Saturday, September 20, 2014

अशीही धनदांडगाईविजय मल्ल्यांसारख्या टग्या, मोठ्या माशांना कायद्यानुसार वेळीच शिक्षा होते, हे भारतीय नागरिकांसमोर वेळोवेळी येवू दे. देशाची संपत्ती बँक व्यवस्थेत सुरक्षित आणि सर्वांसाठी भेदभावाविना उपलब्ध आहे, हे सर्वांना पटू दे. आणि स्वच्छ भांडवलाचा रस्ता निवडल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, या सुविचाराचा जप देशात सतत सुरु राहू दे!

नव्या सरकारने १५ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या पंतप्रधान जन धन योजनेत एक तरतूद आहे. ती अशी की बँक व्यवहारांच्या फायद्यापासून जे वंचित राहिले आहेत, त्यांचे बँकेत खाते तर सुरु होईलच, पण ते जर पुढील सहा महिने चांगले चालले तर त्यास पाच हजार रुपयांचे कर्ज मिळेल. हे जेव्हा जाहीर झाले त्यावेळी आता बँका बुडीत निघणार, अशी आवई काही दीडशहाण्यांनी उठविली. गरजू, गरीब माणूस कर्ज फेडत नाही, असे अशा शहाण्यांना म्हणायचे असते. मात्र कर्ज फेडले जात नाही म्हणून झोप उडालेली सामान्य प्रामाणिक भारतीय माणसे पाहिल्यावर अशा शंकांना काही अर्थ उरत नाही. सामान्य माणूस बँकांशी जोडला जाणे, ही काळाची गरज असून ती पूर्ण करणाऱ्या अशा सर्व योजनांचे स्वागतच केले पाहिजे. इकडे ही चर्चा देशात सुरु असताना १७ बँकांना गंडा घालणाऱ्या रंगेल, गुलछबू, उडाणटप्पू, ‘लिकरकिंग’ विजय मल्ल्या यांना ‘दिवाळखोर’ (विलफुल डिफॉल्टर) जाहीर करण्यात आले होते. त्यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर या कंपनीवर किमान सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज असून ते बुडविल्यामुळे ते दिवाळखोर झाले आहेत. त्यांनी अनेक बँकांत खाती काढून घेतलेले कर्ज वेगळ्याच कारणांसाठी वापरले आहे. युनायटेड बँक ऑफ इंडियाने प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर हे पाउल उचलले आहे. सुब्रतो रॉय, मल्ल्यासारखे असे अनेक कर आणि कर्ज बुडवे श्रीमंत आपल्या देशात आहेत. त्यांची वैयक्तिक संपत्ती त्या कर्जापेक्षा कितीतरी अधिक आहे, मात्र कायद्यातील पळवाटा शोधून ते उजळ माथ्याने वावरत असतात. रॉय हे गेले सहा महिने तुरुंगात आहेत आणि आता मल्ल्या त्या दिशेने चालले आहेत, एवढाच काय तो दिलासा.

युनायटेड बँक ऑफ इंडियानंतर आयडीबीआय बँकेनेही ते पाउल उचलले आहे, त्यामुळे आता मल्ल्या यांना कोठूनही नवे कर्ज मिळणार नाही. त्यांचे संचालकपद रद्द होईल. ते बँकेतून पैसे काढू शकणार नाहीत. उद्योग व्यवसाय चालण्यासाठी महत्वाची मानली जाणाऱ्या जी क्रेडीट हिस्ट्री असते, तिच्यावर मोठा डाग पडेल. त्यांचा समावेश असलेल्या कंपन्यांचे शेअर घसरत राहतील. याचाच अर्थ त्यांची संपत्ती कमी होत जाईल. एकीकडे हे सर्व चालले असताना मल्ल्या मात्र ही कारवाई मान्य करायला तयार नाहीत. दिवाळखोरीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांची तयारी सुरु आहे. कदाचित न्यायालयाला ते पटविण्यात मल्ल्या यशस्वी होतील आणि संपत्तीचा हा चुराडा असाच सुरु राहील.

