Saturday, February 4, 2012

जग आजच एका आवाजात का बोलते आहे ?


आज जे व्हायलाच पाहिजे, ते नुसते बोलले जाते आहे आणि व्यवहारात बरोबर त्याच्या विरूद्ध गोष्टींचा जोर आहे. मात्र फार उशीर होण्याआधी सर्वांनाच जगासमोरील प्रश्नांबाबत प्रामाणिक व्हावे लागणार आहे. कारण सारे जग अशा जहाजात बसले आहे, जे बुडण्याच्या बेतात आहे. ते बुडायला सुरवात झाल्यावर गरीब आणि असंघटितांच्या नाकातोंडात आधी पाणी जाणार आहे, मात्र मधल्या भागात बसलेला मध्यमवर्ग आणि डेकवर आराम करत असलेला श्रीमंत वर्गही बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. त्यांना वाचायचे असेल तर त्यांना जहाजच वाचवावे लागणार आहे.

अख्खे जग आता कसे एका आवाजात बोलायला लागले आहे, याची प्रचिती 42 व्या जागतिक आर्थिक परिषदेत(World Economic Forum) आली. जगापुढील सध्याच्या प्रश्नांवर उपाय सुचविणारी आणि भविष्यातील जग कसे असावे, याचा विचार करण्यासाठीची देवोस (स्वित्झर्लंड) आर्थिक परिषद गेल्या आठवड्यात 29 जानेवारीला संपली. तरूणांसाठी रोजगारनिर्मिती हाच सरकार आणि उद्योगांपुढील अजेंडा असला पाहिजे, असा संदेश या परिषदेने दिला. जगातल्या दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या (121 कोटी) असलेल्या भारतात उदारीकरण आणि किमान 7 टक्के इतक्या चांगल्या विकासादरानंतरही रोजगार पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाहीत, हे लक्षात आले आहे. महासत्ता अमेरिकेला गेल्या सहा महिन्यात बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर उतरल्याने हायसे वाटले आहे. स्पेनसारख्या काही युरोपीय देशांमध्ये तर बेरोजगारीचा दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानसारख्या देशांमध्ये बेरोजगार युवकांची अतिरेकी गटांमध्ये भरती सुरूच आहे. अरब देशांत गेल्या वर्षी झालेल्या उठावांमध्ये तरूण आघाडीवर होते. या सर्व अस्वस्थतेचा जगावर नकारात्मक परिणाम होतो आहे, यावर परिषदेने शिक्कामोर्तब केले.

देवोस परिषदेमध्ये भाग घेणारे 2600 जण हे जगातील जाणकार, विचारी असतात. त्यांच्यावर सरकारचा दबाव नसतो. अतिशय गांभीर्याने जगाच्या प्रश्नावर चर्चा होतात. अशा 260 चर्चा त्या पाच दिवसात होतात. काही देशांचे पहिल्या आणि दुसर्‍या फळीचे नेते परिषदेला आवर्जून उपस्थित असतात. हे सर्व लक्षात घेता या परिषदेचे महत्व लक्षात यावे. हे लोक काय बोलतात, याचे म्हणूनच जगाला कुतूहल असते. गेल्या दोन-तीन दशकात जग ज्या वेगाने बदलले आहे, त्याची दखल ही परिषद दरवर्षीच घेते, मात्र यावर्षी युरोपमधील पेचप्रसंग आणि जगात सुरू असलेल्या नव्या आर्थिक व्यवस्थेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जग एका आवाजात बदलाची भाषा बोलायला लागले, हे महत्वाचे. एका देशाला नव्हे, जगाला एकत्रित काही ठरवावे लागेल, यालाही या परिषदेने पुष्टी दिली. पारंपरिक भांडवलशाही 400 वर्षे जुनी झाली असून तिलाही आता बदलावे लागणार आहे, हाही संदेश परिषदेने दिला आहे. अमेरिका, युरोपमध्ये भांडवलशाही फसल्याची सध्या इतकी चर्चा सुरू आहे की तिच्या भवितव्यावर चर्चा करणे परिषदेला अपरिहार्य ठरले. जगातील एक प्रमुख साप्ताहिक टाईम ने तर हाऊ टू सेव्ह कॅपॅटिलिझम, असा विशेषांकच प्रसिद्ध केला. एवढेच नव्हे तर विविध विचारांच्या विचारवंतांना एकत्र करून त्यांना सध्याच्या भांडवलशाहीवर बोलायला सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर देवोस परिषदेत काय बोलले गेले, ते पाहिले पाहिजे.

