Sunday, October 3, 2010

पोरखेळाला उत्तर

पीपली लाइव्ह चित्रपट पाहिला नसेल तर जरुर पाहून घ्या. त्याची कारणेही सांगितली पाहिजे. त्याचे पहिले कारण म्हणजे आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर यायला तो मदत करतो. दुसरे म्हणजे आपण जे अनुचित वागत, बोलत आणि जगत असतो त्याची आपल्याला लाज वाटायला लागते. तिसरे म्हणजे ज्या माध्यमांना आपण डोक्यावर बसवून ठेवले आहे, त्यातला फोलपणा लक्षात यायला मदत होते आणि केवळ माध्यमांच्या निकषांवरील आपल्या जगण्याचे मोजमाप करण्यापासून आपण दूर राहू शकतो. चौथे म्हणजे आपल्या लोकशाहीचा आपल्याला अभिमान वाटतो, की व्यवस्थेवरील एवढी तिखट प्रतिक्रिया आपण नागरिक म्हणून पाहू शकतो. (पंतप्रधानांनीही हा चित्रपट पाहिला, अशी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या प्रकारच्या व्यवस्थेचे आपण नेतृत्व करतो, या विचाराने त्यांना वाईट वाटले असेल का ? आणि वाटले असेल तर त्यांनी त्यांच्या मनाशी ती सुधारण्यासाठी काही निश्चय केला असेल का ?) पाचवे कारण म्हणजे थेट साध्या माणसाचे चित्रण इतके परिणामकारक करणारे, त्यावर पैसा खर्च करणारे तंत्रज्ञ, कलाकार आपल्यात आहेत, याचाही आनंद होतो.
पीपली लाइव्हचा मी प्रचारक नाही आणि तो पाहून मी भारावलो, असेही नाही. त्याच्या आडून होणार्‍या आर्थिक व्यवहारांची आणि हितसंबंधांची मला कल्पना आहे. हा चित्रपट पाहून लगेच काही बदल होईल, या भ्रमात मी नाही. मात्र सध्याच्या निलाजर्‍या प्रदर्शनात एखादे खेडे, खेड्यातील गरीब माणसे, त्यांची सुखदुःख मल्टीप्लेक्सच्या पडद्यावर गर्दी करुन पाहिले जाते आणि ते पाहून माणसे अंतर्मुख होतात, हेही नसे थोडके. चित्रपट पाहून सवयीने नको तेथे अनेकांना सुरवातीला हसू येते, हेही समजण्यासारखे आहे.मात्र अखेरीस आपण किती सुखी आहोत आणि म्हणूनच आपण उतमात करायला नको, असा संदेश घेवूनच संवेदनशील माणसं बाहेर पडतात, हे महत्वाचे.
काही माध्यमांनी आपल्या देशात जो उच्छाद मांडला आहे, त्याविषयी दररोज काहीनाकाही बोलले, लिहीले जाते आहे. त्याचा निषेध केला जातो आहे. त्याच त्याच बातम्या, असंवेदनशील चित्रण, वार्तांकनातला पोरकटपणा आणि आर्थिक हितसंबंध याविषयी बरेच बोलून झाले आहे आणि बोलत राहावेच लागणार आहे. पीपली लाइव्हने माध्यमांमधील हे गैरप्रकार अशा पद्धतीने वेशीवर टांगले आहेत की माध्यमातील विचारी माणसांची मान शरमेने खाली जावी. दारिद्रयाचा प्रश्न मांडता मांडता हा चित्रपट माध्यमांतील गैरप्रकारांकडे म्हणजे त्याच्या मूळ विषयाकडे सरकतो. एक प्रकारे तो माध्यमातील आर्थिक आणि बौध्दिक दारिद्रयाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. आणि मग या दारिद्रयावर एकापाठोपाठ एक आसूड ओढतो.
मग लक्षात येते की हा सर्व ( पोर ) खेळ टीआरपीसाठी चालला आहे. कारण टीआरपीच्या क्रमानुसार जाहिराती मिळतात आणि जाहिराती मिळविणे, हा चॅनेलांचा मूळ उद्देश आहे. मग त्यांना जगातला कोणताही विषय वर्ज्य नाही. यातला श्लेष आपण लक्षात घेतला पाहिजे. हे विषय पाहणारे प्रेक्षक म्हणजे ‘आपण’ आहोत. ‘आपली’ खुशामत करण्यासाठी हा सर्व पोरखेळ चालला आहे. कारण आमच्यातील अनेकांना किंवा बहुतेकांना अजून या पोरखेळांचेच आकर्षण आहे!
हे आपल्याला नकोसे झाले आहे, त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे, असे आपण म्हणतो खरे मात्र त्याची सुरवात प्रेक्षक आणि वाचकांपासूनच करावी लागणार आहे, हे आपण विसरतो. कोणते वर्तमानपत्र वाचायचे आणि कोणते चॅनेल पाहायचे, हे तर आपण ठरवू शकतो. ‘रिमोट नेहमी प्रेक्षकांच्याच हातात असतो’ असे म्हणतात, ते या अर्थाने 100 टक्के खरे आहे. अर्थात लोकरेट्याला बळी न पडण्याची हिंमत आणि बळ आमच्या वाचक, प्रेक्षकांमध्ये अद्याप यायचे आहे. काही वर्तमानपत्रांनी पेडन्यूजचा जो अंदाधुंद धंदा सुरु केला आहे, त्यांनाही धडा शिकविण्याची वेळ आली आहे. माध्यमातील या वाढत्या गैरप्रकारांनी समाजाचे स्वास्थच संकटात सापडले आहे.. केवळ आर्थिक हितसंबंध पाहणारी माध्यमे कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे अतिशय हुबेहूब चित्रण पीपली लाइव्हत केले गेले आहे. मला असे वाटते की वाचक आणि प्रेक्षक परिपक्व होण्यासाठी ते फार उपयुक्त ठरणार आहे. माध्यमांतील धंदेवाईकपणा, पोरकटपणा आणि स्पर्धा यामुळे समाजाचे होणारे नुकसान सुजाण वाचक, प्रेक्षकच रोखू शकणार आहेत. चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाचा निषेध नोंदविणे, ही कृती छोटी दिसत असली तरी अशा छोट्या छोट्या कृतींमधूनच समाजमन घडत असते.


- यमाजी बाळाजी मालकर / ymalkar@gmail.com

No comments:

Post a Comment