Sunday, September 22, 2013

एक गाडी बडी प्यारी !
जोपर्यंत सार्वजनिक सेवासुविधांवर पुरेसा खर्च होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला आपले व्यवस्थेत काही स्थान आहे, असे वाटत नाही. त्यासाठी या सुविधा फार महत्वाच्या आहेत. श्रीमंत लोक वातानुकुलित घरांत राहतात, हे त्याला माहीत असते, मात्र तसे काही क्षण त्याच्या वाट्याला आले तरी त्याचे समाधान तर होतेच पण आपण विकासाचे वाटेकरी आहोत, याची सुखद जाणीव होते. दिल्ली मेट्रोने ही जाणीव देशभरातून राजधानीत आलेल्या कोट्यवधी नोकरदार आणि कामगारांना दिली आहे.१९९९ मध्ये म्हणजे १३ वर्षांपूर्वी दृपा नावाचे आंतरराष्ट्रीय छपाई प्रदर्शन पाहण्यासाठी मला जर्मनीत जाण्याची संधी मिळाली होती. आधुनिक छपाईचे माहेरघर असलेल्या जर्मनीत हे प्रदर्शन दर चार वर्षांनी भरते. प्रदर्शन संपवून जर्मनीतीलच कलोन शहरात आम्ही काही जण निघालो होतो. सर्वात स्वस्त आणि चांगला मार्ग म्हणजे रेल्वे असे आम्हाला सांगण्यात आले होते, त्यामुळे आम्ही रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील रेल्वे आणि स्टेशनवरील सुविधा पाहून आम्ही सर्वच अवाक् झालो होतो. त्या स्टेशनवर येणाऱ्या वृद्ध, अपंगांसाठी लिफ्ट तर होत्याच पण त्यांना बसण्यासाठी खास जागाही राखून ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय प्रवाश्यांसाठी सरकते जिने होते. बसण्यासाठीच्या आरामदायी खुर्च्या, वातानुकूलित डबे आणि बरेच काही... सर्व काही भारावून जावे, असेच होते. माझ्या लक्षात राहिले ते वृद्धांसाठीच्या लिफ्ट आणि त्यांच्या राखीव जागा. माणसाची मानवी प्रतिष्ठा जपण्याचे काम काही प्रगत देशांनी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मला ते पाहून वाटले होते. आपल्या देशात असे कधी होईल, असा विचार त्यावेळी मनात येवून गेला होता. परवा दिल्ली मेट्रोचा प्रवास करून ते स्वप्न पूर्ण झाले.

परवा म्हणजे गेल्या पंधरा दिवसात दोनदा राजधानी दिल्लीला जाण्याची वेळ आली आणि आपल्याही देशात ते चित्र पाहायला मिळाले आणि खूप आंनद वाटला. साक्षरता दिनानिमित्त राज्य साधन केंद्राचा सदस्य म्हणून आणि काही कामानिमित्त दिल्लीला गेलो तेव्हा बहुतांश प्रवास मी मुद्दाम मेट्रोने केला. २००२ साली सुरु झालेल्या दिल्ली मेट्रोचा प्रवास मी नाविन्य म्हणून पूर्वीही केला होता, मात्र त्यावेळी तो कुतुहलापुरता मर्यादित होता. यावेळी मात्र मला ती व्यवस्था कशी चालते, हे जाणून घ्यायचे होते. मुंबईत मोनोरेल सुरु झाली आहे आणि तिचा किती विस्तार होणार आहे, याची झलक सध्या तेथे पाहायला मिळते. पुण्यात मेट्रो होणार, याची जोरदार चर्चा गेले दोन वर्षे सुरु आहे आणि पुण्यातील जमीन आणि घरांचे दर त्यावरून कमी जास्त होत आहेत. (आठवडाभरात पुणे मेट्रोविषयी महत्वाची घोषणा अपेक्षित असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.) जयपूरच्या मेट्रोची प्रायोगिक सुरवात गेल्या १८ तारखेला म्हणजे परवाच पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते झाली आहे. शिवाय आपल्याही शहरात मेट्रो व्हावी, यासाठी देशातील डझनभर शहरे रांगेत उभी आहेत. मेट्रोविषयीचे हे इतके आकर्षण का आहे, हे दिल्लीची मेट्रो अनुभवल्यावर लक्षात येते.

भारतातील शहरे काय वेगाने वाढत चालली आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. सर्व रोजगारसंधी शहरांत एकवटल्या तर लोकांना शहरात येण्याशिवाय पर्याय नाही आणि शहरे वाढली तर वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही.

