Saturday, May 18, 2013

मंदीत गर्भश्रीमंतांचा फुगवटा ही विसंगतीच !




संपत्ती जमा करणे हा मुलभूत हक्क आहे आणि खुल्या अर्थव्यवस्थेशिवाय आज जगासमोर पर्याय नाही, हे मान्य करूनही एकीकडे मंदी तर दुसरीकडे संपत्तीवाढीचे विक्रम अशा विसंगतीचे रुपांतर सुसंगतीत करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेत सकारात्मक बदल किंवा हस्तक्षेप करावाच लागणार आहे. तसा तो केला नाहीतर बुडते जहाज गरीब श्रीमंतांना ओळखत नाही, हे फुगत चाललेल्या गर्भश्रीमंतांच्या समूहाला समजून घ्यावेच लागणार आहे.

जगात आणि भारतात नेमका आर्थिक पेचप्रसंग काय आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गर्भश्रीमंतांच्या रिपोर्टने पुन्हा सिद्ध केले आहे. गेल्या १५ दिवसात या संबंधीचे दोन रिपोर्ट (वेल्थ इनसाईट आणि नाईट फ्रंॅक वेल्थ रिपोर्ट) प्रसिद्ध झाले असून जगात गर्भश्रीमंतांची संख्या (गर्भश्रीमंत म्हणजे ज्यांची वैयक्तिक संपत्ती १५० ते १६० कोटी रुपये आहे) कशी वाढत चालली आहे आणि जगातल्या कोणत्या देशात ते वसले आहेत तसेच भविष्यात त्यांची संख्या कोठे आणि किती वाढू शकते, याचा आढावा त्यामध्ये घेण्यात आला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात गर्भश्रीमंतांची संख्या किती वेगाने वाढते आहे आणि ती कशी काही महानगरांमध्येच एकवटलेली आहे, हेही त्याद्वारे स्पष्ट झाले आहे. जगातल्या खासगी मोठ्या बँकांना व्यवसाय करण्यास कोठे वाव आहे, मॉल कोठे चांगला व्यवसाय करू शकतील, गुंतवणूक कोठे केली तर फायदेशीर ठरू शकेल आणि विमान कंपन्यांचा व्यवसाय कोठे वाढणार आहे, अशी काही भाकिते करण्यासाठी अशा अहवालांचा वापर होतो आणि त्यात वावगे काही नाही. मात्र आधुनिक जगातील विसंगतीही त्यामुळे पुन्हा समोर आली आहे. ती विसंगती अशी आहे की जगातले सार्वजनिक जीवन खालावत चालले असून वैयक्तिक आयुष्य भौतिकदृष्ट्या दिवसेंदिवस उंचावत चालले आहे. याचा थेट अर्थ जो वाटा सार्वजनिक कामांच्या कारणी लागला पाहिजे, तो वाटा वैयक्तिक तिजोऱ्यांत जमा होतो आहे.
या अहवालातील काही निष्कर्ष असे आहेत. १. २००७ ते ११ या पाच वर्षांत भारतात गर्भश्रीमंतांची संख्या ४६ टक्क्यांनी वाढली आहे. २. भारतातील एक श्रीमंत शहर असा लौकिक मिळविलेल्या पुण्यात ती वाढ सर्वाधिक म्हणजे ६८ टक्के आहे. ३. इतर महानगरांतील वाढीचे प्रमाण असे आहे: मुंबई – ५९, दिल्ली – ५०, बंगळूर – ४६, हैद्राबाद – ४३, चेन्नई – २५, अहमदाबाद – १८ आणि कोलकता – १२. ४. भारतातल्या प्रत्येक तीन गर्भश्रीमंतांमध्ये एक गर्भश्रीमंत मुंबईत राहतो. म्हणजे मुंबईत ५७७ तर दिल्ली – १४७, कोलकत्ता – १२६, हैद्राबाद- ११४ आणि बंगरूळ – ९७, चेन्नई – ८८, पुणे – ५५ आणि अहमदाबादमध्ये ५१ गर्भश्रीमंत राहतात. भारतात असे एकूण १ हजार ५७६ गर्भश्रीमंत राहतात. ५. २०१६ मध्ये जगाच्या तुलनेत भारतात गर्भश्रीमंतांची वाढ सर्वात वेगवान म्हणजे ३० टक्के असेल. ६. आशिया - पॅसिफिक देशांत गर्भश्रीमंतांची सर्वाधिक संख्या चीन आणि