Friday, July 26, 2013

कोठे आहेत श्रीमंत ? आपण तर सारेच गरीब !
भौतिक समृद्धीवर भारतीय समाज भाळला आहे. कारण इतिहासातील सुवर्णकाळ सोडला तर गेल्या शेकडो वर्षांत अशी समृद्धी आणि स्वातंत्र्य त्याने अनुभवलेलेच नाही. त्यामुळेच त्याने आजतरी साधनांचा पुरेपूर वापर करून आनंद लुटण्याचा मार्ग निवडला आहे. ते चांगले नाही, असे बोलले आणि लिहीले जाते, मात्र दारिद्र्याची रेषा करण्यातच अर्धशतकाहूनही अधिक काळ निघून गेला, त्या समाजाला हा आनंद घेऊ नका, असा उपदेश कसा करता येईल आणि केला तरी तो कोण ऐकणार आहे?


पुण्याहून मुंबईला जाण्या आणि येण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक जुना हायवे आणि दुसरा एक्सप्रेस वे. एसटीवाले त्याला मेगा हायवे म्हणतात. एक्सप्रेस वे वरून जाण्यासाठी टोल द्यावा लागतो, तसाच टोल जुन्या मार्गावरून जाण्यासाठीही द्यावाच लागतो. तो थोडा कमी आहे एवढेच. मला कुतूहल होते की एक्सप्रेस वे उपलब्ध असताना किती लोक जुन्या हायवेने जातात? म्हणून अलिकडे मी खास त्या मार्गाने मुंबईला गेलो. लक्षात असे आले की जुन्या हायवेचा वापर फार कमी लोक करतात. ज्यांना लोणावळा किंवा खोपोलीला जायचे असते अशी मंडळी जुन्या हायवेने जातात. त्याचा परिणाम त्या हायवेवर दिसतो. पूर्वी जी थांबण्याची प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे हॉटेल आणि धाबे होते, ते बहुतांश बंद किंवा ओस पडले आहेत. खरे तर तो मार्ग सुद्धा चार पदरी आणि चांगला आहे. मात्र काही गावे मध्ये येतात, गतिरोधक आहेत, त्यामुळे वेग कमी होतो. असा वेग कमी करणे आता कोणालाच नको आहे, त्यामुळे टोल जास्त असला तरी एक्सप्रेस वे लाच सर्वांची पसंती आहे.

जगातील सध्याच्या वेगवान बदलांकडे रूपकात्मक पाहण्यासाठी आपण हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवू यात. पूर्वी महागड्या सेवा समाज स्वीकारत नव्हता. आधी साध्या बसगाड्या भरत आणि मग आराम गाड्यांकडे लोक वळत. रेल्वेतही आधी स्लीपरची तिकिटे संपत आणि मग एसी डब्यांची तिकीटे काढली जात. फी कमी असलेल्या शाळांत प्रवेश फुल झाले की महागड्या शाळांचे प्रवेश सुरु होत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात साधारण असे चित्र होते, मात्र गेल्या दोन दशकांत हे चित्र वेगाने बदलत चालले आहे. आता चांगल्या सेवा घेण्यासाठी अतिरिक्त पैसा कमावणारा ३० कोटींचा मध्यमवर्ग देशात तयार झाला आहे. ३० कोटी म्हणजे एक अख्खा अमेरिका! या ३० कोटी लोकांकडे पैसा आहे आणि चांगल्या सेवा मिळाल्या तर त्या विकत घेण्याची त्यांची मानसिकताही तयार झाली आहे.

