Tuesday, May 28, 2013

तापलेल्या उन्हातही तो लढतोच आहे...!



आपला जन्म ज्या गावात झाला, त्या गावात आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे, ते शक्य न झाल्यास स्थलांतर करणे, कामांसाठी प्रवास करणे, आपले घरातील आणि घराबाहेरील जगणे सुखकर करणे, (ते जगणे आनंददायी करणे हा तर फार पुढचा टप्पा आहे.) यासाठी सर्वसामान्य माणूस लढतोच आहे. मात्र त्याच्या लढण्याला आजची व्यवस्था न्याय देताना दिसत नाही. अत्याधुनिक जगात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या देशाला बहुजनांचे हित साधण्यासाठी आपण लोकशाही स्वीकारली, या विचाराचा जणू विसर पडला आहे.



राज्यातील यावर्षीचा सर्वात उष्ण दिवस गेल्या आठवड्यात सोमवारी येऊन गेला. त्यानंतर लगेचच चंद्रपूर या सर्वात उष्ण शहरांत ४८ अंशांपेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली. ते तीन दिवस मी चंद्रपूरला आणि त्या भागात होतो. ज्येष्ठ समाजसेवक आणि हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रकाश आमटे यांना भेटण्यासाठी म्हणून तेथे गेलो होतो. हेमलकसा चंद्रपूरपासून १७५ किलोमीटर दूर आणि महाराष्ट्र - छत्तीसगड – आंध्र सीमेवर आहे. बल्लारपूर, कोठारी, आष्टी, अलापल्ली असा हा चार तासांचा रस्ता आहे. पूर्वी हा रस्ता बरा होता मात्र यावेळी तो खराब झाल्याचे दिसले. प्रकाश आमटे यांच्याशी बोलणे हा आनंदाचा आणि जाणीवा प्रगल्भ होण्याच्या प्रवासाचा भाग असतो. त्यामुळे तेथे जाईपर्यंत होणारा त्रास आपण विसरून जातो. गेली ४० वर्षे सातत्याने सुरु असलेल्या सोमनाथ श्रमसंस्कार छावणीला लांबलाबून आलेले युवकही हेमलकसा पाहण्यासाठी त्याच वेळी आले होते. सामाजिक जाणीवा प्रगल्भ झालेल्या किंवा आपल्या आयुष्यात नवे काही करू इच्छिणारे तरुण या छावणीला हमखास येतात. बाबा आमटे यांनी सुरु केलेले, विकास आणि प्रकाश यांनी पुढे चालविलेले तसेच आता त्यांच्या पुढील पिढीने हाती घेतलेली ही कामे पाहणे हा एक प्रेरणादायी अनुभव आहे. आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ येथील सामजिक काम हा एक स्वतंत्र विषय आहे. मात्र यानिमित्ताने या भागातील परिस्थितीविषयी अधिक काही जाणून घेता आले.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी सक्रीय आहेत असे आपण ऐकतो मात्र त्यांची अद्यापही इतकी दहशत आहे आणि ती सरकारसह सर्वांनी मान्य केलेली आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. हेमलकसा येथे जाताना जो तो हे सांगत होता की केंव्हाही जा मात्र संध्याकाळी दिवसाउजेडी अलापल्लीला पोहोचा. हा ६० किलोमीटरचा अख्खा रस्ता जंगलातून जातो त्यामुळे सर्वच जण घाबरून असतात. आपल्याच देशातील दोन समूह २०१३ साली एकमेकांना असे घाबरून आणि एकमेंकाच्या विरोधात उभे आहेत, हे पाहून वाईट वाटते. तेथे सरकारतर्फे विकासकामे सुरु आहेत मात्र वर्षानुवर्षे परिस्थितीत फारसा फरक पडत नाही, याची जाणीव झाल्यावर आपल्याच देशातील तरुणांना विश्वासात घ्यायला आपण किती कमी पडतो आहोत, हे मान्य करावे लागते.
