Friday, July 5, 2013

‘सेकंड क्लास’ बहुजन २०१३


देशाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत जोपर्यंत सकारात्मक आणि व्यापक बदल होत नाहीत, तोपर्यंत बहुसंख्यांकाच्या जीवनमानात सुधारणा होत नाहीत. आणि जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत देश एका सूत्रात बांधला जात नाही. सेकंडक्लासचा हा असह्य प्रवास हा त्या रेल्वेप्रवासापुरताच खरा नसून तो भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्याला खूप चांगले जगायचे आहे, मात्र आजच्या परिस्थितीने त्याला कमी दर्जाचे आणि आपल्याला ते परवडते काय,एवढाच विचार करत जगणे भाग पाडले आहे.

आपल्या देशातील बहुजन म्हणजे साधारण निम्मे (६० कोटी) नागरिक दुसऱ्या दर्जाचे म्हणजे ‘सेकंड क्लास’ जिणे जगत आहेत, असे आपण नेहमी म्हणतो. पण हे ‘सेकंड क्लास’ जगणे, नेमके कसे असते, याची जाणीव असतेच असे नाही. जो आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पाहतो, त्याला ते सहजच दिसते. मात्र ते बदलण्यासाठी नेमके काय करता येईल, या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही आणि हा विचार बाजूला पडतो. याचा एक धक्कादायक अनुभव गेल्या आठवड्यात मिळाला. हे दुसऱ्या दर्जाचे जिणे २०१३ म्हणजे एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकातील आहे, हे लक्षात घेऊन त्याला मी धक्कदायक म्हणतो आहे.
मुंबईतील लोकलचा प्रवास मी अनेकदा केला असतानाही अशात तो आता आपल्याला करता येणार नाही, अशी परवा माझी भावना झाली. पुण्यातील पीएमपीएमएलने मी अनेकदा प्रवास करतो, मात्र तेथे सकाळी कार्यालयांच्या वेळी आणि संध्याकाळी तो नकोसाच वाटतो. माझ्या लांबच्या गावातील नातेवाईकांकडे मी जातो तेव्हा काळीपिवळी जीपचा प्रवास करावाच लागतो. त्या प्रत्येकवेळी आपण सुखरूप परत चाललोय, याचा मला पुनःपुन्हा आनंद होतो. तसा रेल्वेच्या जनरल डब्यात ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करण्याची वेळ मात्र गेल्या २० वर्षांत क्वचितच आली होती. १९८५ मध्ये आम्ही काही मित्र युवक वर्षांत निम्म्या तिकिटात जाता येते म्हणून ईशान्य भारतात जावून आलो होतो. आमच्याकडे स्लीपरचे आरक्षण असूनही मनमाडला हमालांनी आम्हाला डब्यात ‘फेकण्याचे’ पैसे घेतले होते!

माझा समज असा होता की प्रवासाची साधने वाढली, गाड्यांची संख्या वाढली, वेग वाढला आणि लोकांच्या हातात नाही म्हटले तरी पैसा आला आहे. त्यामुळे आता ‘जनरल’मध्ये होणारी गर्दी तुलनेने कमी झाली असेल. बसायला नाहीतर किमान उभे राहायला जागा मिळत असेल. मात्र परवा मी मुद्दामहून तो प्रवास केला आणि धक्का बसला. नवजीवन एक्सप्रेसच्या त्या जनरल डब्यात अकोला ते भुसावळ या अडीच तासांच्या प्रवासात जो भारत पाहायला मिळाला, त्यामुळे सर्व गैरसमज पुन्हा दूर झाले. देशातील बहुजन समाज २०१३ मध्येही किती कमी प्रतीचे आयुष्य जगतो आहे, ते या प्रवासात पाहायला मिळाले.

