक्टिव्हीया, 20 कोटींचा फ्लॅट विकून दिल्यास सी क्लास मर्सिडीज, 30 कोटींपेक्षा जास्तीचा फ्लॅट विकून दिल्यास ई क्लास मर्सिडीज , 50 कोटींपर्यंत हा आकडा गेला तर मर्सिडीज- एस, आणि एकाच प्रोजेक्ट्मध्ये 100 कोटी रूपयांचा धंदा मिळवून दिला तर रोल्स रॉएस ( 2 ट्क्के कमिशन फिक्स, या गाड्यांचा भारीपणा याच क्रमाने चढत जातो, असे गृहित धरायला हरकत नाही.) याचा अर्थ लक्षात घ्या, श्रीमंत दक्षिण मुंबईतील कोटींचे फ्लॅट आता विकत घ्यायला गिर्‍हाईक नाही ! बालंट नको म्हणून हुशार लोकांनी आपापली घरं अंबानीच्या आधीच ताब्यात घेतली. या दाखल्यांचेही तीन अर्थ होतात. एक म्हणजे मुंबईच्या फ्लॅटचे भाव पडणार. दुसरा अर्थ भारी गाड्यांचेही भाव पडणार आणि तिसरा अर्थ मार्केट कोसळणार ! त्यामुळे ज्यांना ज्यांना म्हणून स्कोडा, मर्सिडीज आणि रोल्स रॉएस घ्यायची आहे, त्यांनीही आणखी चार दिवस थांबावे. कदाचित तोपर्यंत अंबानीच्या नोकर चाकरांची खरेदीही पूर्ण होऊन जाईल आणि मार्केट पूर्ण ग्राहकराजाच्या म्हणजे आपल्या ताब्यात येईल !

अशीच आणखी बातमी. मुंबईतील झोपड्पट्टी पुनर्वसन योजनेतून (एसआरएस) काही बिल्डरांना 400 प्रकल्पातून 4000 कोटी रूपयांचा नफा मिळाला. ही योजना एकूण 32,000 कोटी रूपयांची असून त्याअंतर्गत एकूण दोन लाख घरे गेल्या 15 वर्षांत बांधून झाली आहेत आणि एकूण आठ लाख घरे बांधायची आहेत. या नफ्यावर या बिल्डरांनी कर भरावा की नाही, यावरून सध्या वाद सुरू आहे. त्याचे कारण असे की करमाफी जाहीर झाली होती, मात्र त्याचा ‘जीआर’ अजून निघाला नसल्याने बिचारे बिल्डर परेशान आहेत. पण मला खात्री आहे की लवकरच ‘जीआर’ निघेल आणि करमाफी मिळून हे बिल्डर नव्या जोमाने कामाला लागतील. ते कामाला लागेपर्यंत मुंबईत अतिक्रमण करून झोपडी बांधायला हरकत नाही. ज्यांना ते जमणार नाही त्यांच्यासाठी मार्केट पडणारच आहे. शिवाय आपण मुकेशला विनंती करू की त्याने लवकर गृहप्रवेश करावा ! ( ताजा कलमः आठ लाख घरांची किंमत- 32,000 कोटी, एका घराची किंमत - 5 हजार कोटी रूपये, जय भारत निर्माण ! )


- यमाजी मालकर / ymalkar@gmail.com

No comments:

Post a Comment