Saturday, January 30, 2010

नात्यांत उतरतो आहे व्यवहारवाद !

तो तरूण तावातावाने बोलत होता. आमच्या बुढ्ढ्या मालकाला, आणि सगळ्या बुढ्ढयांना आता गोळ्या घातल्या पाहिजेत. काम ना धाम , भुईला भार एवढेच म्हणून तो थांबला नाही, तर आपणही म्हातारे- त्याच्या शब्दात बुढ्ढे झालो तर आपल्यालाही गोळ्या घालून मोकळे व्हा, असे त्याने जाहीर करून टाकले ! ते केस कापण्याचे दुकान होते आणि आजारी मालक आता घरी बसून कारभार पाहात होता. मला आश्चर्य याचे वाटले की सर्व ग्राहकांसमोर, त्याच्याच सहका-यांसमोर त्याची ही बडबड चालली होती.त्याचे एक कारण असे असावे की मालकाने त्या तरूणाला खूप त्रास दिलेला असावा किंवा काही मानसिक ताणामुळे तो तशी बडबड करत असावा. प्रसंग संपला होता, मात्र माझ्या मनातून तो जायला तयार नव्हता. त्याचे कारण आधुनिक समाजात पदोपदी दिसणारी तरूण आणि वृध्दांमध्ये पडलेली उभी फुट.जणू दोन पिढ्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. ज्याच्या पाउलांवर पाउल ठेवून तरूण पिढी पुढे सरकते आहे, त्याच पिढीला आपली आधची पिढी एकदम नकोशी व्हायला लागते. व्यावसायिक संबंधांमध्ये एकवेळ ही प्रतिक्रिया समजू शकते मात्र हे लोण घरापर्यंत पोचायला लागलते तेव्हा धक्का बसतो. खरे म्हणजे मुलांना आपल्या आईवडिलांविषयी आणि आईवडिलांना मुलांविषयी सतत प्रेम वाटले पाहिजे. प्रत्यक्षात या दोन्ही पिढ्या अनेक ठिकाणी एकमेकांच्या दुःखाचे कारण ठरू लागल्या आहेत.

एखादे छोटे मैदान असावे आणि खेळाडूंना कवायतींसाठी अंतर ठेवून उभे केले असता, जे रांगेच्या बाहेर जातात त्यांना मैदानाबाहेर ढकलून द्यावे, असे हे वाटायला लागले आहे. साने गुरूजींनी एका ठिकाणी असे म्हटले आहे, मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. मरणामुळे संसाराला रमणीयता आहे. मरणामुळे जगात प्रेम आहे. आपण सारे जण अमर असतो, तर आपण एकमेकांस विचारले नसते. गुरूजींचे म्हणणे अगदी खरे आहे. मात्र ते मरणाविषयी बोलत आहे. वृध्दत्वाविषयी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मरण अपरिहार्य आहे म्हणून कोणी मरणाला कवटाळत नाही. जीवन जगण्याची आसक्ती प्रत्येक मनुष्यात असते आणि ते नैसर्गिकच आहे. म्हणूनच मरण येण्याआधीची मानवी आयुष्याची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे, याचा आग्रह धरण्यात चुकीचे काही नाही.खरे म्हणजे दोन पिढींमधील संवाद आणि नाते यावरच आधुनिक समाजचे पुढारलेपण आणि सभ्यतेचे मूल्यमापन केले पाहिजे. आधुनिक समाजाच्या मुल्यमापनात हा मुद्दाच मागे रेटला जातो, ही या समाजाला शोभणारी गोष्ट नव्हे.

जपान, फ्रांससारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांवर होणारा खर्च वाढत चालला आहे, याची चिंता व्यक्त केली जाते. फ्रांसमध्ये तर तो निवडणुकीमधील एक मुद्दा होतो. अमेरिकेमध्येही त्यांच्या आरोग्यावर होणा-या खर्चाविषयी सतत चर्चा होते. याचा एक अर्थ असा होतो की प्रगत समाजाचा एक निकष म्हणजे वाढलेले आयुष्यमान, असे अभिमानाने सांगितले जाते, मग वाढलेले आयुष्य चांगले जगता आले पाहिजे, अशीही व्यवस्था करता आली पाहिजे. तेथे मात्र व्यवहारवाद श्रेष्ठ ठरतो ! या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती वेगळी आहे , असे जर आपण मानत असू तर तो वेगळेपणा समाजजीवनात दिसायला हवा. आज पाश्चिमात्य समाज आणि भारतीय समाजाची या संदर्भात तुलना करून आपल्याकडे कमीपणा घेण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येक बदलात पाश्चिमात्यांच्या पाउलावर पाउल ठेवणा-या भारतीय समाजाची दिशा तीच आहे, हे मान्य करावेच लागते.

