Saturday, December 7, 2013

अर्थमंत्री म्हणतात तर विश्वास ठेवलाच पाहिजे...!


केवळ आशियातीलच नव्हे तर जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येईल, असे स्वप्न आपण पाहू यात. मात्र प्रश्न केवळ महासत्ता होण्याचा नसून आपला देश महासत्ता होतो आहे, याचा अनुभव सर्वसामान्य माणसाला घेता आला पाहिजे, हा आहे. देशाची तिजोरी आज ना उद्या डॉलरने भरणारच आहे. मात्र ती देशातील १२२ कोटी नागरिकांच्या सुखी, समाधानी आणि शांत आयुष्याला हातभार लावते आहे काय, हे जास्त महत्वाचे आहे. चिदम्बरमसाहेब त्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत!

आपल्या देशाची एकूण संपत्ती, सरकारकडे जमा होणारा कर, देशातील मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल, दर दोन दिवसांनी उसळणारा आणि पटकी खाणारा शेअरबाजार, सोन्याची कमी होणारी किंवा अचानक वाढणारी आयात, आंतरराष्ट्रीय बाजारात कमी अधिक होणारे तेलाचे भाव, देशाच्या तिजोरीतील डॉलरचा साठा आणि त्यानुसार रुपयात होणारी वधघट, अमेरिका आणि चीनच्या आर्थिक स्थितीत होणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक बदलाचे जगावर होणारे बरेवाईट परिणाम आणि अशा प्रामुख्याने अर्थाशी जोडल्या जाणाऱ्या शेकडो घटनांनी भारतीय माणूस सध्या चक्रावून गेला आहे. अगदी गेल्या दशकापर्यंत आपला आणि या घटनांचा काही संबंध आहे, असे फार कमी भारतीयांना वाटत होते. मात्र जागतिकीकरणाने आपल्या सर्वांना अशा वळणावर आणून सोडले आहे की या बदलाची दखल सर्वांना घेणे भाग पडले आहे. तुम्ही त्यापासून किती नामानिराळे राहणाचा प्रयत्न करा, तुमची सुटका नाही, असेच या घटना सांगत आहेत.

या काळाचे वैशिष्ट्य काय आहे पाहा. आपल्या जगाची आणि देशाची आर्थिक तब्येत कशी आहे, ती कधी बिघडेल आणि कधी सुधारेल, हेही कोणीच सांगू शकत नाही. इतक्या वेगाने ही वधघट कशी होऊ शकते, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही. आणि सर्वात धोकादायक म्हणजे कोणावर विश्वास ठेवावा, हेच कळेनासे झाले आहे. विशेषतः अर्थशास्त्रासारखा आकड्यांचा आधार असलेला विषयही इतका गुंतागुंतीचा आणि दुमताचा झाला आहे की त्यातील शास्त्र हरवले आहे, असेच म्हणावे लागेल. जगव्यापी व्यवहारांत इतके प्रचंड हितसंबंध जोपासले जात आहेत की सर्वसामान्य माणसाची अवस्था एखाद्या कटपुतळीच्या बाहुलीसारखी झाली आहे. आपल्याला कोण नाचवितो, हेच त्याला कळेनासे झाले आहे. त्याच्या आयुष्यातील सुखदु:खासाठी तो नशिबाला दोष देतो आहे, मात्र त्याचे खरे कारण आजची ही उरफाटी अर्थस्थिती आहे.

अर्थाने आजचे आयुष्य असे करकचून बांधले गेले आहे की त्याविषयी काहीही आणि जगाच्या कोपऱ्यात कोठेही काही घडले की लगेच कान टवकारतात. भारतीय माणसाने असे कान टवकारावेत, अशी विधाने दस्तुरखुद्द अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी तीन दिवसांपूर्वी केली आहेत. भारताची अर्थव्यवस्था आज कशी आहे, याचे आजचे उत्तर ती संकटात आहे, हे डोळे झाकून दिले जाते आहे. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी केलेली विधाने आश्चर्यजनक आहेत. अर्थात ती तशी असली तरी त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, तो यासाठी की देशाचा आर्थिक गाडा आपल्यापेक्षा आपल्या अर्थमंत्र्यांना अधिक माहित आहे, हे मान्य केले पाहिजे. त्यामुळे अर्थमंत्री काय म्हणतात, ते आधी पाहू.

