Thursday, September 19, 2013

प्रश्नचिन्ह वृत्तीवर की व्यवस्थेवर ?




हजारो प्रश्न आपल्याला सांगतील की साधनांची प्रचंड टंचाई ही वस्तुस्थिती आपल्या वृत्तीला दुषित करते आहे. हे समजून घेऊन आपल्याला भारतीय माणसाच्या वृत्तीवर नव्हे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करायचे आहे. कायदे पाळले जात नाहीत, हा म्हणूनच आज वृत्तीपेक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे.


नुसते कायदे करून उपयोग नाही, त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे विधान सोनिया गांधी यांनी महिलांच्या कायद्यासंदर्भात केले होते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली अमेरिकावारी संपल्यावर अमेरिकेत कसे कायद्याचे राज्य आहे, याचे वर्णन केले होते. कायद्यानुसार भारतात व्यवहार होत नाहीत, ही आज सर्वच सुजाण भारतीय नागरिकांच्या मनातील खंत आहे. मात्र आजच्या टोकाच्या विषमतेत कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊ शकत नाही आणि कायदा हा केवळ वृत्तीचा प्रश्न नसून तो व्यवस्थेचा आहे. व्यवस्थेवर विश्वास वाढल्याशिवाय कायद्याचे राज्य हे स्वप्नच राहते, अशी मांडणी मी गेल्या वेळच्या लेखात (अण्णा हजारे आणि सोनिया गांधी जेव्हा एकच भाषा बोलतात! )केली होती. वृत्तीच महत्वाची आहे, असे म्हणणाऱ्या आणि तुलनेने चांगल्या परिस्थितीतील राहणाऱ्या भारतीयांना हे म्हणणे प्रथमदर्शनी पटत नाही, त्यामुळे त्यांनी प्रतिक्रियेचा भडीमार केला, हे समजण्यासारखे आहे. मात्र भारतासारख्या महाकाय, वैविध्यपूर्ण आणि विषमतेचा कडेलोट झालेल्या देशाला आता सक्षम व्यवस्थेचीच गरज आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही.

व्यवस्थेचा आणि वृतीचा कसा थेट संबंध आहे, हे कळण्यासाठी मी मुंबईच्या बेस्ट बस सेवेचे उदाहरण देतो. ते आपल्याला पटते का पहा. मुख्य मुंबईत तुम्ही गेला असलात तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे बसमध्ये बसण्यासाठी तेथे रांगा लागतात. जो येतो तो रांगेत उभा राहतो. रांग तोडणारी माणसे तेथे तुलनेने खूपच कमी दिसतात. इतर सर्व शहरांत मात्र रांगेत लोक बसमध्ये बसतात, हे दृश्य अपवादानेच दिसते. याचे कारण शोधले तेव्हा लक्षात आले की गर्दी तर सर्वच शहरांत आहे मात्र विशिष्ट वेळेला म्हणजे जवळपास दोन, पाच ते १० मिनिटांनी किंवा ठरलेल्या वेळी बस येणार आणि आपल्याला घेऊन जाणार हे मुंबईत प्रत्येकाला माहीत असते, म्हणून ती रांग टिकते. उद्या जर या वारंवारतेने आणि शिस्तीत बस आल्याच नाहीत तर प्रवाश्यांची रांग अजिबात टिकणार नाही. याचा अर्थ प्रवाश्यांची शिस्त बसच्या म्हणजे साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे, त्यांच्या वृत्तीवर नव्हे. आपण मात्र एका फटक्यात मुंबईकर शिस्तबद्ध आहेत आणि मुंबईबाहेरचे म्हणजे आपण सर्व बेशिस्त आहोत, असे शिक्के मारून टाकतो! भारतीय नागरिकांच्या वृत्तीला बदनाम करण्याचा हा अधिकार आपल्याला कोणी दिला?

