Sunday, October 3, 2010

खंडेरावाचा काळी—पांढरीचा झगडा

‘भारतीय संस्कृतीचा सगळा पसारा, अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळच माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते’ असे भालचंद्र नेमाडे यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या 603 पानी कादंबरीच्या ‘ब्लऽब्’मध्ये म्हटले आहे. ते खरेच आहे. मात्र भारतीय उपखंडातील प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या घरातील शेकडो वर्षांचा जो संघर्ष नेमाडे यांनी वर्णन केला आहे, तो तंतोतंत खरा आहे. शहरी मनाला ते स्वीकारणे कठीण जाऊ शकते. या कादंबरीचा आवाका खूपच मोठा आहे, त्या ‘अडगळी’त प्रवेश न करता देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांविषयी नेमाडे यांनी फार कळीचे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याकडे मी आपले लक्ष वेधणार आहे.

आपल्या ‘ऐतखाउ’ शहरी जीवनाची लाज वाटावी, मोठी असली तरी वेळ मिळेल तशी ही कादंबरी आपण वाचावी, वर्तमानात आपण ज्या कुठल्या भूमिकेत जगत आहोत, त्या भूमिकेत जगताना समाजातील या सर्वात मोठया वर्गाचे भान आपल्याला राहावे, माणसाला प्रतिष्टा देण्याच्या सर्व खर्‍याखोट्या प्रयत्नातील अत्युच्च काळातही आपल्या पोशिंद्याच्या वाट्याला आपण किती खडतर जीवन दिले आहे, या जाणीवेने आपण आपल्या या ‘आईवडिलां’च्या नावाने आसवं गाळावीत आणि आपणही त्याच संघर्षातून येथपर्यंत पोहचला असाल तर हजारो वर्षांच्या बेंबीच्या नात्याची आठवण आपणास करून द्यावी, हाच या लेखनाचा उद्देश आहे.

या कादंबरीचा नायक पूर्व खांदेशातला खंडेराव विठ्ठ्ल हा तरूण आहे. तो आपल्या आयुष्यातील वाटचालीचे निवेदन करताना शेतकरी, त्याचा गावगाडा, त्याचे अर्थशास्त्र, नाती, जातधर्म याविषयी जे भाष्य करतो, याचाच विचार येथे केला आहे. ते भाष्य इतके अणकुचीदार आहे की त्याचे घाव सहन होत नाहीत. आणि ते इतके मुळातून आहे की विचारी माणसाची त्यातून सुटकाही होऊ शकत नाही.

‘गेल्या पाच हजार वर्षांत कोणती महानगरं टिकली आहेत? महानगरं उध्वस्त व्हायला कुर्‍हाडी न् रथ कशाला लागतात? ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो. शिवाय कच्चा माल येणं थांबलं, पाणी बंद झालं, पेट्रोल, गॅस संपले, व्यापार कोसळला, निसर्गाचा कोप, नदीनं पात्र बदलवलं, की हे फुग्यासारखे फुटतात. फाऽट फाऽट’ कादंबरीच्या सुरवातीलाच
शहरी माणसाच्या बुडाखाली नायक असा सुरूंग ठेवून मोकळा होतो आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतो.

कुणब्याच्या घरात सतत वाट पाहाणे कसे असते याविषयीः वार्‍याची वाट पाहा, पावसाची वाट पाहा, उन्हाची वाट पाहा, वर्षभर असंच. हेच तिफणीमागून फसाट्या ओढा—पाय लटपटताहेत, पण आटपा अंधार व्हायच्या आत...खराब धंदा...’ शेतीतील ही ताणाताणीचं नायक वर्णन करतो आणि त्याला ‘खराब धंदा’ असं नाव देवून टाकतो... शेतकरी घरातल्या मुलांविषयी तो म्हणतोः शेतकर्‍याच्या घरातली मुलं म्हणजे घड्याळातली लहानसहान चाकं. सतत मोठया चाकांकडून गरगर फिरवली जाणारी. काय सालं नशीब. हे रोजचचं’.

आणि धनजीची ही गोष्ट पहाः धनजी तरूणपणी अतिशय गरीब कष्टाळू कोरडवाहू शेतकरी होता. त्याची तरूण लाडाची बायको आणि दोन चिमणी मुलं पैशाअभावी औषधपाणी करता आलं नाही म्हणून तडफडून मेली. तेव्हापासून काळीज फाटून गेलेल्या धनजीच्या लक्षात आलं की, आयुष्याचं सार पैशातच आहे. नंतर एकट्या राहिलेल्या धनजीला पैशाचं इतकं खूळ लागलं की रात्रंदिवस काम, सतत काम, आणि मिळतील ते पैशे साठवून ठेवणं, एवढंच तो करत राहिला. खुर्द्याचे बंदे—पैंचा पैसा, पैशांचा अधेला, अधेल्यांचा आणा, आण्याची चवली, चवल्यांची अधेली आणि अधेल्यांचा एक बंदा कलदार झाला , की त्या रात्री दारंखिडक्या पक्क्या बंद करून आधीचे साठवलेले बंदे रूपये काढून तो तेच तेच पुन्हा पुन्हा वाजवत ह्या पैशांच्या नादब्रह्यात तल्लीन होऊन गेल्यावरच झोपी जायचा.