ऑस्ट्रेलियानंतर भारतातच वाढते आहे. ७. मुंबईत २६ अब्जाधीश (ज्यांची एकूण मालमत्ता ५०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे.) राहतात म्हणजे शांघाय, पॅरिस आणि लॉस एंजलिस पेक्षा जास्त. सर्वाधिक अब्जाधीश राहणाऱ्या जगातील पहिल्या दहा शहरांत मुंबईचा सहावा क्रमांक लागतो. (न्यूयॉर्क – ७०, मॉस्को – ६४, लंडन –५४, हॉंगकॉंग – ४०, बीजिंग – २९. ८. दशलक्षाधीश या निकषावर भारताचा क्रमांक ११ वा लागतो, २०१२ मध्ये तो पाचवा असेल असा अंदाज करण्यात आला आहे. ९. भारतात २०११ मध्ये दोन लाख ५१ हजार दशलक्षाधीश होते आणि त्यांची एकत्रित संपत्ती ५५ हजार अब्ज रुपये इतकी होती. १०. पुढील दशकात आर्थिक शक्तीचे केंद्र युरोप अमेरिका राहणार नसून ते आशिया असेल आणि त्यातही चीन आणि भारताचे त्यात प्राबल्य असेल.
जगात श्रीमंतांची संख्या वाढत जाणार, हे सर्वच जण जाणतात आणि सर्वांनाच श्रीमंत होण्यास आवडेल, हेही तितकेच खरे आहे. मात्र या श्रीमंतीसोबत सार्वजनिक सेवासुविधा, सामाजिक सुरक्षितता सामाजिक आरोग्य त्याच्याशी सुसंगत वेगाने वाढताना दिसत नाही, हा खरा पेच आहे. त्याचा परिणाम असा होतो की जगभरातील सरकारे किंवा सरकारी व्यवस्था दुबळ्या आणि लाचार बनतात. त्या वाकविण्यासाठी सर्रास पैसा वापरला जातो. नैसर्गिक साधनसामग्रीची लुट केली जाते. श्रीमंत इतके श्रीमंत होतात की त्यांच्या मुजोरीचा समाजाला त्रास होऊ लागतो. विषमता वाढल्याने कायद्याचे राज्य चालविता येत नाही. बळी तो कान पिळी हाच न्याय समाजात माजतो. श्रीमंत होण्यासाठी जे अनुचित मार्ग वापरले जातात, त्यामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढते आणि त्यासाठी नैतिकतेचा बळी देण्याची प्रवृती बळावते.
सर्वात महत्वाचे म्हणजे अशा एकतर्फी वाढीमुळेच जगात आर्थिक पेचप्रसंग निर्माण होतात. गेली पाच वर्षे मंदी आहे, सरकारे कर्जबाजारी होत आहेत, लोकांची क्रयशक्ती कमी होते आहे, रोजगारसंधी वाढताना दिसत नाहीत. सामाजिक योजनांवरील खर्च कमी करण्याची सरकारांची चढाओढ सुरु आहे. बचतीचे प्रमाण कमी होते आहे. जागतिक समूहात असुरक्षितता वाढत चालली आहे. असे असताना जगात आणि भारतात दशलक्षाधीश आणि अब्जाधीश इतक्या वेगाने वाढत आहेत, हा कोणत्याही चमत्काराचा भाग नसून आर्थिक पेचप्रसंगाचीच ही दुसरी बाजू आहे. नव्हे; या विसंगतीमुळेच जगात हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे आणि जगातील सर्वसामान्य जनता त्यात होरपळून निघते आहे.
संपत्ती जमा करणे हा मुलभूत हक्क आहे आणि खुल्या अर्थव्यवस्थेशिवाय आज जगासमोर पर्याय नाही, हे मान्य करूनही एकीकडे मंदी तर दुसरीकडे संपत्तीवाढीचे विक्रम अशा विसंगतीचे रुपांतर सुसंगतीत करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेत सकारात्मक बदल किंवा हस्तक्षेप करावाच लागणार आहे. तसा तो केला नाहीतर बुडते जहाज गरीब श्रीमंतांना ओळखत नाही, हे फुगत चाललेल्या गर्भश्रीमंतांच्या समूहाला समजून घ्यावेच लागणार आहे.

No comments:

Post a Comment