मनुष्याचा मनुष्य म्हणून विकास व्हावा म्हणून भारतीय संस्कृतीत चार आश्रमांच्या पाय-या सांगितल्या आहेत. ब्रह्मचर्याश्रम ,गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पिढ्यांचा व्यवहारवादावर होणारा संघर्ष टाळण्यासाठी ही रचना आवश्यकच म्हटली पाहिजे.मात्र ही रचना वेगवान आधुनिक समाजाने गैरलागू ठरविली आहे. खरे तर पूर्वीही जीवनसंघर्ष तीव्र होता आणि आताही तो तेवढा किंवा पूर्वीपेक्षाही तीव्र झाला आहे. पण तो आपल्याच मागच्यापुढच्या पिढ्यांशी व्हावा ? नैसर्गिक निवडीने प्राण्यांची उत्पत्ती किंवा कलहात अधिक कृपापात्र प्राण्यांच्या जातीचे टिकून राहणे असे एक क्रांतिकारी पुस्तक चार्लस डार्विनने १८५६ मध्ये प्रसिध्द केले होते. पण त्याच डार्विनने प्राण्यांमधील परमोच्च विकास मानवात झाला आहे , असेही म्हटले आहे. याचा अर्थ त्याची मानवाकडून वेगळी अपेक्षा होती. ती आधुनिक समाज पूर्ण करीत नाही, असे आता म्हणावयाचे काय?

चिंता याची वाटते की हा व्यवहारवाद आता समाजाचे मानसिक स्थैर्य नष्ट करायला निघाला आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील महाराष्ट्रासारख्या नागरीकरणात वेगाने निघालेल्या मात्र अध्यात्मिक परंपरा सांगणा-या राज्यात यासंबंधी काही वेगळे चित्र दिसते आहे काय ? हे शोधण्याचा प्रयत्न मी गेले काही दिवस करतो आहे . ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना, मोफत आरोग्य शिबिरे, निम्या किमंतीत साधा प्रवास, पुण्यामुंबईसारख्या शहरांत त्यातील श्रीमंतांसाठी स्वतंत्र वसाहती, काही चांगले वृध्दाश्रम आणि बागांमधील बाकडे यापलिकडे वेगळेपण जात नाही.आधीच्या पिढीसाठीचं हे जे करणं आहे, त्याला खूपच संघटित रूप येण्याची गरज आहे. आमच्या कुटुंबातील नात्यांसह समृध्द जगण्याचा व्यवहारवादात संकोच होतो आहे, हे तर दररोज अनुभवाला येते आहे. त्याची आर्थिक, सामाजिक कारणे आहेत, मात्र ज्या टप्प्यावर प्रत्येकालाच जायचे आहे, त्यासाठीची चांगली रचना केली पाहिजे, असे बेंबीच्या देठापासून का वाटत नाही , हा खरा प्रश्न आहे. याचा एक अर्थ असा की आम्ही आमच्याच वर्तमानात इतके गुंतलो आहोत की जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे याची आठवण या वर्तमानात येतच नाही. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्याच्या संभ्रमानेही आम्हाला वेडे केले आहे. असे म्हणतात की, आईवडील आणि मुले यांच्या नात्यात पडणारी फुट हा लोकशाही प्रसाराचा थेट परिणाम आहे. मुलांवर हक्क सांगायला आईवडील कचरू लागले आहेत, तर आईवडिलांकडे उपयोगिता म्हणून पाहण्याची आणि त्यांचा आदर न करण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढत चालली आहे. कारण काहीही असो , ते दुष्टचक्र आहे, हे ओळखता येत नसेल तर आमच्या संस्कृतीतील वेगळेपण आणि अध्यात्मिक वारसा आम्ही कसा सिध्द करणार आहोत ?

No comments:

Post a Comment