Sunday, December 29, 2013

जोडीदाराची समतेची समज वाढण्यासाठी...





लोकशाही, समानतेच्या तत्वाची सुरवात घरातून म्हणजे कुटुंबातून आणि त्यातही ती स्त्री पुरुष समानतेतून होते, हे लक्षात घ्यावेच लागते. ज्यांना आजही ही तत्व दूरची वाटतात, त्यांनी स्त्री पुरुष ही शारीरिक विभागणी सर्व निसर्गात असून ती १०० टक्के नैसर्गिक आहे आणि ती स्वत:कडे कमीपणा घेणाऱ्या स्त्रीच्या किंवा पुरुषत्वाचा अहंकार बाळगणाऱ्या पुरुषांच्याही हातात नाही, हे समजून घ्यावे म्हणजे समजदार जोडीदार प्रकल्पात स्वत:हून भाग घेण्याची प्रेरणा आपोआपच मिळेल. राज्यात सुरु असलेला समजदार जोडीदार प्रकल्प या जाणीवेला प्रेरणा देणारा आहे..

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांनी भारतात स्त्री पुरुष समानतेचा पाया घातला त्याला आता तब्बल १५० वर्षे उलटून गेली, मात्र या आघाडीवर समाजात किती जागरुकता आली, हे जाणण्याची एक संधी परवा म्हणजे २६ डिसेंबर रोजी सोलापुरात मिळाली. युएनएफपीए नवी दिल्लीच्या सहकार्याने आणि सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल जस्टीस या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अक्कलकोट, सोलापूर, सांगोला, पुणे, केज आणि बीड या पाच भागांतील १०० गावांत जून २०१० पासून समजदार जोडीदार प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात गेले तीन वर्षे नेमके काय झाले, याचा लेखा जोखा मांडण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या भागात अनेक आरोग्य प्रकल्प राबविणारी हॅलो मेडिकल फौंडेशन (डॉ. शशिकांत अहंकारी) आणि सांगोल्याची अस्तित्व संस्था (प्रा.विलास बेत) हे त्यांच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबवितात.

यानिमित्त लक्षात असे आले की सध्याच्या गदारोळात सध्याच्या कुटुंबात आणि विशेषतः जोडप्यांचे परस्परांशी सबंध कसे आहेत, यावर जाणीवपूर्वक असा विचार कमी होतो. त्यातही पती पत्नी संबंधाचा विचार होतो, विषमता कमी झाली पाहिजे, याविषयी खूप काही बोलले जाते, मात्र जोडप्यातील पुरुषाला विश्वासात घेतले जात नाही. मुळात विषमता ही परंपरा आणि परिस्थितीने लादलेली आहे, हे विसरून पुरुषी अहंकाराविषयी एकतर्फी बोलले जाते. पण या प्रकल्पात पुरुषांना काय वाटते, याचा विचार करून त्यांना याकामी पुढाकार घेण्यास प्रवृत्त करण्यात आले, हे मला महत्वाचे वाटले. तीन वर्षात नेमके काय झाले, हे तर या चार तासांच्या कार्यशाळेत समोर आलेच पण अशा उपक्रमाची किती गरज आहे, हेही प्रकर्षाने जाणवले. समजदार म्हणजे आज पुरुषांनी समजदार भूमिका घेतली पाहिजे, असे सहजपणे बोलले जाते, कारण तो त्याच्या पुरुषी अहंकारातून बाहेर आलेला नाही, हे खरे असले तरी आपल्याला जोडीदारांची म्हणजे दोघांची समज वाढवायची आहे, हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी लक्षात आणून दिले. (निर्मलग्रामची जिल्ह्यात पुर्तता होत नाही, तोपर्यंत या ताईंनी पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला आहे आणि सध्या त्या सर्वत्र अनवाणीच जातात, हे तेथे कळाले. ग्रेट) पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून पुरुषांच्या पुढाकाराची ही गरज पूर्वीही व्यक्त केली गेली आहे, मात्र तिला व्यापक स्वरूप कधीच मिळू शकलेले नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात हा विचार रुजतो आहे, हे महत्वाचे.

या प्रकल्पातून नेमके काय साधायचे आहे, याची यादी मला खूप लांबलचक वाटली. लिंगाधारित विषमतेची वागणूक कमी करणे, गावातील मुलांत(पु) समानतेची जाणीव निर्माण करणे, मुले आणि पुरुषांनी स्त्रीयांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुढाकर घेणे, पंचायत व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढविणे, संपत्तीत समान हक्क निर्माण करणे, कौटुंबिक कामात पुरुषांचा सहभाग वाढविणे, मुलींच्या शिक्षण गळतीचे प्रमाण थांबविणे, प्रजननात्मक आरोग्य काळजीत पुरुषांची जबाबदारी वाढविणे आदी. आपल्याकडे असलेली साधने, निधी आणि सध्याची आर्थिक सामाजिक परिस्थीती लक्षात घेता एवढी सारी उद्दिष्ट्ये समोर ठेवून प्रकल्प पुढे नेणे जिकीरीचे होऊ शकते. त्यापेक्षा यातील निवडक उद्दिष्टांवर केलेले काम अधिक फलदायी ठरू शकते, असे मला वाटते.

कार्यशाळेत ज्या यशकथा सांगण्यात आल्या, त्यांची चर्चा किमान त्या त्या भागात झाली तरी स्त्री पुरुष समानतेला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्या पुरुषांच्या मनात समानतेविषयीची स्पष्टता आहे, त्यांना त्या दिशेने जाण्यास मानसिक बळ मिळू शकते. मुळात लोकशाही, समानतेच्या तत्वाची सुरवात घरातून म्हणजे कुटुंबातून आणि त्यातही ती स्त्री पुरुष समानतेतून होते, हे लक्षात घ्यावेच लागते. ज्यांना आजही ही तत्व दूरची वाटतात, त्यांनी स्त्री पुरुष ही शारीरिक विभागणी सर्व निसर्गात असून ती १०० टक्के नैसर्गिक आहे आणि ती स्वत:कडे कमीपणा घेणाऱ्या स्त्रीच्या किंवा पुरुषत्वाचा अहंकार बाळगणाऱ्या पुरुषांच्याही हातात नाही, हे समजून घ्यावे म्हणजे समजदार जोडीदार प्रकल्पात स्वत:हून भाग घेण्याची प्रेरणा आपोआपच मिळेल.


समजदार जोडीदार प्रकल्पाच्या काही यशकथा
- ज्ञानेश्वर पाटील, शिवानंद कांबळे यांना या पुढाकारामुळे पदे मिळाली.
- अमृत मुळे यांनी बालविवाह रोखला.
- माणिकचंद यांनी बोगस डॉक्टरला गावाबाहेर काढले.
- विक्रम सोनकांबळे यांना आपली चूक कळाली आणि त्यांनी पत्नीला परत बोलावले.
- बाबासाहेब माने यांनी २५ युवकांना व्यसनमुक्त केले.
- घर दोघांच्या नावे करण्याच्या चळवळीला चालना मिळाली.
- १०२ या आरोग्य संदर्भ सेवेच्या माहितीचा प्रसार झाला.


No comments:

Post a Comment