पण या मानसिकतेतून काही पेच, प्रश्नही निर्माण झाले आहेत. पैशांशिवाय पान हलत नाही, मग पैसा नेमका किती कमवायचा, गुंतवणूक म्हणून घरांना आणि जमिनीला मागणी वाढली आहे, मग पुढील पिढी सुरक्षित करण्यासाठी किती घरे आणि जमीन घ्यायची, नव्या काळातील संधी मोठ्या शहरांत एकवटल्या जात असतील तर त्या शहरांत का राहायचे नाही, इंग्रजी हीच जर प्रगतीचा मार्ग दाखवत असेल तर मातृभाषा मराठी (किंवा त्या त्या भागातील भाषा) शिकायची गरज आहे काय, नोकऱ्यांतच चांगला पैसा मिळत असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती का करायची, अमेरिकेत अधिक पैसा आणि अधिक चांगले जगता येत असेल तर भारतात का राहायचे, सोन्याच्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळत असेल तर देशाची अर्थव्यवस्था बिघडते म्हणून लोकांनी सोने घ्यायचे नाही काय, किरकोळ लाच देवून बहुमोल वेळ वाचत असेल तर लाच देणे वाईट, या तत्वाला चिटकून बसायचे काय, टोल देवून भन्नाट वेगाने प्रवास होणार असेल तर अडथळ्यांचा प्रवास कशासाठी करायचा, हे आणि असे शेकडो पेच आज भारतीय मध्यमवर्गासमोर आहेत. या पेचप्रसंगांवर मात करताना आदर्शवादाचा अंमल म्हणून त्यांच्या मनात घालमेल तर होतेच आहे, मात्र ज्यांच्याकडे चांगला पैसा आला आहे, तो तो आपली या गुंत्यातून सुटका करून घेतो आहे. ती करताना नैतिक अनैतिक असे पेच आता कमी होताना दिसत आहेत. बदलाचा वेगच असा आहे की विचार करायला कोणालाच वेळ नाही. जेथे वेळच नाही तेथे वेळ वाचविणारा पर्याय निवडला जातो आणि नैतिक- अनैतिकचा निकष मागे पडतो.

आता पुन्हा आपण एक्सप्रेस वे वर येवू. तेथे काय होते पहा. एका बाजूला चार पदर आणि दुसऱ्या बाजूला चार पदर. समोरून येणारे वाहन नाही. मध्ये एकही सिग्नल नाही. गतिरोधक नाही. खड्डे नाहीत. दुचाकी नाहीत. जनावरे नाहीत. कोठेही आडवा रस्ता नाही. जाणारा प्रत्येक जण वेगवान. त्यामुळे एकमेकांचा अडथळा नाही. ज्याला थोड्या कमी वेगाने जायचे आहे त्याने डावी लेन पकडली की झाले. शिवाय विशिष्ट वेगाने गेले की इंधनही वाचते. रस्त्याच्या या उदाहरणाकडे रूपात्मक बघा. आपल्याला असे लक्षात येईल की याला विकासाचे अमेरिकन मॉडेल म्हणतात की आणखी काही, याच्याशी आता काही देणेघेणे राहिलेले पण बहुतेक भारतीयांना असे अधिक पैशाने विकत मिळणारे जीवन आता खुणावू लागले आहे.

पण मग असेही लक्षात येईल की हा सारा खेळ मागणी – पुरवठ्याचा आहे! साधनांच्या उपलब्धतेचा आहे. संपन्नतेचा आहे. खिशात पैसे खुळखुळतात म्हणून चांगल्या सेवा हव्यात, असे वाटते आणि देशात कोणत्या का मार्गाने होईना, पण साधनेही निर्माण झाली आहेत. साहजिकच साधने कमीतकमी वापरली पाहिजेत, साधी, पर्यावरणपूरक जीवनशैली असली पाहिजे, आपली मातृभूमी, मातृभाषेचा सार्थ अभिमान असला पाहिजे, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे असे आदर्शवादी विचार व्यासपीठावर बोलण्यापुरतेच आहेत की काय, असे एक वातावरण तयार झाले आहे. (व्यासपीठावर आदर्शवाद सांगणाऱ्यांच्या आयुष्यात डोकावले तर त्यातील बहुतेक, त्याच्या पूर्ण विरोधी आयुष्य जगताना दिसतात, ते त्यामुळेच.)

मतितार्थ असा निघतो की भौतिक समृद्धीवर भारतीय समाज भाळला आहे. कारण इतिहासातील सुवर्णकाळ सोडला तर गेल्या शेकडो वर्षांत अशी समृद्धी आणि स्वातंत्र्य त्याने अनुभवलेलेच नाही. त्यामुळेच त्याने आजतरी साधनांचा पुरेपूर वापर करून आनंद लुटण्याचा मार्ग निवडला आहे. ते चांगले नाही, असे बोलले आणि लिहीले जाते, मात्र दारिद्र्याची रेषा करण्यातच अर्धशतकाहूनही अधिक काळ निघून गेला, त्या समाजाला हा आनंद घेऊ नका, असा उपदेश कसा करता येईल आणि केला तरी तो कोण ऐकणार आहे?