शेतकरी घरातल्या अस्थैर्याविषयी नायकाने म्हटले आहेः खंडू, सांग, शेतकरी कुणब्यांना कष्ट करूनही सुरक्षितता आहे ? आत्मप्रतिष्ठा आहे ? बलुत्यांना तरी कुठे आत्मप्रतिष्ठा आहे ? मोडताही येत नाही म्हणून उभयपक्षी चालूच राहणारी – हा कोणत्या नामुष्कीवाण्या गुलामगिरीचा प्रकार आहे ?

एका ठिकाणी दुष्काळाचं वर्णन आहेः एकसारखी तीन वर्ष आखाडीची गेली.पहिल्या वर्षी अतिवृष्टीनं पिकं गेली. वर्षभर घरातलं होतं ते रांधलं. महारमांग, भिल्ल, पावरा, कोरकूंनी रानातला झाडपाला ओरबाडून पोटं भरली. त्यानंतरच्या वर्षी ढ्ग नुस्ते वरून सरकताना दिसत होते. धोंड्या नाचवून, बेडक्या फिरवून काही उपयोग झाला नाही. दिवाळीत एक दिवा लागला नाही. कुणब्यांची घरं रिकामी झाली., तर शेतमजूर आणि बलुत्यांची काय पोटं भरणार ? गुरंढोरही मरायला लागली, त्यांना बाजारातसुद्धा कोणी घेईना. न विकल्या गेलेल्या आपल्या गुरांची नजर चुकवून शेतकरी त्यांना तिथेच बाजारात सोडून अपराधी चेहरे लपवत घरी परतायचे. त्यामुळे बाजाराच्या गावाभोवती मढीच मढी आणि गिरटया घालणारी गिधाडं. लहान शेतकरी चिंचेचा पाला खाऊन, मुळं उकरून त्यावर जगत राह्यले.

गरीब शेतकरी घरातल्या अभावांविषयीचे उल्लेख तर ठिकठिकाणी आले आहेत. त्यातला एक असाः साधेपणाला युरोपातले लोक दारिद्रय म्हणतात. पण त्यांना दुरूस्त करण्याआधी आपल्याकडे खरोखरच दारिद्रयसुद्धा आहे, ते दुरूस्त केलं पाह्यजे. म्हणजे कसं खंडेरा्व? हे बघ, सण उत्सवसुद्धा कमी खर्चात--- गणेशचतुर्थीला शिव्या देणं, दिवाळीला घरातल्याच वस्तूंचा फराळ, पणत्या, तेल, वाती, होळीला एक पुडी रंग—कमी खर्चात मजाच मजा. भावडूचा सदरा खंडूला बसतो आहे, घाल थोडे दिवस, दसर्‍यालाच नवीन घेऊ. परकर तर थेट बिजापासून फाटत फाटत छबी, सुभी, शशी नंतर गिर्‍हानात आंबूमायकडे. किंवा भावडूची फाटकी बनियन मळ्यातल्या गिरधर राखोळ्यासाठी राखून ठेवणं.

गरीबांवर गुलामगिरी कशी लादली जाते , यावर केलेले हे भाष्य बघाः काय असतं खंडू – तू चांगला शीक वरपर्यंत. पैसा आहे तुझ्या घरी. एम.ए. पीएचडी कर. – मग तुला कळेल की, गुलामगिरी हळूहळू रक्तात मुरत जाते. लोकांनी मान वर न करता जगावं, सत्तेवरच्या माणसांना उलटं न विचारता, डोळ्याला डोळा न भिडवता कशालाही हो म्हणत जावं, सत्ता ज्या वर्गाच्या हातात आहे ते सांगतील, तसंच करायची सवय लागते.

आणि न्यायदानातील अव्यवस्था आणि अज्ञानाविषयीः कुणाकडे न्याय मागणार? कुठे असतं न्यायालय ? इंग्रजीत काम चालतं तिथे, दहा दहा वर्ष, आणि वकील पूर्ण भादरून टाकतो. मग आपले निःसत्व लोक म्हणतात, जाऊ द्या, दुष्टाला देव बरोबर शिक्षा करील. तळतळाट जिरत नाहीसा होतो.

अशी उदाहरणे द्यायला येथे मर्यादा आहेत. ते मुळातूनच वाचलं पाहिजे. यातली काही वर्णन स्वातंत्र्यापुर्वीचे आहे, पण खेड्यांच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने काळाचा असा कितीसा फरक पड्ला आहे ? ‘ दुष्काळामुळे शेतकरी खलास झाले, पण सुधारले साले वाणी सावकार मारवाडी व्यापारी. वडील म्हणतात, शेतीचं असंच होणार आहे. कसेल तो फसेल.’ आता हा उल्लेख आहे स्वातंत्र्यापुर्वीचा. पण आजही तो लागू पडतो !

असं बरच काही. आज ते कादंबरीतलं असलं तरी ज्यांनी हे आयुष्य प्रत्यक्ष पाहिल आहे, त्यांना त्याची तीव्रता लक्षात येईल. आज गावगाडा बदलला असं आपण म्हणतो खरं पण त्या बद्लात संस्कृतीचे साखळदंड बांधलेले आहेत आणि बांडगुळं म्हणूनच जन्माला येणारी पिढी आपल्या बापजाद्यांचा अधिकार असल्यासारखी या शोषणात भाग घेताना दिसते आहे. भालचंद्र नेमाडेंनी याला एकेठिकाणी सहा हजार वर्षांपासून चालू असलेला पांढरी—काळीचा झगडा म्हटलं आहे. हा झगडा अजूनही संपलेला नाही तर !

यमाजी बाळाजी मालकर / ymalkar@gmail.com