नवजीवन एक्सप्रेसला बहुतेक जनरलचा एकच डबा असावा. अकोल्याला ती थांबली, तेव्हा म्हणजे पहाटे ५.३० वाजता त्या डब्यात कसाबसा प्रवेश करता आला. पुढील स्टेशनवर तर मुंबईच्या लोकल प्रवासाची आठवण येवू लागली. आता प्रवासी उठून स्वच्छतागृहाकडे जाण्याची वेळ झाली होती मात्र तिकडे जाणे मला अशक्य वाटत होते. नंतर लक्षात आले की वाट काढत लोक तिकडे जात आहेत. जागा असेल तेथे महिलांनी आपल्या लहान मुलांसह बैठक मारली होती. त्यांना तुडवत लोक जात होते. पाय थेट अंगावर पडला तरच थोडी आरडाओरड होत होती. दाराशी चहावाला आला तेव्हा वाटले की त्याला तो कॅन घेऊन फिरणे अशक्य आहे, मात्र त्याच्यासाठी तो आणखी एक तसाच दिवस होता आणि त्या गर्दीत चहापानही चालले होते. पुरुष आणि महिला इतके चिटकून उभे होते की परिस्थितीने संकोच करायलाही त्यांना मुभा दिली नव्हती. म्हातारी माणसे फारच अवघडल्यासारखी उभी किंवा बसलेली होती. लहान बाळांना ही घुसमट असह्य होऊन ती जोरजोरात रडत होती आणि त्यांची काही चूक नसताना त्यांचे आईबाबा त्यांना मारत होते. लांबच्या प्रवासाचा आणि डब्यातील घाणीचा दर्प डबाभर पसरलेला होता. एकमेकांची अडचण दिसत असतानाही ती माणसे काहीच करू शकत नव्हती. जीवनाच्या वेगळ्या वाटेवर सुखदुःखासाठीचा या एका प्रवासात व्यवस्थेने त्यांना असहाय, हतबल करून टाकले होते.

माझा प्रवास संपल्यावर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याची काही उत्तरेही दिसायला लागली. त्यातील काही अशी : १. जग किती बदलले आहे, असे आपण म्हणतो पण या प्रवासात अजून फारसा फरक कसा पडला नाही ? (सार्वजनिक प्रवास सुखकर व्हावा, असे प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे.) २. रेल्वेगाड्या एवढ्या वाढूनही एवढी गर्दी? (रेल्वेचे जाळे फार वेगाने वाढविणे, ही आपली गरज आहे. कारण आपली लोकसंख्या १२५ कोटी इतकी प्रचंड आहे. त्यामुळे ‘रिटेल’पेक्षा रेल्वेत जास्त गुंतवणूक झाली पाहिजे.), ३. या प्रवाश्यांचे जीवनमान सुधारले असे तर आजही दिसत नाही, असे का ? (बहूजनांची क्रयशक्ती वाढत नसल्याने अर्थव्यवस्था सुस्त पडली आहे. ती वाढविण्याची गरज आहे.) ४. रोजगाराच्या शोधात अशी लाखो लोक आजही देशाच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसतात, असे का ? (विकासाचे प्रचंड केंद्रीकरण झाले आहे, ते विकेंद्रित होण्याची गरज आहे.) ५. सर्वांना रेल्वेनेच प्रवास का करायचा आहे? (तो स्वस्त आणि किंचित वेगवानही आहे. तसाच प्रवास बसने होऊ शकतो, हे दिसले तर त्यातील काही प्रवासी बसप्रवास करतील. आणि रेल्वेतील गर्दी थोडी कमी होईल.
मूळ मुद्दा असा आहे की त्याला जागतिकीकरण म्हणा किंवा एकविसावे शतक म्हणा. नाव काहीही द्या, देशाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत जोपर्यंत सकारात्मक आणि व्यापक बदल होत नाहीत, तोपर्यंत बहुसंख्यांकाच्या जीवनमानात सुधारणा होत नाहीत. आणि जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत देश एका सूत्रात बांधला जात नाही. सेकंडक्लासचा हा असह्य प्रवास हा त्या रेल्वेप्रवासापुरताच खरा नसून तो भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्याला खूप चांगले जगायचे आहे, मात्र आजच्या परिस्थितीने त्याला कमी दर्जाचे आणि आपल्याला ते परवडते काय, असा विचार करत जगणे भाग पाडले आहे.