Sunday, January 17, 2010

रस्त्यांवरची संस्कृती नेमकी कुणाची?

पुण्याच्या मध्यभागात चारचाकी गाडी घेउन आता जाता येत नाही , म्हणजे अजूनही मोठमोठ्या गाड्या घेउन लोक जातात, मात्र स्वतःला
आणि इतरांना मनस्ताप देण्याची तयारी ठेवावी लागते. कपडे, काही पुस्तके, आणि काही ठेवणीतल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी अशा गर्दीत
तुम्हाला कधीतरी जावेच लागते. शहरांमधली गर्दी, वाहतूक कोंडी, प्रचंड आवाज हे सर्व आता आपल्या सरावाचे झाले आहे, इतके की ते सर्व आपण गृहितच धरले आहे. मात्र हे गृहित धरणे किती धोकादायक ठरू शकते, याचा एक अनुभव नुकताच घेतला. वाहतुक कोंडीसारख्या तणावाच्या प्रसंगात
माणसे कशी व्यक्त होतात , यातूनच त्या समाजाची ओळख होते. ही ओळख किती वेगळी आहे, हेही यानिमित्ताने लक्षात आले.
पुण्यात सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. सवाई गंधर्वसारख्या उत्सवासाठी या काळात अनिवासी भारतीयही येतात, असे म्हटले जाते. या कार्यक्रमांचे प्रमाण आणि त्या कार्यक्रमांचे विषय पाहून हा समाज किती सुसंस्कृत आणि प्रगल्भ आहे , असे वाटू शकते.मात्र त्याच शहरांच्या रस्त्यांवर दिसणारी संस्कृती त्यापेक्षा वेगळेच काही सांगते आहे. समाजातील मोजक्या लोकांकडे संपत्तीची रेलचेल झाली आणि त्याच समाजातील बहुतांश समाज प्राथमिक गरजांभोवतीच फिरत असेल तर काय होते , याचे बटबटीत चित्र आपल्या शहरांमध्ये विशेषतः रस्यांवर सध्या पाहायला मिळते आहे. येथे उदाहरण पुण्याचे घेतले असले तरी ही परिस्थिती सर्वत्र सारखीच आहे , हे लक्षात घ्यावे.
· शहरात चारचाकी घेउन त्या गर्दीत भर घालण्यापेक्षा आणि पार्किंगसाठी घाम काढण्यापेक्षा रिक्षाने जाण्याचे मी ठरविले. रिक्षाने फिरणे परवडणे हा स्वतंत्र भाग झाला. मात्र हल्ली अनेक लोक हा प्रयोग करताना दिसतात. रिक्षावाले प्रवाश्यांसशी नीट बोलत नाही , ही तक्रार म्हणून ठीक आहे, मात्र या प्रकारच्या रस्त्यांवर दिवसभर फिरणा-या माणसाच्या तणावाची पातळी काय थराला जात असेल
, याची नुसती कल्पना करून पाहिली तरी ही तक्रार आपण मागे घेतो. त्यादिवशी ती रिक्षाही एका चौकात कोंडीत अडकली.कोंडी का झाली हे लक्षात येत होते. चारी बाजूंनी वाहनांचा पूर येत होता आणि प्रत्येकाला थोडाही वेळ न थांबता पुढे जायचे होते . सर्वांनाच घाई होती. घाईशिवाय आम्ही कुठे रस्त्यावर असतो? वाहतूक नियमन करण्यासाठी त्या चौकात कधी पोलिस लागत नाही, त्यामुळे तोही नव्हता. यापुढे अशा प्रत्येक चौकात पोलिस तैनात करावे लागतील, तो दिवस दूर नाही. सर्वच चालकांनी जणू ‘ मी जागचा हलणार नाही,’ ‘पुढेच जात राहील,’ ‘इंचभरही मागे हटणार नाही’ असा दृढ निश्चय केला होता.. त्यामुळे गर्दी वाढतच होती. कोणीच पुढे जाउ शकत नाही हे सिद्ध झाल्यावर त्या चौकात भाषणबाजी सुरू झाली. सरकार, पोलिस, हॉर्न वाजविणारे, मोठ्या गाड्यांवाले, रिक्षावाले, मधूनच वाट काढणारे दुचाकीस्वार, हातगाडीवाले आणि पायी चालणारे .. या सर्वांचा उद्धार केला जात होता. आपल्याला पुढे जाणे किती आवश्यक आहे, यासंबंधीचे शब्द कानावर पडत होते. कोणी काही म्हणत असला तरी प्रत्येकाचे लक्ष मात्र जागा मिळाली की रेटून पुढे सरकण्याकडे होते.या सरकासरकीत वाहतूककोंडी आणखी पक्की होत होती
