Sunday, June 23, 2013

हा तर आकड्यांचा खेळ; व्यवस्था आणि शास्त्र कोठे आहे ?


अर्थव्यवस्थेच्या मुळाशी जो निर्मितीचा, उत्पादनाचा आधार असतो, तोच नव्या आणि मतलबी जगाने काढून घेतला आहे. अर्थशास्त्रातील शास्त्रच मतलबी जगाने बाद ठरविले असून आकड्यांशी खेळून संपत्ती वाढविणे हाच अनेकांचा उद्योग झाला आहे. मात्र या उद्योगात सामील होणे, ही जणू सक्ती आहे, असे वातावरण आपल्या आजूबाजूला तयार झाले आहे. या वातावरणात टिकण्यासाठी तरी आपल्या आयुष्यावर राज्य करणाऱ्या कृत्रिम पैशांची भाषा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे.


देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत सुधारत नाही तोपर्यंत आपल्या नोकरी, व्यवसाय आणि गुंतवणुकीचेही काही खरे नाही, हे जवळपास सर्वच जण मान्य करू लागले, हे फार चांगले झाले. त्यानिमित्ताने आपण सर्वजण भारत नावाच्या जहाजात बसलो आहोत आणि आपल्यांत कितीही मतभेद आणि भेदभाव असले तरी त्या जहाजाचा प्रवास हा आपल्या सर्वांचा प्रवास आहे, याची जाण वाढत चालली आहे. जात, धर्म, प्रदेश आणि भाषा असे कोणतेच भेद जगाचे नवे व्यवहार ओळखत नाहीत आणि पैशांचे ते व्यवहार समजून घेण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही, हेही आता लक्षात यायला लागले आहे. जगाला बदलण्याची ताकद आपल्याच विचारसरणीत आहे, असे गेल्या दशकापर्यंत म्हणणारेही वाढत्या पैशीकरणामुळे गपगार झाले आहेत. काहीकेल्या प्रश्न सुटण्याऐवजी त्यांची तीव्रता वाढत चालली आहे, हेही आता लपून राहिलेले नाही. गेल्या काही महिन्यातील आर्थिक घडामोडींनी तर सर्वच विचारी भारतीयांची झोप उडविली आहे.
अगदी ताज्या अशा काही आर्थिक घडामोडींचा दाखला घेऊ यात. एकीकडे प्रवासी कारविक्रीत सलग सातव्या महिन्यात घट नोंदविली गेली असून वाहन क्षेत्रात बेरोजगार वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे तर दुसरीकडे नव्या गाड्यांचे लाँचिंग थांबत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचे अनुमान देणारा एक महत्वाचा निकष असलेला शेअरबाजार गेले दोन महिने जागचा हललेला नाही. आता (गुरुवारअखेर) तो १८ एप्रिलच्या पातळीवर (१९०००) आहे. त्याच्या चढउतारांवर देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलण्याची काही सोय राहिलेली नाही कारण तो झोका हलविण्याचे कंत्राट भारतीयांनी परदेशी गुंतवणूकदारांना बहाल केले आहे. या आणि लुटून न्या. देशी गुंतवणूकदार अस्थिरतेपोटी इतके ‘शेखचिल्ली’ झाले आहेत की त्यांना सोन्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही. त्यामुळे सोने कितीही महाग झाले आणि अचानक पडले तरी त्याची खरेदी थांबण्याचे नाव घेत नाही. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेवर भारतीयांचाच विश्वास नाही तर परदेशी का विश्वास ठेवतील ? एकच समाधानाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत सरकारने केलेल्या प्रयत्नांनंतर सोने खरेदीसाठी डॉलरची मागणी २.२७ कोटीवरून ७० लाख डॉलर इतकी घसरली आहे. पण तिकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे सरकारला पाळता भुई थोडे झाले आहे. २०१३ वर्षांत तो ५.