ज्या विजय मल्ल्यांविषयी आपण बोलत आहोत, ते काही साधे प्रकरण नाही. हे ५८ वयाचे बंगळूरस्थित मल्ल्या म्हणजे विठ्ठल मल्ल्या नावाच्या राज्यसभा सदस्य आणि उद्योगपतींचे चिरंजीव. युनायटेड ब्रुअरीज नावाच्या मद्याच्या कंपनीची त्यांनी प्रचंड भरभराट केली आणि किंगफिशर एअरलाईन्स, युनायटेड स्पिरीट, युबी होल्डिंग, मंगलोर केमिकल्स अशा अर्धा डझन कंपन्या काढल्या. पैशाला पैसा जोडून अतिश्रीमंत होण्याची शिडी कशी चढायची, यात मल्ल्यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळेच किंगफिशर कॅलेंडरसारखे चाळे करून, दोन लग्ने करून, खेळांवर पैसे उधळून आणि अमेरिकेतही मालमत्ता करणाऱ्या मल्ल्यांच्या संपत्तीचे ढीग वाढतच गेले. संपत्तीची ही उड्डाणे इतकी उंच गेली की जगातील अतिश्रीमंतांची मोजदाद करणाऱ्या फोर्ब्सच्या यादीत त्यांचा समावेश होऊ लागला. देशातील ते मान्यवर उद्योजक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कंपन्यांचे शेअर चढू लागले. त्यांनी मद्याचे उत्पादन एवढे वाढविले की मद्यउत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकाचा तुरा त्यांच्या डोक्यावर डोलू लागला. येथपर्यंत सर्व ठीक होते, मात्र आपण याच गतीने सर्व क्षेत्रात संचार करू शकतो, असा समज झाला आणि किंगफिशर एअरलाईन्समधील तोट्याने मल्ल्यांचे विमान खाली येवू लागले. ते इतके खाली आले की कर्मचाऱ्यांचे पगार थकले. सरकारकडे भरण्याचा टीडीएस थकला. विमाने पार्क केलेली आहेत, त्याचे भाडेही कंपनीला सोसवेना. कंपनी दिवाळखोरीत निघाली. एकीकडे कंपनी दिवाळखोरीत निघाली तरी मल्ल्या मजेत आहेत. त्यांचा सर्वत्र संचार आणि पार्ट्या सुरु आहेत. कर्मचारी केसेस करत आहेत. बँका खटले चालवत आहेत. सरकारची विविध खाती वसुलीसाठी धडपडत आहेत. किंगफिशर एअरलाईन्सने ४०१ कोटी रुपये टीडीएस भरलेला नाही. पण मल्ल्यांना काही फरक पडला नाही. कारण हा पैसा सरकारी बँकांचा आहे. आता वसुलीची जबाबदारी बँकांची आहे. पण कायदेच असे आहेत की मोठ्या कर्जदाराला सहजासहजी हात लावता येत नाही. आणि लावला तरी त्यांच्याकडे वकिलांचा ताफाच असा असतो की कायद्याच्या पळवाटा शोधून काढून वेळ मारून नेली जाते. मल्ल्या असाच वेळ मारून नेत आहेत. खरे म्हणजे मल्ल्या यांच्याकडे असलेली संपत्ती आजही एवढी आहे की ठरवले तर ते कर्जमुक्त होऊ शकतात. मात्र तसे होत नाही. व्यवस्थाच अशी आहे की ती पैशाला शरण जाते, तशी ती या प्रकरणातही शरण गेली आहे.

लोकशाही व्यवस्थेत असे मल्ल्या घडतात कसे, हे पाहिले पाहिजे. आज मल्ल्या किमान सहा हजार कोटी रुपयांचे धनी आहेत. मल्ल्यांची आजची ओळख उंची पार्ट्या, अलिशान गाड्या, फोर्मुला वन चे मालक अशी आहे. ते चार वर्षांचे होते तेव्हा वडिलांनी त्यांना फेरारी गाडीचे मॉडेल भेट दिले होते! मल्ल्या वर्षातून एकदा साबरमलाईचे दर्शन घेतात. एकापाठोपाठ एक अशी विमाने घेतली तेव्हा त्यांनी सर्व विमाने तिरुपतीला दाखवून आणली. मल्ल्या दागिन्यांचे शौकीन आहेत. त्यामुळे रत्नजडित दागिने अंगावर नाहीत, असे कधी होणार नाही. नव्या व्यवसायाची सुरवात किंवा महत्वाच्या ठिकाणी जाण्याची वेळ ते मुहूर्त पाहून ठरवितात. इंग्रजीसह सहा भाषा ते बोलू शकतात. त्यांना लाल रंग आवडतो, त्यामुळेच त्यांच्या विमानांची कलरस्कीम लाल होती. समीरा या पहिल्या पत्नीपासून झालेला सिद्धार्थ हा त्यांचा पहिला मुलगा आणि दुसरी पत्नी रेखापासून झालेल्या दोन मुली म्हणजे लीना आणि तान्या. या दोन्हीही मुली आईसोबत अमेरिकेत असतात. राजकारणात टगे असतात, तसे टगे उद्योग व्यापार क्षेत्रातही असतात की! तसे मल्ल्या टगे आहेत. आणि या टगेगिरीचा आधार ‘एम टॉनिक’ म्हणजे पैसा आहे.

पैसा कसा जिरवायचा, हे ज्यांना कळाले त्यांनी अनेक क्लुप्त्या केल्या आणि पैसा आपल्याकडेच येत राहील आणि तो चांगला वाढत राहील, अशी व्यवस्था केली. लोकशाहीत संपत्ती निर्माणाचा आणि बाळगण्याचा अधिकार सगळ्यांच आहे. मात्र ही शर्यत पक्षपाती आहे. त्या पक्षपाताचा पुरेपूर फायदा मल्ल्यासारखे टगे घेतात. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन ते बुडविणे, ते देणे शक्य असताना ते न देणे आणि अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर सुरु झालेल्या कारवाईला आव्हान देवून वेळ मारून नेणे...ही टगेगिरीच आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे तो आपला, आपल्या देशाचा पैसा आहे. तो कसा, कुणाला दिला जातो, तो कसा वापरला जातो आणि किचकट कायदे आणि कररचनेचा आधार घेऊन लोकशाही व्यवस्थेवर कसे बलात्कार केले जातात, हे लक्षात ठेवले पाहिजे. ते थांबविण्यासाठी पारदर्शी आर्थिक व्यवहारांचा आग्रह धरला पाहिजे. तूर्तास दिवाळखोरी जाहीर केल्याने मल्ल्यांची प्रचंड आर्थिक कोंडी होवो, बँकेचे कर्ज फेडण्याची सुबुद्धी त्यांना तिरुपती देवो आणि कर्ज बुडविण्याचेच मनात असेल तर त्यांना तुरुंगवास होवो, अशी प्रार्थना करू यात.

अशा मोठ्या माशांना कायद्यानुसार वेळीच शिक्षा होते, हे भारतीय नागरिकांसमोर वेळोवेळी येवू दे. देशाची संपत्ती बँक व्यवस्थेत सुरक्षित आणि सर्वांसाठी भेदभावाविना उपलब्ध आहे, हे सर्वांना पटू दे. आणि स्वच्छ भांडवलाचा रस्ता निवडल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, या सुविचाराचा जप देशात सतत सुरु राहू दे!