Friday, July 11, 2014

हे असे कितीक खेळ..!


मराठी भाषा (न) बोलण्याच्या या ‘इश्यू’ ने मराठी समाजात एक वेगळेच दालन खुले झाले आहे. हा असा खेळ आहे, ज्यात कोणीच हरत नाही. इंग्रजीत त्याला ‘विन विन सिच्युएशन’ म्हणतात. मराठीत त्याला म्हणे शब्दच नाही. कारण अशा सर्व प्रसंगांत नेहमीच इंग्रजी जिंकली आहे!

भोसरी असे मराठमोळे नाव असलेल्या आणि मराठीचे माहेरघर मानल्या गेलेल्या पुण्यनगरीच्या आहारी गेलेल्या नगरातील ही घटना. तेथे प्रियदर्शनी असे छान शंभरटक्के भारतीय नाव असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत ही घटना घडली. त्या शाळेत, जो आठवीचा वर्ग आहे, त्यातील काही मित्र आपले म्हणणे आपल्या मित्रांना कळावे म्हणून, त्यांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत बोलताना रंगेहाथ पकडले गेले. नाहीतर ती लपूनछपून मराठी बोलतातच. कारण त्यांना अजून चांगली इंग्रजी बोलता येत नाही आणि मराठी बोलताना आता आता ती अडखळू लागली आहेत. म्हणजे ‘थर्ड लँगवेज’ मराठीही त्यांना आता नीट बोलता येत नाही. आपल्या इंग्रजी शाळेतील मुले अशी मराठीत बोलू लागली तर आपल्या शाळेचा लौकिक कसा वाढणार आणि आपल्या शाळेतील मुले साहेब कशी होणार, या चिंतेने सिंग नामक कदाचित हिंदी ही मातृभाषा असलेल्या मात्र ती त्यांना अजिबात येत नसलेल्या संचालकाने मुलांना सडकून काढले. मुलांच्या हातापायावर काळेनिळे वळ उमटले म्हणे. हे पालकांना कळाले तेव्हा त्यांना घडीभर वाईटच वाटले, मात्र मनातून त्यांना आनंदच झाला की छडी लागे छम, विद्या येई घम घम, असे शिक्षण देणारे कोणीतरी आहे तर ! पण ही बातमी कसे कोणा ठाऊक, पण निवडणुकीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या काही उतावीळ पुढाऱ्यांना कळाली आणि एकच हल्लागुल्ला सुरु झाला. जमाव जमला आणि शाळेत मागील दराने घुसून सिंगला पकडून धडा शिकविण्याची भाषा सुरु झाली. पण तो काही सापडला नाही. पोलिसांनी त्याच्या अटकेचे आश्वासन दिले तेव्हा कोठे हा गदारोळ थांबला. आता पुढे काय होते, ते पाहायचे.

आमचे मत विचाराल तर त्या सिंगाचा जाहीर सत्कार आयोजित करून पालकांनी त्यांना एक भोसरीरत्न पुरस्कार देऊन टाकला पाहिजे. त्याची दोनतीन कारणे आहेत, त्यातील पहिले असे की ही घटना ज्यादिवशी घडली त्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचे केंद्रात शिजत होते म्हणे. त्या मुहूर्तावर सिंगांनी मुलांना मराठी बोलल्याबद्दल मारहाण करणे, हा जो योगायोग त्यांनी जुळून आणला आहे, त्याला मराठी भाषेच्या इतिहासात तोड नाही. ज्या भारतीय भाषेला अभिजात दर्जा दिला जातो, तिची गत काय होते, हे सिंगांइतके कोणास ठाऊक असणार? तो काय साधासुधा मराठी माणूस हाय? तो एका इंग्रजी शाळेचा पैसा मोजणारा संचालक आहे! दुसरे कारण म्हणजे या देशात इंग्रजी बोलण्याचे काय महत्व आहे, हे आता त्या मुलांना कोणी सांगण्याची गरजच नाही राहिली. त्यांच्या हातापायावरचे काळेनिळे वळ आयुष्यभर त्यांच्या कायम लक्षात राहतील. त्यांच्या पालकांना खूप वाटते, आपल्याला नाहीतर आपल्या मुलांना तरी इंग्रजी बोलता आले पाहिजे. पण मराठीत कितीही आरडाओरडा करून ती ऐकतच नव्हती! आता पालकांना आयुष्यभर या कारणासाठी आरडाओरड करावी लागणार नाही.

या घटनेचा आणखी एक पैलू आहे, तो असा की सिंगांनी या ‘केस’ मध्ये ओरडा करणाऱ्या सर्व पुढाऱ्यांना आणि पालकांना मानाने शाळेत बोलावून त्यांना हारतुरे दिले पाहिजेत. त्याचे कारण म्हणजे भोसरीच्या प्रियदर्शनीमध्ये मुलांना एकमेकांत मराठीत बोलण्यास मज्जाव आहे, त्यामुळे तेथेच आपली मुले भडाभडा इंगजी बोलणे शिकू शकतात, अशी कीर्ती याच आरडाओरडयामुळे सर्वत्र पोचणार. त्यामुळे आता पुढील वर्षी त्या शाळेत आपल्या लाडक्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून मध्यरात्रीपासून रांगत रांगा लागतील आणि प्रवेश मिळाल्यावर धन्यता वाटेल. इतकी की सिंग किती जास्त फी मागतात, याचेही भान पालकांना राहणार नाही. या आरडाओरडीने सिंगसाहेबांचा हा जो फायदा झाला आहे, तो किती पैशांत मोजला जाणार, हे कोणीही सांगू शकणार नाही! राहिला प्रश्न पुढाऱ्यांचा. तर त्यांचे सिंगसाहेबांना फोन येतील की आमच्या मुलांना प्रवेश द्या, आम्ही काही मध्यरात्री रांगत रांगेत उभे राहणार नाही. आमचाही काही मान आहे! पण आमच्या मुलांना इंग्रजी भडाभडा ओकता आली पाहिजे. आमची जी अडचण झाली ती आमच्या मुलांची होणार नाही, एवढे बघा सिंगसाहेब! पोलीसकेसचे काय करायचे, असा एक प्रश्न अनिर्णीत राहील, पण तो किरकोळीत चिरीमिरीने सुटू शकतो.

मराठी भाषा (न) बोलण्याच्या या ‘इश्यू’ ने मराठी समाजात एक वेगळेच दालन खुले झाले आहे. हा असा खेळ आहे, ज्यात कोणीच हरत नाही. इंग्रजीत त्याला ‘विन विन सिच्युएशन’ म्हणतात. मराठीत त्याला म्हणे शब्दच नाही. कारण अशा सर्व प्रसंगांत नेहमीच इंग्रजी जिंकली आहे! ते पहा, तिकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर होतो आहे! (जय महाराष्ट्र...वाजवा तुतारी)

(सौजन्य - दैनिक दिव्य मराठी)

No comments:

Post a Comment