, याचा मात्र बहुतेकांना विसर पडला होता. वाईट याचे वाटते की अशावेळी सर्वस्तरातील बहुतेक माणसे सारखीच वागतांना दिसतात.काही अपशब्द, शिव्याही कानावर पडत होत्या. श्रीमंत, सुसंस्कृत हे स्तरही ओळखू येत नाहीत. कोंडी इतकी वाढली की पुढच्या मोठ्या चौकांतील वाहतुकीवरही परिणाम झाला. तेथील काही पोलिसांना धाव घ्यावी लागली. पोलिसांच्या शिट्या सुरू झाल्यावरच थोडी हालचाल सुरू झाली. त्यातही रिक्षावाले, काही दुचाकीस्वार पोलिसांना घाबरून थबकले. बहुतेक चारचाकीवाल्यांना तर पोलिस आल्याचाही काही फरक पडल्याचे दिसले नाही.
· वाहतूक कोंडीसारखे तणावाचे प्रसंग आमच्या आयुष्यात वाढत आहेत. त्याची कारणेही सगळ्यांना माहीत आहेत. प्रश्न असा आहे की या प्रसंगामधील तणाव कमी करण्यासाठी आम्ही काही करू शकतो काय? वाढता तणाव टाळण्याचे दोन मार्ग आहेत, असे मला वाटते. पहिला आणि खरा मार्ग आहे तो म्हणजे समाजातील वाढत चाललेले स्तर कमी करणे. पण तो फार मुळातला बदल आहे. तो आम्हाला पेलवेल अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. दुसरा मार्ग आहे तो जीवनाचा आपणच वाढविलेला वेग कमी करण्याचा. खरे सांगायचे तर तोही आपल्या हातात राहिलेला नाही. चौपदरी, दहापदरी रस्ते, उड्डाणपुल असे काही भौतिक मार्ग कोणी नाकारणार नाही, मात्र भारतासारख्या ११२ कोटी लोकसंख्येच्या देशात तेवढेच करून भागणार नाही.
· ‘जगात शास्त्रांचा कितीही विकास झाला
, तरी जोपर्यंत जीवनकला माणसास साधत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ होय. समाजात परस्परांशी कसे वागावयाचे ते आधी शिका’ असे तत्वचिंतक टॉल्स्टॉय म्हणत . या आणि अशा अनेक प्रसंगात या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. विशेषतः आपल्या शहरांमध्ये आपल्याच परिसराकडे जे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे, त्या त्या वेळी आपण जीवनकलेत बरेच मागे पडलो आहोत, हे मान्य करावे लागते.
· समाजात आलेल्या समृद्धीचा आनंद आहेच, मात्र त्याला जीवनकलेच्या समृद्धीची जोड मिळाली तर किती चांगले होईल . कलेच्या माध्यमातून ही समृद्धी वाढते असे म्हणतात. कलांचा, शास्त्रांचा एवढा विकास झालेला आज दिसतो आहे की त्या तुलनेने आमच्या रस्त्यांवर जी बकाल संस्कृती दिसते आहे तिचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार आहे? जेव्हा मुलभूत गरजा भागवूनही माणूस तणावातच जगत असेल तर त्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजावे, असे म्हणतात. सध्याच्या शहरी संस्कृतीकडे पाहिल्यावर मानसिक संतुलन बिघडलेलीच माणसे एकमेकांभोवती फिरताहेत की काय, अशी शंका येते.
- यमाजी मालकर , पुणे