अर्थमंत्री जे बोलले त्याचे सार असे आहे – जग आर्थिक संकटात असून त्याचे अपरिहार्य परिणाम भारतावर होत आहेत. ते आपण टाळू शकत नाहीत. तरीही जगाच्या तुलनेत भारताचा विकासदर खुपच चांगला राहिला आहे. त्यात पुढील सहा महिन्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. चलनवाढ, आयात निर्यात व्यापारातील तूट आणि घटलेली गुंतवणूक हे आपल्यासमोरील गंभीर प्रश्न होते, ते आपण मान्य केले आणि त्यावर उपाययोजना केल्यावर परिस्थीतीत सुधारणा झाली. जगातील गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास पुन्हा वाढत चालला असून त्यांच्या गुंतवणूकीचा मोठा हिस्सा पुढील काळात भारताला मिळणार आहे. एकटे सरकार विकास करू शकत नाही, ते विकासासाठीचे वातावरण तयार करत असते आणि भारत सरकार नेमके तेच करते आहे. पण राजकीय मतभेद इतके आहेत की सुधारणा होण्यास मोठा विलंब होतो आहे. विमा धोरणाला होत असलेला विरोध हे त्याचे उदाहरण. आपल्या देशातील करपद्धती आणि त्याचे प्रशासन हा एक मोठा अडथळा आहे, तरीही जीएसटीसारख्या सुधारणा पुढे जाऊ शकत नाहीत. देशाला आज विजेची प्रचंड गरज आहे, स्टील प्रकल्प आणि खाणींची गरज आहे, मात्र त्यातही आपले एकमत होत नाही. वित्तीय तूट भरून काढणे, वाढत्या सोन्याच्या आयातीला रोखण्याचा प्रयत्न करणे, याशिवाय तर अर्थव्यवस्थेचे चाक पुढे ढळूच शकत नाही. मग याविषयीचे राजकीय मतभेद आपण का बाजूला ठेवू शकत नाही? चांगले दिवस अजून यायचे आहेत, हे मान्य आहे मात्र २०३० पर्यंत आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यापासून भारताला कोणी रोखू शकणार नाही.

चिदम्बरमसाहेब म्हणतात, ते खरे आहे. केवळ आशियातीलच नव्हे तर जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येईल, असे स्वप्न आपण पाहू यात. मात्र प्रश्न केवळ महासत्ता होण्याचा नसून आपला देश महासत्ता होतो आहे, याचा अनुभव सर्वसामान्य माणसाला घेता आला पाहिजे, हा आहे. देशाची तिजोरी आज ना उद्या डॉलरने भरणारच आहे. मात्र ती देशातील १२२ कोटी नागरिकांच्या सुखी, समाधानी आणि शांत आयुष्याला हातभार लावते आहे काय, हे जास्त महत्वाचे आहे. चिदम्बरमसाहेब त्याविषयी मात्र काहीच बोलत नाहीत!
अर्थमंत्र्यांनी दिलेले महत्वाचे आकडे
- २०१३ मध्ये जगाचा विकासदर २.९, विकसित देशांचा १.२ तर भारताचा ४.४ टक्के
- भारताचा विकासदर पुढील तीन वर्षांत ५, ६ आणि ७ टक्के होण्याची शक्यता.
- या वर्षाची वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ४.८ टक्के म्हणजे ठरल्याप्रमाणे ठेवण्यात यश.
- डॉलरच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ६८.८३ पर्यंत घसरलेला रुपया ६१ ते ६२ पर्यंत स्थिर
- निर्गुंतवणूकीचे ४० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वासNo comments:

Post a Comment