दुसरी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एवढ्या उष्णतेत लोक आपापली कामे करतात. अतिउष्णतेमुळे त्यांची कार्यक्षमता कमी होत असेल आणि ते मान्यच केले पाहिजे. मात्र सर्वसामान्य माणसाला काम करण्याशिवाय पर्याय नाही. तेथील उष्णतेचा चढता पारा पाहून या भागातील मजुरांना खास उन्हाळा भत्ता दिला पाहिजे, असे वाटून गेले. (सरकारी नोकरांना नक्षलवादी भागात काम केल्याचा खास भत्ता मिळतो.) या भागातील लोक आळशी आहेत, असे म्हणणाऱ्यांना काहीवेळ या उन्हात नुसते उभे राहण्याची शिक्षा केली पाहिजे !
मुंबईखालोखाल महसूल देणारा जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या चंद्रपूरमध्ये रस्ते, पाणी आणि अशा सार्वजनिक सेवासुविधांची चांगली परिस्थिती असेल, असे वाटले होते. मात्र कोळशाच्या खाणी, औष्णिक वीज केंद्र आणि बल्लारपूर पेपर मिलच्या प्रदूषणाने सारा चंद्रपूर परिसर पोळून निघाला आहे. चंद्रपूर शहरात सर्वाधिक तापमान नोंदविले जाण्याचे ते प्रमुख कारण आहे. त्या शहरात उखडलेले रस्ते पाहायला मिळाले. शहर धुळीने माखले आहे. भर दुपारी रस्तादुरुस्तीची कामे सुरु होती. जंगलाने वेढल्या गेलेल्या या शहरात मात्र झाडांचा पत्ता नाही. निसर्गाने जे भरभरून दिले आहे, त्याचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपयांची संपत्ती निर्माण होते आहे, मात्र त्या शहराच्या सार्वजनिक सेवांमध्ये ती कोठेच दिसत नाही. जणू स्वयंपाक करणाऱ्याला उपाशी राहण्याची शिक्षा दिली गेली आहे. अर्थात गेले २३ वर्षे देशात निर्माण झालेली प्रचंड संपत्ती आपल्या देशात कोणत्याच शहरातील सार्वजनिक सेवांमध्ये पाहायला मिळत नाही, मग चंद्रपूर त्याला अपवाद कसे असेल?
चंद्रपूरसारखी तीन लाख लोकवस्तीसारखी शहरे जर राहण्यास चांगली ठेवली नाहीत तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात, याची झलकही यानिमित्ताने पाहायला मिळाली. साडेसातशे किलोमीटर दूर असलेल्या पुणे शहरासाठी तेथून दररोज चार बस १४ तासांचा प्रवास करत येतात आणि जातात. महाराष्ट्रातील मध्यम आणि मोठ्या शहरांतून हजारभर बस दररोज पुण्यात येतात, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. संधींचे इतके केंद्रीकरण होते आहे की शहरात येणारे लोंढे थांबविणे आता शक्य नाही, असे वाटू लागले आहे. बरे, त्यांचे येणे तरी आनंददायी असावे. तेही नाही. खासगी आणि सार्वजनिक बस व्यवस्थेला कोणी वाली नाही. त्यांची स्वच्छता नाही, त्या कोठे थांबाव्यात, याचे काही नियम नाहीत, स्वच्छतागृह नाहीत, धाबे - हॉटेलांसाठी काही नियमावली नाही. ज्याच्या मनात जसे येईल, जसे शक्य होईल, तसे तो आपापले प्रश्न सोडविताना दिसतो आहे.
आपला जन्म ज्या गावात झाला, त्या गावात आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे, ते शक्य न झाल्यास स्थलांतर करणे, कामांसाठी प्रवास करणे, आपले घरातील आणि घराबाहेरील जगणे सुखकर करणे, (ते जगणे आनंददायी करणे हा तर फार पुढचा टप्पा आहे.) यासाठी सर्वसामान्य माणूस लढतोच आहे. मात्र त्याच्या लढण्याला आजची व्यवस्था न्याय देताना दिसत नाही. अत्याधुनिक जगात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या देशाला बहुजनांचे हित साधण्यासाठी आपण लोकशाही स्वीकारली, या विचाराचा जणू विसर पडला आहे. मला कल्पना आहे की, तीन दिवसांच्या निरीक्षणावरून असे काही निष्कर्ष काढणे बरोबर नाही, मात्र आपल्या आजूबाजूला दिसणारी परिस्थिती यापेक्षा काय वेगळी आहे ?

No comments:

Post a Comment