Tuesday, February 7, 2012

भिनलेले विष काढण्यासाठी....


आता कररचना बदललल्याशिवाय सर्वांना मानाने जगता येणार नाही, हे जाणून तशी आंदोलने युरोप- अमेरिकेत सुरु झाली आहेत. मानवी प्रतिष्टेचा आदर राखण्याचे शहाणपण त्यांनीच आपल्याला शिकविले पाहिजे, असे नाही. मात्र त्या प्रतिष्ठेची आम्हालाही चाड आहे, हे भारतीयांना सिद्ध करावे लागेल. तो सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे, अर्थक्रांतीने सांगितलेला बँक व्यवहार कर. देशाचे आणि पर्यायाने भारतीयांचे शुद्धीकरण करणारा तो मार्ग आपण समजून घेवू यात.

आमच्या देशाचे राजकीय नेते भ्रष्ट आहेत, आमची नोकरशाही लाचखोर आहे, आमचा मध्यमवर्ग लबाड आहे, आमचे शिक्षणक्षेत्र नफेखोरी करते आहे, आमचे बांधकाम व्यावसायिक करबुडवे आहेत, आमचे डॉक्टर आणि हॉस्पीटले धंदेवाईक झाली आहेत, आमचा मेडिया नासला आहे, आमचे शेतकरी आळशी आणि कर्जबुडवे आहेत, आमचे कामगार कामचुकार आहेत, आमच्या देशातील सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते ढोंगी आहेत, आमच्या देशातील श्रीमंत उर्मट आणि उधळे आहेत....यादी अशी बरीच वाढविता येईल. हल्ली दररोज आम्ही सर्व असेच काहीतरी बोलत असतो. आपल्याला किंवा आपण ज्या समूहात काम करतो, तो समूह वगळून सर्व भारतीय समूहांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतो. कारण समूहांना बदनाम करणे सोपे असते. आपण काहीच करायचे नसते. शिवाय आपल्यासमोरील प्रश्नांना इतर समूह जबाबदार आहेत, असे म्हटले की स्वतःची सुटका झाल्याचे समाधान मिळते. खोलात जाण्यासाठी मनाला जो ताण द्यावा लागतो, त्या ताणापासूनही सुटका होते. खरोखरच जे थोडे लाचखोर, कामचुकार, लबाड, आळशी, उर्मट भारतीय आहेत, त्यांचा दिनक्रम बिनबोभाट चालूच राहातो आणि या खंडप्राय, गौरवशाली संस्कृतीच्या 121 कोटी लोकसंख्येच्या देशाला बदनाम करण्याचा परिपाठही वर्षानुवर्षे सुरुच राहातो. आपणच आपल्याला बदनाम करत आहोत, आपणच आपल्याला अप्रामाणिक ठरवत आहोत, हे लक्षातही येत नाही.

मानवी जीवन, मानवी प्रतिष्ठा ज्या समाजाला महत्वाच्या वाटत नाही, तो असेच एकमेकांवर चिखलफेक करत दरिद्रयी, परावलंबी, हतबल जीवन जगणार, यात आश्चर्य ते काय? आधी या देशावर हल्ला करणार्या टोळ्यांनी आणि नंतर इंग्रजांनी भारतीय वंशाला कमी दर्जाचे ठरविण्याची कटकारस्थाने केली आणि आता तर स्वकीयांनीच तो ठेका घेतला आहे. इंग्रजांनी तर अशी मेख मारून ठेवली आहे की आपले अन्न, आपली मातृभाषा, आपला वेष, आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपला देशही आपल्याला कमी दर्जाचा वाटायला लागला आहे. आता तर आपल्या भारतीयत्वाला जगाने बदनाम करण्याची गरजच राहिलेली नाही. बारा महिने 24 तास आत्मवंचनेचा हा करंटेपणा या देशात सुरूच आहे.

आम्ही हा करंटेपणा का स्वीकारला हेही आपल्याला माहीत आहे, आधुनिक जगाच्या व्याख्यांमध्ये आम्ही प्रतिगामी, मागासलेले ठरलो. पोट भरण्याला आम्ही जगणे समजायला लागलो आणि आम्ही पोटभरू झालो. खरे तर त्यांना का दोष द्या ? आम्ही होतोच हतबल. आम्ही विभागलेले होतो. आम्ही राजेरजवाड्यांसमोर हतबल होतो. आम्हीच आमच्या जातीधर्माच्या जाचक परंपरांमध्ये अडकून पडलो होतो. त्यांच्या आगमनामुळे आम्हाला नवे जग कळाले. आधुनिक जगाची ओळख झाली. अमूल्य मानवी जीवनाची नव्याने ओळख झाली. आमच्या लेणी, किल्ले, राजवाडे, मंदिरांकडे आम्ही नव्या दृष्टीने पाहायला लागलो. मानवी आयुष्यातील स्वातंत्र्याची किंमत आम्हाला कळली आणि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठीचे आमचे एकमत झाले. आम्ही स्वतंत्रही झालो. केवळ स्वतंत्रच नव्हे तर प्रजासत्ताक झालो. आता सहा दशके उलटून गेली. मात्र मानवी प्रतिष्ठेचा मुद्दा काही आमच्या अजेंड्यावर आलेला दिसत नाही.

आजची भौतिक समृद्धी आम्ही कष्ट करून मिळविली. भौतिक प्रगतीचे नवनवे टप्पे पादाक्रांत केले. जगाशी बरोबरी करण्याचे प्रयत्न केले. खरे म्हणजे आता स्वधर्माकडेच वळले पाहिजे. स्वतःची, या समाजाची नाळ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पोटभरू, निःसत्व विचारांचा त्याग केला पाहिजे आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे आपलेच समूह बदनाम करण्याचा हा अघोरी खेळ थांबविला पाहिजे.

