Saturday, February 7, 2015

२०१५ – भारताला सुवर्णसंधी देणारे वर्ष !२०१५ हे नवे वर्ष भारताला आणखी एक संधी देणारे वर्ष असेल. भारतातील आर्थिक बदलाचा पाया २०१४ ने घातला असून त्यावर उंच इमारत बांधण्यास यावर्षात सुरवात होईल. भारतात विकास झाल्याशिवाय म्हणजे नवा ग्राहक निर्माण झाल्याशिवाय जग चालू शकत नाही, हे २०१५ सिद्ध करेल. जगाच्या लोकसंख्येशी तुलना करायची तर दर सात माणसांत एक भारतीय माणूस आहे. त्यामुळेच भारताची क्रयशक्ती (ती सर्वव्यापी नसली तरी) आज जगात तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. आणि त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. युरोपखंडात तसेच जपान, रशिया अशा देशांत मंदी ठाण मांडून बसली असून आर्थिक व्यवहारांना गती दिल्याशिवाय ती हटणार नाही. आर्थिक व्यवहारांना गती द्यायची म्हणजे क्रयशक्ती नसलेल्या भारतातील ३० कोटी नागरिकांची क्रयशक्ती वाढवायची. त्यासाठी रोजगारसंधी वाढल्या पाहिजेत. त्या २०१५ मध्ये वाढतील आणि भारत जगाच्या केंद्रस्थानी असेल.

अर्थात भारताला त्यासाठी स्वत:चे घर सावरावे लागेल. ते स्वच्छ करावे लागेल. आज जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक उलाढाल भारतात होते. मात्र ती होते ७० टक्के काळ्या पैशांत! म्हणजे दररोज होणारे कोट्यावधीचे रोखीचे व्यवहार. १०००, ५०० अशा अधिक मूल्यांच्या नोटांनी भारताचा घात केला आहे आणि ‘रोगराई’ पसरविणाऱ्या भांडवलाला प्रोत्साहन दिले आहे. या करंटेपणाचा आपल्याला त्याग करावाच लागेल. १०००, ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांनी भारतीय अर्थव्यवस्था पोखरून काढली आहे. म्हणूनच त्या नोटा बदलण्याचा सोपस्कार सध्या सुरु आहे. मात्र गरज आहे ती या नोटा व्यवहारातून बाद करण्याची. कारण त्या नोटा जोपर्यंत हद्दपार होत नाहीत तोपर्यंत भारतीय नागरिकांना बँकेत व्यवहार करण्याची सवय लागत नाही आणि त्यामुळे देशाचे भांडवल स्वच्छ होत नाही.

भारतात सार्वजनिक सेवांची हेळसांड का होते आहे, हा प्रश्न २०१४ ने टोकदार केला आहे. आतापर्यंत असे भासविले गेले की विकसित देशांच्या तुलनेत भारतीय माणूस कमी पडतो आहे. कोणी म्हणतो तो काम करत नाही. कोणी म्हणतो तो प्रामाणिक नाही. कोणी म्हणतो तो शिस्तबद्ध नाही. कोणी म्हणतो त्याला कायदे पाळायचे नाहीत. भारतीय माणसाला म्हणजे आपणच आपल्याला बदनाम करण्याची जणू शर्यत लागली आहे. मात्र हा कावा आता अनेक नागरिकांना लक्षात येवू लागला आहे. आपण काम करतो, रक्त आटवितो, घाम गाळतो आणि त्यातून निर्माण होणारा पैसा कसा परदेशांत जातो किंवा ‘काळा’ होऊन आपल्याच जीवावर कसा उठला आहे, हे आता अनेकांना कळू लागले आहे. म्हणूनच काळ्या पैशांची जेवढी चर्चा गेल्या वर्षभरात झाली, तेवढी ती या देशात कधीच झाली नव्हती. ती एक चांगली सुरवात आहे!

बँकिंगचे फायदे आता आपण सर्वांनीच समजून घेतले पाहिजेत. सुदैवाने सरकारने याचे महत्व जाणले आणि ‘जन धन’ योजना आणली. या योजनेत आतापर्यंत सात कोटी नागरिकांनी खाती उघडली आणि एरवी रोखीतच राहिले असते असे ५००० कोटी रुपये बँकांत जमा केले, यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते? बँकिंगविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत, ते कमी करण्याची गरज आहे. विकसित देशांनी बँकिंग स्वीकारले आणि देशाला लागणारा स्वच्छ भांडवलाचा प्रश्न सोडवून आपल्याला स्वप्नवत वाटतात, अशा पायाभूत सोयी निर्माण केल्या, एवढे एकच उदहारण बँकिंग ठसविण्यासाठी पुरेसे आहे.

बँकिंगचा पुढचा टप्पा आहे – गुंतवणुकीचा. हा मंत्र ज्याने समजून घेतला ते आपल्याच देशाचे लाखो नागरिक आज कोट्यधीश झाले आहेत. त्यांचा हेवा करून काहीच फरक पडणार नाही. त्यांनी कष्ट करून पैसा कमविला आणि पैशाला कामाला लावले. म्हणजे गुंतवणुकीचे चांगले मार्ग निवडले. शेअरबाजार, म्युच्युअल फंड, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, बँक ठेवी, मालमत्ता, सोने असे गुंतवणुकीचे शेकडो मार्ग सध्या उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. भविष्यकाळातील गरजा भागविण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. या सर्व गुंतवणुकीचा मार्ग बँकिंगमधून जातो, त्यामुळे आज देशात ५० टक्के असलेले बँकिंग १०० टक्के होण्याची गरज आहे. २०१५ मध्ये भारत बँकिंगचा पुढील टप्पा गाठणार आहे.

असे खूप काही २०१५ मध्ये होणार आहे. भारताला ही सुवर्णसंधी देणाऱ्या वर्षांत ‘अर्थपूर्ण’ नव्या स्वरुपात आपल्याला मिळणार आहे. हे नवे स्वरूप आपल्याला कसे वाटते, हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
नव्या वर्षाचे ‘स्वच्छ पैशां’नी स्वागत करू यात. भारताच्या या सुवर्णसंधीचे भागीदार होऊ यात!