Friday, November 29, 2013

आता ‘हिरों’वर विसंबून नाही चालणार !




भारतीय समाज आपले प्रश्न सोडविण्यासाठी सतत ‘हिरों’च्या शोधात राहिला आहे. तो येईल आणि ही परिस्थीती बदलेल, अशा आशेत तो अडकला आहे. आता मात्र अशा व्यक्तीपूजेतून बाहेर पडून मुलभूत बदलासाठी मुद्द्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे. सध्या देशात दररोज सुरु असलेल्या वस्त्रहरणाने तोच धडा दिला आहे.



गेल्या दोन वर्षांत देशाने चार मोठी आंदोलने पाहिली. जनलोकपालासाठीचे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचे, काळ्या पैशांच्या विरोधातील रामदेवबाबांचे, पुन्हा केजरीवाल यांचे आणि दिल्लीतील बलात्काराच्या निषेधार्थ झालेले आंदोलन. या चारही आंदोलनांनंतर देशात फार मोठा बदल होईल, अशी आशा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. नेमके काय घडते आहे, हे पाहायला सामान्य माणूस मोकळा नसला तरी या सर्व घटनांकडे त्याचे लक्ष असतेच. अशा आंदोलनांचे काही सकारात्मक परिणामही होत असतात, हे मान्यच केले पाहिजे. मात्र व्यक्तीकेंद्री बदल किती तकलादू असतात, हे सतत समोर येवू लागले असून या महाकाय देशात खरेच काही बदलायचे असेल तर आता व्यवस्थेतच बदल होण्याची किती गरज आहे, हे समजून घेण्याची वेळ आली आहे.

माध्यमे आणि व्यासपीठांवरून जो पुकारा सतत केला जातो, त्याचा सारांश काढला तर आपल्याला असे लक्षात येईल की आपण जात, धर्म, राज्य, भाषा, लिंग अशा कोणत्याही समूहात जगत असलो तरी सर्व १२२ कोटी भारतीय आपले बांधव आहेत आणि त्यांना मानवी प्रतिष्ठेने जीवन जगता आले पाहिजे, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर आपली पूर्ण श्रद्धा आहे आणि प्रत्येक भारतीय माणसाच्या भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त जीवनासाठी आपण कटिबद्ध आहोत, या तत्वांच्यापेक्षा वेगळे काही सापडत नाही. हे एवढेसे चार मुद्दे. मात्र त्यासाठीचा संघर्ष वर्षानुवर्षे सुरु आहे. खरे तर काळ पुढे चालला तशी ही उद्दिष्टे जवळ येताना दिसली पाहिजे होती. प्रत्यक्षात अशा काही घटना घडताना दिसतात की आपला प्रवास पुन्हा भूतकाळाकडे चालला की काय, अशी शंका येते.

असे का होते याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्यावर राजेशाही आणि ब्रिटीशांची गुलामगिरी, याचा प्रचंड प्रभाव आहे. आपल्या क्रिया – प्रतिक्रिया भावनिक आहेत. त्यामुळे मनाविरुद्ध आणि खूप मनासारखे काही घडले की त्यावर आम्ही तुटून पडतो. क्रिकेटमधील जयपराजय आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती अशा घटनांत ही भावनिकता नेहमीच दिसते. या उद्रेकात आपला कोणी गैरवापर करतो आहे, याचेही भान आपल्याला राहात नाही. देशात झालेल्या चार मोठ्या आंदोलनांतही नेमके हेच पाहायला मिळाले. आम्ही सतत ‘हिरों’च्या शोधात आहोत. तो येईल आणि ही परिस्थीती बदलेल, अशा आशेत आपण अडकलो आहोत.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे काय झाले, याचा आज विचार केला तर लक्षात येते की त्या आंदोलनातील नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही आणि काही नेते वेगळे झाले. एवढेच नव्हे तर त्यांच्यात धुसपूस सुरु झाली. अण्णांनी अनेक विषयांत मौन धारण केले तर केजरीवाल यांनी थेट निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. भारतातील निवडणूक कशी परीक्षा पाहणारी आहे आणि तिला करावा लागणारा खर्च नेमका कोठून आणायचा आणि कोठे दाखवायचा, यात जो खोटेपणा करावा लागतो, त्या मुद्द्यावरून ते परेशान आहेत. राजकीय नेत्यांचे स्टिंग ऑपरेशन करणारे पत्रकार तरुण तेजपाल आणि बलात्काराच्या विषयावर देश पेटविणारे त्यांचे सहकारी आता अडचणीत सापडले आहेत. आणि कालपर्यंत इतरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांचे कपडे फाडणारा मिडिया आता त्यांच्यावर तुटून पडला आहे. रामदेवबाबा यांच्या आंदोलनानंतर स्वीस बँकेतून भारतीयांचा पैसा परत आल्याचे ऐकिवात नाही. मात्र आता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केल्यावर सर्व प्रश्न सुटतील, असे त्यांना वाटू लागले आहे.

गेल्या दोन वर्षांत घडलेल्या या उलट सुलट घटनांचा सुसंगत पद्धतीने काही अर्थ लावायचा ठरविला तर शहाणा माणूस वेडा होईल, अशीच ही स्थिती आहे. मात्र त्यांना काही एका सूत्रात बांधायचे तर पुढील काही मुद्दे सारांशरुपाने समोर येतात. १. जनतेने आता माणसांच्या मागे न जाता देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या मुद्द्यांचा आग्रह धरला पाहिजे. २. वृत्तीवर देशात खूप काम झाले आहे आता व्यवस्थेवर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे भावनिक विषयांना जनतेनेच नाकारले पाहिजे. ३. चांगले विचार करणारी माणसेही एकत्र राहू शकत नाही, त्यामुळे व्यक्तीपूजक आणि व्यक्तीकेंद्री राजकारणाला नाकारले पाहिजे. ४. वाढत्या पैशीकरणामुळे सर्व जनतेच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली असून त्यामुळे विवेकही हरवला आहे. हे ज्यामुळे झाले, त्या पैशाचा गोंधळ थांबविण्यासाठी पैशाला विनिमयाचे साधनच ठेवले पाहिजे. त्याचे वस्तूत रुपांतर होत असलेल्या वाटा रोखण्यासाठी ‘अर्थक्रांती’ सारख्या मुलभूत बदलांचा आग्रह धरला पाहिजे. (राजनाथसिंहसारखे काही नेते तसे बोलू लागले आहेत.) ५. या महाकाय देशात बदल करायचे तर लोकशाहीशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही, त्यामुळे लोकशाहीला म्हणजेच सत्तेवर आलेल्या सरकारला आदर्श करपद्धतीच्या माध्यमातून बळकट करण्याशिवाय पर्याय नाही. (अधिक माहितीसाठी पहा - www.arthakranti.org)

No comments:

Post a Comment