मूळात हा खेळ का सुरू झाला आहे, हे समजून घेवू. गेल्या सहा शतकात खर्‍या अर्थाने आपण लोकशाहीत जगत आहोत. त्यामुळे जगण्यासाठी जी भौतिक आयुधे लागतात, त्यांची ओढाताण सुरू होणे क्रमप्राप्त होते. तशी ती झालीही, हेही समजण्यासारखे आहे. मात्र सहा दशकानंतरही ती ओढाताण त्याच पद्धतीने सुरू असेल तर तो या महाकाय देशाचा पराभवच ठरू शकतो. तसा आज सुरुच आहे आणि तो कोणामुळे होतो आहे, यासंवंधीचे समूहांचे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. मुळात मेख काय आहे पाहा. भारतासह सारे जग आज पैशाची भाषा बोलते आहे. कारण काहीही असो, आज आपण मानवी जीवनातील सारी सुखदुःख पैशाच्या तराजूत मोजायला लागलो आहोत. आमच्या जगण्याची सर्वच परिमाणे पैशाच्या मार्गाने चालली आहेत. आमचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व्यवहार, आमच्या प्रतिष्ठा पैशाचा व्यवहार विकत घेताना दिसत आहेत. आणि आता तर हा व्यवहार अख्या जगाशी जोडला गेला आहे. त्यामुळे आता माघाराचीही मुभा नाही. जागतिकरण म्हणा, उदारीकरण म्हणा, समाजवाद म्हणा नाहीतर भांडवलशाही म्हणा, तुमच्या आवडीचे काहीही नाव द्या.... त्याने फरक काहीच पड्त नाही. पैशीकरणाने आमचे आयुष्य करकचून बांधून टाकले आहे. पुढे जाण्यासाठी हे आधी मान्य करावे लागेल की पैशाचे व्यवस्थापन महत्वाचे ठरले आहे.

आता आपण पैशाजवळ येवून थांबलो. मात्र खरी मेख पुढेच आहे. पैसा निर्माण होतो. तो पांढरा असतो आणि काळाही असतो. सर्वांचाच पांढरा असतो, तोपर्यंत सर्वांचेच बरे चाललेले असते, मात्र जेव्हा तो काळा व्हायला लागतो, तेव्हा काही जणांचेच बरे चालायला लागते. आज तसेच झाले आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांचे बरे चालले आहे. मात्र ज्यांच्याकडे पांढराच आहे किंवा ज्यांच्याकडे तोही येण्याचे आटले आहे, त्यांची आयुष्य कवडीमोल ठरत आहेत.

हा पैसा काळा कसा झाला? त्याच्या मुळाशी आहे, आजची करव्यवस्था. जाचक कर लादले की कर बुडवून, अतिरेकी नफाखोरी करून काळा पैसा तयार होतो आणि तो देशाच्या देहात विषासारखे काम करायला लागतो. तसे विष आज भारतीयांच्या देहात आणि मनामनात भिनले आहे. ते काढायचे तर एकमेकांचे समूह बदनाम करण्याचे अल्पसंतुष्ट मार्ग आधी थांबवावे लागतील. त्यासाठी करव्यवस्थेच्या मुळाशी जावून ती बदलण्याचा आग्रह धरावा लागेल. आता कररचना बदललल्याशिवाय सर्वांना मानाने जगता येणार नाही, हे जाणून तशी आंदोलने युरोप- अमेरिकेत सुरु झाली आहेत. मानवी प्रतिष्टेचा आदर राखण्याचे शहाणपण त्यांनीच आपल्याला शिकविले पाहिजे, असे नाही. मात्र त्या प्रतिष्ठेची आम्हालाही चाड आहे, हे भारतीयांना सिद्ध करावे लागेल. तो सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे, अर्थक्रांतीने सांगितलेला बँक व्यवहार कर. देशाचे आणि पर्यायाने भारतीयांचे शुद्धीकरण करणारा तो मार्ग आपण समजून घेवू यात.

1 comment:

  1. बँकेतेच करवसुलीमुळे कर भरणे तसेच कर वसूल करणे सोपे होईल. करचुकवेगिरी थांबेल. शासनाचा महसूल वाठेल. परंतु त्यातील त्रृटी दूर केल्या पाहिजेत. समजा मी मित्राला उधारीवर पैसे दिले तर मित्राला कर भरावा लागेल. त्याने परत केल्यावर मला ही कर भरावा लागेल. पाश्चिमात्यदेशांमध्ये आर्थिक संकटाचे एक मोठे कारण तेथे जनता बचत करत नाही. उद्याच्या उत्पन्नावर व्यवहार होतात. या करप्रणालीमध्ये बचतीला प्रोत्साहन नसेल तर भारतसुद्धा अशा संकटात सापडेल. खेड्यांमध्ये पुष्कळसे व्यवहार वस्तूंच्या देवाण-घेवणातून होतात. तीच पद्धत शहरात वापरली जाईल. त्यामुळे करचुकवेगीरीला पूर्णपणे आळा घालता येणार नाही. विचार केला तर आणखी कित्यंक त्रृटी नजरेस येतील. त्या सर्वांवर उपाय शोधून मगच ही कल्पना वास्तवात आणता येईल. यावर विचार न करता वापरण्यास सुरवात केली तर जनतेला त्रास होईल.

    ReplyDelete