आधुनिक काळात माणसाने घराबाहेर पडणे, हे क्रमप्राप्त झाले आहे आणि घराबाहेरील वाढत चाललेले तास हे आनंददायी करणे, हा पुढील प्रवास मानला जातो आहे. भारतासारख्या १२३ कोटी लोकसंख्येच्या देशात तर प्रवासाच्या इतक्या सोयी होण्याची गरज आहे की त्या कितीही केल्या तरी अपुऱ्याच पडतात, असा अनुभव आहे. चांगली प्रवास साधने वापरण्यासाठी भारतीय जनता किती आसुसलेली आहे, हे दिल्ली मेट्रो पाहिल्यावर सहजच लक्षात येते. या प्रकल्पांचा खर्च आपल्या देशाला परवडतो काय आणि शहरात या प्रकारचे केंद्रीकरण करावे काय, हे मुद्दे राहतातच. तरीही मोठ्या म्हणजे ज्याला मेट्रो शहरे म्हणतात, त्या शहरांत अशा प्रकल्पांना पर्याय नाही, असे दिल्ली मेट्रो पाहून वाटू लागते. (दिल्ली मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यावर १९,१३१ कोटी रुपये खर्च झाला आहे आणि भारत हा काळ्या पैशांत जगणारा देश असल्याने हे सर्व भांडवल देशाला कर्ज म्हणून घ्यावे लागते!)
जोपर्यंत सार्वजनिक सेवासुविधांवर पुरेसा खर्च होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला आपले व्यवस्थेत काही स्थान आहे, असे वाटत नाही. त्यासाठी या सुविधा फार महत्वाच्या आहेत. श्रीमंत लोक वातानुकुलित घरांत राहतात, हे त्याला माहीत असते, मात्र तसे काही क्षण त्याच्या वाट्याला आले तरी त्याचे तात्पुरते समाधान होते. दिल्ली मेट्रोने हे समाधान देशभरातून राजधानीत आलेल्या कोट्यवधी नोकरदार आणि कामगारांना दिले आहे. आपण दिल्लीला गेलात तर भारतावर राज्य करणारे शहर कसे बदलते आहे, हे मेट्रोत प्रवास करून जरूर पहा...


दिल्ली मेट्रोचे राष्ट्रीय महत्व
- कोणत्याही भेदभावाविना भारतीयत्व ठसविण्याचा प्रयत्न. (सर्व मेट्रोत खालचा-वरचा असा वर्ग नाही. दररोज सुमारे २५ लाख लोक प्रवास करतात. )
- जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे आणि आपली कोणी तरी खास काळजी घेत आहे, या वातावरणामुळे प्रवाशांत अभिमानाची भावना. महिलांसाठी एक डबा तसेच प्रत्येक डब्यात महिला आणि अपंगासाठी काही जागा राखीव.
- सर्वसामान्य माणसाला कळेल अशा घोषणा, संदेश, फलक, नकाशे आणि चित्र. (सध्या एअरपोर्ट एक्स्प्रेस सह सात मार्ग असून त्या प्रत्येक मार्गाला वेगळा रंग दिला आहे.)
- कमी तिकीटदरांत वातानुकुलित प्रवास.
- लांबीच्या निकषांत (१८९.६३ किलोमीटर आणि १४२ स्टेशन) जगातील १३ व्या क्रमांकाची मेट्रो, दररोज २,७०० फेऱ्या आणि बस व्यवस्थेला सोबत घेऊन सर्व शहर सार्वजनिक वाहतुकीने जोडण्याचा प्रयत्न.
- गर्दी नसल्याच्या काळात १५ मिनिटे तर गर्दीच्या काळात दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने गाडी.
- लाखो प्रवाशांची ये जा काही मिनिटांत होत असल्याने आधुनिक पद्धतीची म्हणजे कमीतकमी मानवी हस्तक्षेप असलेली टोकन आणि कार्ड पद्धत.
- पटेल चौक स्टेशनवरील मेट्रो संग्रहालयाद्वारे मेट्रो व्यवस्था प्रवाश्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न.
- प्रवाश्यांशी चांगले वागावे, यासाठी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण.
- सरकारी कंपन्यांच्या मार्फत चालणारी व्यवस्था. माणसापेक्षा व्यवस्थेवर विश्वास ठसविण्यावर भर.
- सरकारी अनुदानाशिवाय नफ्यात चालणाऱ्या जगात मोजक्या मेट्रो आहेत. त्यात दिल्ली मेट्रोचा समावेश आहे.
- शहरांतील प्रदूषण पातळी दरवर्षी ३ लाख ६० हजार टनांनी कमी करणारी वाहतूक सेवा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रमाणित केले आहे.