परिषदेचा सारांश म्हणून व्यक्त केलेली काही विधाने अशीः 1. आता जगाला अशा विकासाची गरज आहे, ज्यात तरूणांच्या हातांना काम मिळेल. 2. जगातील 200 दशलक्ष लोक सतत कामाच्या शोधात असतात, हे स्वीकारार्ह नाही. 3. जगात सर्वत्र टोकाची विषमता वाढत चालली आहे, जी जगाच्या अजिबात हिताची नाही. 4. शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे. 5. जगासाठी एकत्र काम करण्याची नवी पद्धत आपण शोधून काढली पाहिजे. 6. जगाची आजची परिस्थिती बदलण्यासाठी आता चर्चांचे रूपांतर बदलात, क्रियाशीलतेत व्हायला हवे.

7. समाजाच्या गरजांच्या दृष्टीने भांडवलशाहीला अधिक जबाबदार बनविण्याची गरज आहे.

8. जगातील उद्योगधंद्यांनी समाजाचा विचार केला नाहीतर ते शाश्वत नाहीत, त्यांना सतत नवनवे प्रश्न भेडसावतील. 9. आपल्याला कशा प्रकारचे जग पाहिजे, हे आधी ठरवून पुढे जावे लागणार आहे, त्यामुळे आता व्हीजन ची गरज आहे. ती नसेल तर आपण संपू 10. युरोपमधील बँका अजूनही संकटातून बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे आपल्याला नव्या मॉडेलचाच विचार करावा लागेल. 11. जगासमोर निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगातून एकही देश नामानिराळा राहू शकत नाही. 12. शिक्षण आणि रोजगारसंधीबाबत समन्यायी व्यवस्थेची गरज आहे. विषमतेमुळे समानसंधीचा अधिकार डावलला जातो आहे. 13. उद्योगधंद्यांची जी नवी मॉडेल विकसित होत आहेत, त्यात सामाजिक मूल्यांचा विचार होण्याची गरज आहे. 14. स्वच्छ आणि शाश्वत उर्जेची जगाला गरज असून विकासाचा दर आणि सर्वांच्या गरजेचा विचार करूनच त्यासंबंधीची धोरणे आखली गेली पाहिजेत. 15. 2050 मध्ये जगाची लोकसंख्या 9 अब्जाच्या घरात असेल, मात्र जग या सर्वांना अन्न पुरविण्यात सक्षम असेल.

परिषदेतील या विधानांवरून जगात नेमके काय चालले आहे, हे लक्षात येते. आज जे व्हायलाच पाहिजे, ते नुसते बोलले जाते आहे आणि व्यवहारात बरोबर त्याच्या विरूद्ध गोष्टींचा जोर आहे. मात्र फार उशीर होण्याआधी सर्वांनाच जगासमोरील प्रश्नांबाबत प्रामाणिक व्हावे लागणार आहे. कारण सारे जग अशा जहाजात बसले आहे, जे बुडण्याच्या बेतात आहे. ते बुडायला सुरवात झाल्यावर गरीब आणि असंघटितांच्या नाकातोंडात आधी पाणी जाणार आहे, मात्र मधल्या भागात बसलेला मध्यमवर्ग आणि डेकवर आराम करत असलेला श्रीमंत वर्गही बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकणार नाही. त्यांना वाचायचे असेल तर त्यांना जहाजच वाचवावे लागणार आहे.

तर जग बदलू शकते !

देवोस परिषदेला जगातील एक सर्वाधिक श्रीमंत बिल गेटस उपस्थित होते. त्यांच्या फाउंडेशनने एड्स, क्षय आणि मलेरियाशी लढण्यासाठी आणखी 750 दशलक्ष डॉलरच्या मदतीची घोषणा केली. जगासमोरील आर्थिक प्रश्न जटिल झाले आहेत, पण म्हणून गरीबांसाठीच्या मदतीत कपात करता कामा नये, असे ते म्हणाले. बिल गेटस यांनी गरीबांसाठी मोठी मदत आतापर्यंत केली आहे, त्या मदतीचा आदर राखून गरीबीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, त्याकडे अशा श्रीमंतांचे लक्ष वेधण्याची खरी गरज आहे. अतिरेकी नफेखोरी न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला तरी जग बदलू शकते.

1 comment:

  1. जग बदलायचे असेल तर गांधीजींच्या विश्वस्तवृत्तीच्या कल्पनेचा निश्चीतच विचार करावा लागेल.

    ReplyDelete