५ टक्के घसरला आहे. सरकारी धावपळीनंतर बुधवारी तो ५९ वरून मागे फिरला. मात्र त्याच्या घसरण्याचे आणि वधारण्याचे परस्परविरोधी अंदाज व्यक्त होतच आहे. डॉलरच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेचे चलन तर ११ टक्के इतके घसरले आहे आणि इतरही अनेक देशांची चलने डॉलरला सपशेल शरण जात आहेत. नव्या जागतिक अर्थरचनेत इतके परस्परविरोधी हितसंबंध तयार झाले आहेत की काही उद्योगांना ही घसरण फायद्याची आहे ! (नोटा छापण्यासाठी सोने तिजोरीत ठेवण्याचा निकष काढून टाकून अमेरिकेने जगाच्या चलनबाजारात केवढा उच्छाद मांडला आहे, हे आता लक्षात येते आहे, मात्र मागे फिरण्याचे दोर कापून टाकलेले आहेत.)
महागाई कमी होते आहे असे म्हणता म्हणता ती पुन्हा वाढू लागते. पेट्रोल-डिझेल आणि सोन्याच्या आयातीने सरकारचे कंबरडे मोडते आणि कमी होत चाललेली चालू खात्यावरील तुट पुन्हा वाढू लागते. (परदेशी व्यापारातील तुट साधारण पाच लाख कोटी रुपये आहे आणि त्यात सोन्याच्या आयातीचा वाटा २२ टक्के इतका प्रचंड आहे!) २०१२ मध्ये सीएडीमध्ये ४.२ टक्के असलेली तुट २०१३ मध्ये ५ टक्के झाली आहे तर २०१४ मध्ये ती ३.५ ते ४ टक्के खाली येऊन देशाला दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. तर इकडे औद्योगिक उत्पादनाला लागलेली उतरती कळा थांबायलाच तयार नाही. याचा अर्थ वस्तू विकल्या जात नसल्यामुळे त्या पडून आहेत आणि कारखाने कमी क्षमतेने चालविण्याची वेळ आली आहे.
अशा साऱ्या नकारघंटा वाजत असताना ‘फिच’ नावाच्या पतमानांकन संस्थेने बुधवारी (दि.१२) भारताचे मानांकन उंचावले म्हणजे भारताची अर्थव्यवस्था सुधारेल आणि ५ टक्के दराने विकास होईल, असे शुभ भाकीत केले आहे. या संस्था काय करतात आणि कोणत्या निकषांवर अंदाज वर्तवितात, हे कोणीही सांगू शकणार नाही कारण दोन वेगवेगळ्या संस्थांचे अंदाज वेगवेगळे असतात. अर्थात त्यांच्यावर विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास असतो आणि त्या अंदाजावर कोणत्या देशात गुंतवणूक करायची किंवा काढून घ्यायची; हे ठरविले जाते. विदेशी गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतला तर आपला देशाची मोठीच कोंडी होते. कारण आपले भांडवल आपण काळ्या पैशांत आणि सोन्यात सडायला ठेवले असून आपला विकास विदेशी गुंतवणुकीतून व्हावा, असा आपला उरफाटा व्यवहार आहे.

क्रूर गंमत पहा कशी आहे. देशाची आणि जगाचीही आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे, हे कितीही अभ्यास केला तरी तुम्ही किंवा कोणताही अर्थतज्ञ आज छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण अर्थव्यवस्थेच्या मुळाशी जो निर्मितीचा, उत्पादनाचा आधार असतो, तोच नव्या आणि मतलबी जगाने काढून घेतला आहे. अर्थशास्त्रातील शास्त्रच मतलबी जगाने बाद ठरविले असून आकड्यांशी खेळून संपत्ती वाढविणे हाच अनेकांचा उद्योग झाला आहे. मात्र या उद्योगात सामील होणे, ही जणू सक्ती आहे, असे वातावरण आपल्या आजूबाजूला तयार झाले आहे. या वातावरणात टिकण्यासाठी तरी आपल्या आयुष्यावर राज्य करणाऱ्या कृत्रिम पैशांची भाषा आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे.

2 comments: