Thursday, July 3, 2014

कधी संपणार करांचा दहशतवाद ?जगासमोर दहशतवादाचा धोका आहे, असे आपण म्हणतो. तसा धोका सध्या भारतीय नागरिक अनुभवत आहेत आणि त्या धोक्याचे नाव आहे- करांचा दहशतवाद. किमान ३२ प्रकारच्या करांनी त्याचे जगणे कठीण आणि कटकटीचे करून टाकले आहे. आधुनिक जगात साऱ्या जगाशी स्पर्धा करण्यास सांगितले जाते, मात्र भारतीय नागरिक या स्पर्धेत केवळ करांच्या जंजाळात फसल्याने मागे पडतो आहे. एवढेच नव्हे तर त्याची बचत आणि खर्च करण्यावरही करांमुळे मर्यादा आली आहे. व्यवहार का वाढत नाहीत आणि मंदीसदृश्य स्थिती का बदलत नाही, याचे एक प्रमुख कारण हा करांचा दहशतवाद आहे. करपद्धतीत बदल केल्याशिवाय देशातील इतर बदल गती घेऊ शकणार नाहीत, हे आता अनेकांना पटू लागले आहे.

उद्योग व्यवसाय करण्यास कोणते देश चांगले आहेत, याची जी १८५ देशांची यादी जागतिक बँकेने तयार केली आहेत, त्यात भारताचा नंबर १५२ इतका खाली आहे. अर्थात ही गोष्ट आपल्याला जागतिक बँकेने सांगितली पाहिजे, असे अजिबात नाही. आपण आपल्या मालमत्तेचा व्यवहार करण्यास, पासपोर्ट काढण्यास किंवा महापालिकेचा कर भरण्यास बाहेर पडलो तरी हा दहशतवाद कसा काम करतो, याची चुणूक पाहायला मिळते. सर्व ३२ करांना आपण एकाचवेळी हात लावू शकत नाही, मात्र किमान उद्योग व्यवसायांना तरी त्यातून लवकर मोकळे केले पाहिजे, असा विचार करून जीएसटीवर (वस्तू आणि सेवा कर) विचार सुरु झाला. हा कर सध्या जगातील १४० देशांत अस्तित्वात आहे आणि फ्रांसमध्ये ५० वर्षांपूर्वी तो सुरु झाला आहे. भारताला खरे तर अर्थक्रांती सांगते तशा बँक व्यवहार कराचीच गरज आहे, मात्र एक मधला मार्ग म्हणून आपण जीएसटीकडे पाहू शकतो. पण जीएसटीची अमलबजावणी कधी होईल, हे आज कोणीच सांगू शकत नाही. एप्रिल २०१० पासून देशभर जीएसटी लागू होईल, असे त्यावेळचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००९ च्या अर्थसंकल्पात म्हटले होते. त्याला आता पाच वर्षे झाली. मधल्या काळात भारतीय नागरिक, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार किचकट करपद्धतीमुळे त्रस्त झाले आहेत आणि त्यातून सुटका होण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत.

करविषयक विषय आता कसे महत्वाचे ठरू लागले आहेत, याचे आणखी एक उदहारण म्हणजे टोल आणि एलबीटी. सरकारकडे पैसे नाहीत म्हणून सरकारने खासगीकरणाला इतका वेग दिला आहे की आता रस्तेही खासगी उद्योजक बांधू लागले आहेत. पण रस्त्यात अडवून घेतला जाणारा टोल भरणे जनतेला मान्य नाही. त्यामुळे त्यावरून राज्याराज्यात गदारोळ सुरु आहे. जकातीच्या विरोधात असाच राग व्यक्त झाला आणि मुंबईबाहेर जकात बंद झाली. त्याची जागा आता एलबीटीने घेतली आहे. पण त्यावरूनही वाद सुरु झाला असून आगामी निवडणुकीपूर्वी तोही कर रद्द होऊ शकतो. पण कर वसूल करणे हा सरकारचा घटनात्मक अधिकार असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व सरकारे करांच्या महसुलावरच जिवंत असल्याने करांची नावे तेवढी बदलून नवे काही केल्याचा देखावा उभा राहतो आहे. या विषयावर करदात्यांचे शिक्षण करण्याऐवजी सरकार तात्पुरते मार्ग अवलंबत आहे. यातून प्रशासनाची घडी तर विस्कटणार आहेच, पण नागरी सेवांवर विपरीत परिणाम होणार आहेत. आम्ही कर भरायला तयार आहोत, मात्र करांच्या जंजाळातून आमची सुटका करा, कर सुटसुटीत करा, असे म्हणणारे आपल्या मागणीशी प्रामाणिक असतील तर त्यांनी सर्व व्यवस्था आणि देशाचे भांडवल शुद्ध करणाऱ्या अर्थक्रांतीच्या बँक व्यवहार कराची मागणी केली पाहिजे. या कराने करपद्धतीतील सर्व दोष तर दूर होतातच पण सरकारला प्रचंड महसूलही मिळू शकतो.

करपद्धतीत नेमके काय बदल केले पाहिजेत, याचा अभ्यास करण्यासाठी पार्थसारथी शोम आयोग स्थापन करण्यात आला होता. त्या आयोगाच्या शिफारशी नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. करपद्धतीत झालेला गुंता कसा सोडविता येईल, हे त्या आयोगाने लक्षात आणून दिले आहे, मात्र हा गुंताच होऊ नये, यासाठी ठोस काही आयोग सांगू शकलेला नाही. रिफंड कसा आणि कधी मिळावा आणि पॅन कार्डचा वापर कसा परिणामकारक करता येईल, इतक्या प्राथमिक सूचना करण्याची वेळ आयोगावर आली आहे. या ज्या काही शिफारशी आहेत, त्या प्रत्यक्षात कधी येणार, हेही सांगता येत नाही. या शिफारशींचा प्रवास जीएसटीसारखाच होऊ शकतो.

याचा दुसरा अर्थ असा की करपद्धतीत अशाच कासवगतीने सुधारणा होत राहिल्या तर आपला देश मोठ्या संकटात सापडू शकतो. ज्या संकटात देशात पैसा भरपूर असेल, मात्र तो काळ्या व्यवहारात लोळणारा असेल. सार्वजनिक सेवा सुविधांचा दर्जा असाच खालावत जाईल. आपले उत्पन्न वाढेल, मात्र ते पुरेसे आहे, असे आपल्याला कधीच वाटणार नाही. जगण्यासाठीची केविलवाणी धडपड, असेच ते जगणे असेल. आणि व्यवस्थेचा दोष लक्षात न आल्याने अशा किती पिढ्या स्वत:ला दोष देत संपून जातील.

या दुष्टचक्रातून सुटकेचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे बँक व्यवहार करासारख्या सुटसुटीत पद्धतीने कर भरण्याच्या पद्धतीची मागणी करणे आणि वडिलांची भूमिका निभावणाऱ्या सरकारलाही महसूल कमी पडणार नाही, याची या कराद्वारे काळजी घेणे. करासारख्या निरस व्यवहारापासून सुरु होत असलेला माणसाच्या अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनापर्यंतचा प्रवास कसा पुढे नेता येईल, याचे असे काही थांबे तुम्हाला या ‘अर्थपूर्ण’ मध्येही सापडतील.
(अधिक माहितीसाठी पहा www.arthakrnati.org)