आज माणसाच्या वृत्तीवर व्यवस्था अधिक काम करते, हे अशा शेकडो- हजारो घटनांत आपल्याला लक्षात येईल. माणसाची वृत्ती चांगली राहिली पाहिजे, यासाठी भारतात हजारो वर्षे काम झालेले आहे. (ते आजही चालू आहे आणि पुढेही चालूच ठेवावे लागणार आहे.) त्यातूनच आजचा प्रामाणिक, कष्टाळू सर्वसामान्य माणूस घडला आहे. त्याच्या जीवावर आज १२३ कोटी लोकसंख्येची जगातील सर्वात मोठी लोकशाही अनेक विसंगतीमध्येही टिकून आहे. त्यामुळे तो बेशिस्त आहे, कामचुकार आहे, लाचखोर आहे, अस्वच्छ आहे, असे शिक्के मारणे अतिशय निषेधार्ह आहे. खरे तर हा त्याचाच नव्हे तर आपल्या सर्व भारतीयांचा अपमान आहे. व्यवस्थेतील दोषांविषयी कोणी बोलू नये, यासाठीचा मोजक्या स्वार्थी लोकांचा हा एक कटच म्हटला पाहिजे.

व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी आज सर्वाधिक महत्वाची भूमिका कोण बजावत असेल तर ते म्हणजे ‘अर्थ’. ज्या ‘अर्था’शी आपले आयुष्य आणि आपली सुखदु:खे जोडली गेली आहेत, त्या ‘अर्था’त एवढा मोठा गोंधळ झाला आहे की तो दुरुस्त केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. पैशांची निर्मितीच मुळात व्यवहाराचे एक माध्यम म्हणून झाली आहे, त्याला व्यवस्थेने वस्तू करून टाकले आहे. त्यामुळे पैसा घरात दडवून ठेवण्याचा वेडेपणा केला जात आहे. हा विषय खूप मोठा आहे, मात्र पुढील काही प्रश्नांच्या मार्गाने आपल्याला लक्षात येईल की व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याशिवाय आपल्याला अपेक्षित असलेला खरा बदल देशात होण्याची शक्यता नाही.
आपल्या विचारासाठी काही प्रश्न असे आहेत. १. जेथे साधनांची मुबलकता आणि ते मिळण्याची शाश्वती आहे, तेथे भारतीय माणसाच्या वृत्तीत सकारात्मक तर जेथे साधने कमी तेथे वृत्तीत नकारात्मक फरक पडलेला आपण पहिला आहे का? २. अतिरेकी पैशीकरणामुळे दैनंदिन जीवनातील वादविवाद पैशांच्या व्यवहारातूनच जास्त होत आहेत, हे आपण पाहिले आहे काय? ३. ‘अर्था’ची म्हणजे भांडवलाची टंचाई निर्माण झाल्याने त्यासाठीच्या स्पर्धेत आपण एकमेकांशी वाईट वागतो आहोत किंवा बदनाम करत आहोत, हे आपल्या लक्षात येते आहे काय? ४. विषमता एवढी वाढली आहे की आपल्याला भारतीय नागरिक म्हणून एकमेकांची ओळखही पटेनाशी झाली आहे, अशा परिस्थितीत आपण आपल्या देशासमोरील कळीच्या प्रश्नांना सामोरे जाऊ शकणार आहोत काय? २. जो देश २२ हजार टन सोने बाळगतो, तो देश श्रीमंत देश आहे पण तरीही त्याची आर्थिक प्रकृती परकीय चलनाच्या ओघावर खालीवर होते, हे आपल्याला पटते काय?

....आणि असे न संपणारे हजारो प्रश्न आपल्याला सांगतील की साधनांची प्रचंड टंचाई ही वस्तुस्थिती आपल्या वृत्तीला दुषित करते आहे. हे समजून घेऊन आपल्याला भारतीय माणसाच्या वृत्तीवर नव्हे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करायचे आहे. कायदे पाळले जात नाहीत, हा म्हणूनच आज वृत्तीपेक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment