Monday, August 5, 2013

राजकारणच पण व्हाया सुजन व्होट बँक !भारतीय लोकशाहीच्या शुद्धीकरणाची आज गरज आहे. ते शुद्धीकरण म्हणजे नेमके काय, ते कसे होणार, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्या सर्व मतप्रवाहांचे स्वागत केले पाहिजे. त्यात ‘सुजन व्होट बँक’ हा एक नवा संकल्प आहे. सर्व १२५ कोटी भारतीय आपले बांधव आहेत, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर आपली पूर्ण श्रद्धा आहे, प्रत्येक भारतीयाच्या भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त जीवनासाठी आपण कटिबद्ध आहोत, या साऱ्या भारतवर्षाला कवेत घेणारी तत्व सोबत असतील तर राजकारण करायला कोण आणि का नको म्हणेल?

भारतातील कोणत्याही बदल लोकशाही मार्गाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, याचे भान ज्यांनी ठेवले नाही, त्या सर्वांना एकतर माघार घ्यावी लागली किंवा लोकांनीच त्यांना नाकारले. त्यामुळे आता हुकुमशाहीच हवी, सर्वांना फटक्यांनी मारले पाहिजे, सर्वाना उडवून दिले पाहिजे, समुद्रात बुडविले पाहिजे, अशी भाषा लक्षवेधी वाटते खरी, मात्र पुढे त्यातून काहीच साध्य होत नाही, हे आपण पाहत आलो आहोत. या देशात सर्वव्यापी बदल करायचा असेल तर लोकशाहीशिवाय दुसरा मार्ग नाही, हे अखेरीस मान्यच करावे लागते.

या महाकाय देशासमोर समस्यांचे ढीग पडले आहेत आणि बदलाचा वेग तर इतका मंद आहे की ज्या बदलांना आज सुरवात केली ते बदल आपल्या आयुष्यात पाहायला मिळाले तरी फार, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. हे केवळ सामाजिक बदलांविषयी खरे नाही तर राजकीय आणि आर्थिक बदलांची तीच स्थिती झाली आहे. संतांनी, त्यांनतर समाजसुधारकांनी सुरु केलेले सामाजिक बदल समाजाने आजतरी स्वीकारले आहेत काय, या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आपण देऊ शकत नाही. हा काळ आहे ६०० ते ७०० वर्षांचा ! अरे बापरे! म्हणजे सामाजिक बदलांसाठी एवढा मोठा काळ लागतो आहे तर! अर्थात सामाजिक बदलाचा प्रवास येथून सुरु झाला आणि येथे संपला, असा मोजता येत नाही. ते बदल समाजात सातत्याने सुरूच आहेत आणि सुरूच राहणार आहेत. भारतीय समाजात सामजिक बदलांचे महत्व वादातीत असून देश पारतंत्र्यात असतानाही आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा हा वाद म्हणूनच आगरकर आणि टिळकांमध्ये झाला. कारण सामाजिक सुधारणांशिवाय मिळालेले स्वातंत्र्य काय कामाचे, असा मतप्रवाह आपल्या देशात होता. तो चुकीचा नव्हता, याची प्रचीती आज समाजाला आली आहे. अर्थात देश इंग्रजांच्या जोखडातून सोडवून घेणे, यालाही तेवढेच महत्व होते, हेही विसरून चालणार नाही.

स्वातंत्र्यानंतर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व बदलांना वेग येईल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र कोणताच बदल गती पकडू शकला नाही. त्याचा रोष आज लोकशाही शासनपद्धतीवर व्यक्त होतो आहे, हे समजून घेतले पाहिजे. मात्र लोकशाहीशिवाय दुसरी आणि लोकशाहीपेक्षा अधिक चांगली काही पद्धत आहे काय, याचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल. ते उत्तर ‘नाही’ असे आहे. त्यामुळे आपल्यासमोर एकच पर्याय राहतो तो म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही; जगातील सर्वात चांगली लोकशाही कशी बनेल, यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठीचे बदल विशिष्ट काळात केले गेले नाहीत म्हणून त्याचे विपरीत परिणाम कोट्यवधी भारतीय आज सहन करत आहेत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे मात्र या लोकशाहीत जी विकृती घुसली आहे, ती त्यासाठी काढावी लागेल. ती कशी निघेल आणि आपल्याला प्रामाणिकपणे, समाधानाने कसे जगता येईल, याचा शोध लाखो सुजन भारतीय सध्या घेत आहेत. या बदलाची अपरिहार्यता ज्याला कळाली आहे, तो तो सुजन अशा समूहांत सहभागी होऊन त्या बदलाला गती देण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या काही वर्षांत अशा बदलाचा पुकारा करणाऱ्या परिषदा, अधिवेशने, कार्यशाळा, संमेलने देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहेत. त्यातून नेमक्या काय आणि किती बदलाला गती मिळते, हे येथे महत्वाचे नाही. महत्वाचे हे आहे की बदलाची गरज मान्य करणारे आणि बदलावर विश्वास असणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि ते एकत्र येत आहेत. त्यामुळे एकत्र येणाऱ्या सुजनांचे आधी स्वागत केले पाहिजे. आज त्यांना आपला समूह जात, धर्म, पक्ष, संघटना, व्यवसाय, नोकरीच्या माध्यमातून सापडला आहे, मात्र अशा समुहात राहून आपण राष्ट्रीय म्हणजे सर्व भारतीयांशी नाळ जोडू शकत नाही, हेही त्यांना लक्षात यायला लागले आहे. बदल हवा आहे मात्र या मार्गाने गेले तर बदलाची आपल्याला अपेक्षित असलेली दिशा सापडत नाही, असाही त्यांचा अनुभव आहे. अशा समूहांच्या नेत्यांनी बदलाचे जे दावे केले होते, ते पूर्ण होत नाही, हेही आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अशा समूहाचे नेते आणि कार्यकर्ते नवी हत्यारे शोधत फिरताना दिसत आहेत. काहींना त्यातील फोलपणा आता कळून चुकला आहे तर काही कळून वळायला तयार नाहीत. काहींनी स्वत:च्या गुढ्या उभारल्यामुळे दुसरा योग्य मार्ग दिसत असताना तो अनुसरण्याचे धाडस त्यांना होत नाही. एकूणच परिवर्तनाच्या वाटेत नैराश्याने ग्रासलेल्यांचीही संख्या वाढत चालली आहे.

बदल तर हवा आहे आणि तो लोकशाहीच्या मार्गाने न्यायचा तर निवडणुका अटळ आहेत. ज्याला बदलासाठी सत्ता हवी आहे त्यातील प्रत्येकाने निवडणूकच लढविली पाहिजे, अशी मात्र अजिबात गरज नाही. ज्या राजकीय नेत्यांना, त्या व्यवस्थेला आपण सारखा दोष देत आहोत, त्या व्यवस्थेत आपले काहीनाकाही स्थान निर्माण केले पाहिजे, याला मात्र पर्याय नाही. सुजन व्होट बँक हा ‘अर्थपूर्ण’ चा हा अतिशय वेगळा विषय बदलावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. जग बदलले आहे आणि बदलासाठीची आपली हत्यारे आता आपल्यालाही बदलावी लागतील, असे मानणाऱ्या जागरूक, संवेदनशील नागरिकांसाठी, ज्या तरुणांच्या मनात अन्यायाची चीड आहे आणि ज्यांना ताठ मानेने त्याविरोधात उभे राहायचे आहे, त्यांच्यासाठी, ज्यांना निवडणुकीतील जात, धर्माच्या व्होट बँकेने त्रासले आहे, त्यांच्यासाठी, सज्जनांची एक मुठ व्हावी, अशी मनात तीव्र इच्छा बाळगणाऱ्या आणि सज्जन एकत्र का येवू शकत नाही, हे कोडे घेऊन जगणाऱ्यासाठी आणि देशासाठी खरोखरच काही करू इच्छिणाऱ्या अशा प्रत्येकासाठी आहे.

आपल्या खासदारकीच्या निवडणुकीला आठ कोटी रुपये खर्च झाला, हे गोपीनाथ मुंडे यांनी एक (उघड) गुपित सांगून टाकले, हे फार चांगले केले. आता अर्थसत्ता कशी राजकारणावर कुरघोडी करते आहे, हे वेगळे सांगण्याची गरज राहिली नाही. त्या अर्थसत्तेला शिस्त लागल्याशिवाय आपल्या देशाचे सध्याचे प्रश्न सुटू शकत नाही, असे अर्थक्रांती गेले एक तप सांगते आहे. मात्र आता त्यासाठी थेट काही करण्याची वेळ आली आहे. ती थेट कृती म्हणजे ‘सुजन व्होट बँक’. तुल्यबळ उमेदवार निवडणुकीला उभे राहतात आणि राहणार. आपणच निवडून येणार यासाठी ते प्रयत्न करणार. त्यामुळे ते भावनिक मुद्दे मांडून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न करणार. त्यांना वारेमाप आश्वासने देणार. हे आतापर्यंत होतच आले आहे. आता मात्र निवडणूक ठोस मुद्द्यांवरच झाली पाहिजे, असा आग्रह ‘सुजन व्होट बँक’ धरणार आहे. त्या ठोस मुद्यावर आम्ही ‘सुजन’ एकगठ्ठा मतदान करणार आणि त्यातल्या चांगल्या म्हणजे ठोस मुद्यांवर मतदान मागणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार, असे ‘सुजन’ म्हणणार आहेत. लोकशाहीमध्ये आपले मत पवित्र आणि बहुमोल मानले जाते. त्याचे पावित्र्य आणि मोल अबाधित ठेवून देशात सकारात्मक बदल मतपेटीतून घडवून आणणारी एक क्रांतीकारी चळवळ म्हणजे सुजन व्होट बँक. (ती प्रत्यक्षात कसे काम करेल यासाठी अर्थपूर्णच्या ऑगस्टच्या अंकात वाचा अनिल बोकील यांची मुलाखत आणि प्रसाद मिरासदार यांचा लेख.)
भारतीय लोकशाहीच्या शुद्धीकरणाची आज गरज आहे. ते शुद्धीकरण म्हणजे नेमके काय, ते कसे होणार, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्या सर्व मतप्रवाहांचे स्वागत केले पाहिजे. त्यात ‘सुजन व्होट बँक’ हा एक नवा संकल्प आहे. सर्व १२५ कोटी भारतीय आपले बांधव आहेत, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीवर आपली पूर्ण श्रद्धा आहे, प्रत्येक भारतीयाच्या भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त जीवनासाठी आपण कटिबद्ध आहोत, या साऱ्या भारतवर्षाला कवेत घेणारी तत्व सोबत असतील तर राजकारण करायला कोण आणि का नको म्हणेल?