Thursday, January 21, 2010

काळाशी ओळख पटत नाही म्हणून.....

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद त्याच नावाने नुकताच प्रसिध्द झाला.हा अनुवाद करण्याची संधी मला मिळाली, हा माझ्या आनंदाचा एक भाग झाला, मात्र यानिमित्ताने जगातील सर्वात शक्तिशाली माणसाचे आयुष्य असे असू शकते, हे जाणून घेतल्यावर मी अवाक् झालो.ओबामांची निवड हा जगातील परिवर्तनाचा एक मोठा टप्पाच म्हणावा लागेल. ओबांमांच्या आयुष्यातील एका प्रसंगाकडे आपले लक्ष वेधायचे आहे.

आपली मूळभूमी केनियात नातेवाईकांना भेटण्यासाठी ते मोठ्या ओढीने जातात. सुखदुःखाच्या गुजगोष्टी करताना लक्षात येते की त्यांच्यातील अंतर फारच वाढले आहे आणि त्याचे एक प्रमुख कारण भाषा आहे. ओबामा आपल्या ग्रँनी आजीला भेटतात. त्यावेळचे हे वर्णन पहा. ‘अर्ध्या वाटेवर मी आणि ग्रँनी दोघेच होतो. ग्रँनी माझ्याकडे बघून हसली अन् म्हणाली , हेलो. मुसावा, मी लुओ भाषेत उत्तरलो. आमची शाब्दिक देवाणघेवाण तेथेच संपली. ऑमा येईपर्यंत आम्ही दोघेही विचित्रासारखे जमिनीकडे बघत बसलो होतो. एकदम गप्प ...चूपचाप. ऑमा आल्यावर ग्रँमी तिच्याशी काहीतरी बोलली. ते मला कळलं नाही., पण तिच्या स्वरातून तिची खंत , वेदना मला जाणवली.... अगदी थेट आपल्या मुलाच्या मुलाशी चार शब्द बोलताही येउ नये, याचं तिला वाईट वाटत होतं. ऑमाला मी म्हटलं, “तिला सांग., मला खरचं लुओ भाषा शिकून घ्यायची आहे. पण काय करू तिकडे अमेरिकेत वेळच मिळत नाही. मी किती कामात असतो,ते सांग तिला.” “ तिला ठाउक आहे ते ” ऑमा माझ्याकडे बघत म्हणाली , “ पण स्वतःच्या माणसांना जाणून घेण्यासाठीही वेळ मिळू नये, इतका माणूस कामात मग्न असावा, हे तिला पटत नाही.”

ओबामा आणि आजींच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना आहे, मात्र मायबोलीत संवाद करू न शकल्याने त्यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.काळाशी ओळख पटली नाही आणि तणाव निर्माण झाला, अशी वेळ क्षणोक्षणी येते, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. यासंबंधीचा एक वेगळा अनुभव परवा आला. मराठी भाषेचे अभ्यासक मुंबईचे शुभानन गांगल आणि मी कोल्हापूरच्या शतकोत्तर हीरकमहोत्सव साजरा करत असलेल्या करवीर वाचन मंदिरच्या वि.स. खांडेकर व्याख्यानमालेत ‘ शोध मराठीचा’ या विषयावर बोलण्यासाठी गेलो होतो. कोल्हापुरात जो आपलेपणा वाटतो, त्याचा शोध घेताना काळाशी ओळख पटण्याचा हा मुद्दा लक्षात आला. आपल्या भाषेविषयीचे विवेचन कोल्हापुरकरांनी तन्मयतेने ऐकले. कोल्हापुरातील मराठमोळ्या वातावरणातमुळे नकळत मोकळेपणा निर्माण होतो. काळानुसार माणसाने बदलले पाहिजे, हा नव्या काळाचा मंत्र झाला आहे, हे खरे असले तरी किती बदलले पाहिजे, याचे भान राहात नसल्याने आपल्या समाजातील तणाव वाढत चालला आहे, असे मला वाटते. आमचा पेहराव, आमची भाषा, आमचे शिक्षण, आमचे दैनंदिन जीवन- याची ओळख पटेनाशी होते म्हणून तणाव वाढतो. मी धाडस करून असे म्हणेन की विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येमागे हेच कारण आहे. त्यांची आणि ते जे शिक्षण घेत आहेत त्याची ओळख पटत नाही. ते ज्या स्पर्धेला सामोरे जात आहेत, तिची त्यांना ओळख पटत नाही. आपण परक्या जगात आलो आहोत, असे त्यांना वारंवार वाटायला लागले आहे.

मानसिक ताणतणावावर आज मोठी चर्चा सुरू आहे. अत्याआधुनिक काळात त्याविषयीचा अभ्यासही सुरू आहे, मात्र तो टाळण्यासाठीची कृती क्वचितच पाहायला मिळते. वेगवान बदलांमध्ये काहींचे हितसंबंध तयार होत आहेत, अशी माणसे, संस्था, कंपन्या आणि देश बहुजन समाजाला ओळखच न पटलेल्या काळाची भलावण करतात आणि ते बदल स्विकारायला भाग पाडतात. मानसिक ताण येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सतत अपरिचित माणसांचं सान्निध्य , असं मानसशास्त्रातही मानलं जातं. हे अपरिचितपण आता माणसांपुरतं राहिलेलं नाही. महानगरांमध्ये हे अपरिचितपण सर्वव्यापी होत चाललं आहे. त्यातून मिळणारा अपरिहार्य ताण घेवूनच माणसं घरादारात वावरत असतात आणि त्यातून समाजाचं मानसिक आरोग्य बिघडत जातं.विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याचं कारणही तेच आहे.

खरे म्हणजे काळ झपाट्याने बदलत असला तरी माणूस तोच आहे, जो पूर्वीही दोन पायांवर उभा राहात होता आणि आजही. यश, आनंद, समाधान या संकल्पनाही सनातन आहेत. त्यामुळे या गोष्टींचे भान ठेवूनच आपल्याला नव्या बदलांकडे पाहावे लागेल. नव्या बदलातही आमच्यातले जैवसंबंध महत्वाचे आहेत, हे मान्य करावेच लागेल. त्यासाठी आमची संस्कृती, आमची भाषा, आमचे मुळ, आमचा पेहराव हे परके वाटता कामा नयेत. महानगरांमधल्या गर्दीत परिचय अशक्य असला तरी आजूबाजूंच्या माणसांवरचा विश्वास वाढवित राहिला पाहिजे. सर्व गोष्टी व्यवहाराच्या रेट्यापोटी होतात, असे याकडे पाहता येणार नाही. काही कळीच्या गोष्टी जाणीवपूर्वकही कराव्या लागतील. त्यासाठी जेथे आपली ओळख पटते त्या समाजात या मुद्दयांवर एकजूट व्हायला हवी. याचा अर्थ अस्मितेचे प्रश्न टोकदार करून इतरांचा द्वेष करा असे कोणी म्हणणार नाही.मात्र काळ बदलला म्हणून आपल्या आईवडिलांना विसरा, हे म्हणणे जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच संस्कृती, भाषा, मुळ आणि पेहरावाचेही आहे.सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी फ्रेंच भाषेचे वर्चस्व कायदे आणि दंड करून संपविले. याच कारणासाठी बंगाली जनतेने उर्दु भाषकांचे भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्व संपविले. तसे आता कदाचित करता येणार नाही, मात्र आमची संस्कृती, भाषा, मुळ आणि पेहरावासारख्या मुळ गोष्टी अपरिचित आणि अपनानित होणार नाहीत,याची काळजी घ्यावीच लागेल.

No comments:

Post a Comment