Friday, March 22, 2013

सुवर्णभूमी करू या भारत..

सुवर्णभूमी करू या भारत...

भारताला आता या मातीत, संस्कृतीत आणि वातावरणात रुजू शकतील अशा नव्या कल्पनांची गरज आहे, असे सर्वांनाच वाटते. पण बल्लाळ जोशी नावाच्या देशभक्ताने अशा २० कल्पना शब्दबद्ध केल्या. त्या आज प्राथमिक स्वरुपात असल्या तरी अशा अफलातून कल्पनांमधूनच या महाकाय देशाचा खरा कायापालट होणार आहे.पुण्याचे बल्लाळ जोशी परवा तब्बल पाच वर्षांनी भेटले. त्यांनी दोन पुस्तके माझ्या हातात दिली. पहिले होते ते मुंबईतील सर्व भागांचा पिनकोड नकाशाचे. असे पुस्तक आजपर्यंत कोणी पहिले नसेल, कारण ते प्रथमच प्रकाशित झाले आहे. त्याविषयी आपण नंतर कधीतरी माहिती घेऊ. आज आपले लक्ष मला त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाकडे वेधायचे आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे – ‘माझ्या मते.. असं असावं.. असं झालं तर?’ मुखपृष्ठावर भारताचा नकाशा आहे आणि त्यावर ‘सुवर्णभूमी करू या भारत’ अशी अक्षरे कोरली आहेत.
बल्लाळ जोशी १६ वर्षे वायुदलाची सेवा करून १९७३ मध्येच निवृत्त झाले. त्यांनी आज सत्तरी पार केली आहे. निवृत्तीनंतर काही नोकऱ्या त्यांनी केल्या आणि त्यांच्या लक्षात असे आले की आपल्या समाजाच्या सार्वजनिक जीवनात खूप काही करण्याची गरज आहे. ते आज गैरसोयी आणि त्रुटीनी खचाखच भरले आहे. ते सुखकर झाले पाहिजे. खरे म्हणजे विचार करणाऱ्या कोणाही माणसाच्या मनात हे विचार येतात. बल्लाळ जोशींचे वैशिष्ट असे की कल्पना कितीही छोटी असो किंवा अगदी बाळबोध असो, त्यांनी ती लिहून तर ठेवलीच, पण तिचा शक्य तेवढा पाठपुरावाही केला. अशा २० कल्पनांचा विस्तार म्हणजे हे पुस्तक.
आपण ज्या देशावर प्रेम करतो, त्या देशात सकारात्मक बदल व्हावा, असे सर्वांनाच वाटते. काय व्हायला हवे, याची आपण दररोज चर्चाही करतो. त्या चर्चेला पुढे नेत देशात तसा बदल होऊ शकतो, असा आशावाद मनात ठेऊन बल्लाळ जोशींनी त्यांना शब्दबद्ध केले आहे.
पुस्तकातील काही कल्पना जाणून घेतल्यावर आपल्याला त्यांचे महत्व लक्षात येईल. त्यातील काही अशा: १. आगामी काही वर्षांत देशात वृद्धांची संख्या २५ टक्क्यांवर जाईल. त्यांच्या क्षमता आणि कौशल्याचा कोठे कोठे आणि कसा उपयोग होऊ शकतो, याचे विवेचन. २. पुणे शहरात शहर बस वाहतूक नीट चालत नाही, त्यामुळे खासगी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची संख्या वाढतच चालली आहे. बस व्यवस्थेत आमुलाग्र बदल सुचविला आहे, ज्यात कोठेही पाचव्या मिनिटाला बस मिळू शकेल. ३. मुंबईच्या सर्वांगीण विकास योजनेत सर्व रेल्वे स्टेशनवर व्यावसायिक इमारती बांधून सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या जागेचा प्रश्न सोडवून मुंबईच्या विकेंद्रीकरणाची कल्पना मांडली आहे. ४. भारतासारख्या देशाला मोटारींपेक्षा रेल्वेच्या विकासाची गरज आहे. त्यासाठी दिल्ली ते दिल्ली असा वर्तुळाकार मार्ग सुचविला असून त्यातून रेल्वे प्रवास कसा सुखकर होईल, हे सांगितले आहे. ५. मुंबईप्रमाणेच इतर शहरातही आता कार्यालये आणि बाजारपेठांचे केंद्रीकरण होऊ लागले आहे. ते टाळण्यासाठी त्या त्या शहरातील रेल्वे स्टेशन आणि तो परिसर विकसित करण्याची कल्पना मांडली आहे.
‘जोपर्यंत लाखो गरीब अर्धपोटी आणि अज्ञानात जगत आहेत तोपर्यंत त्यांच्या जीवावर जगणाऱ्यांना आणि त्याबद्दल खेदही न मानणाऱ्यांना मी देशद्रोही मानतो’ या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा उल्लेख करून गरीबी हटविण्यासाठीच्या काही कल्पनांचा पुस्तकात समावेश आहे. त्यात प्रामुख्याने १. झोपडपट्टी सुधारणा आणि वंचितांना घरे २. रोजगार वाढण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी साडेसहा तासांचा दिवस करण्याची कल्पना ३. प्रत्येकाला त्याच्या घरात असलेल्या सोन्याच्या किंमतीएवढे क्रेडीट कार्ड देवून सोन्यात गुंतवलेला पैसा बाजारात आणून भांडवल स्वस्त करण्याचे प्रयत्न.
काही खूप वेगळ्या आणि अफलातून कल्पनांचा पुस्तकात समावेश आहे. ज्यात १. पाच दिवसांचा ऐच्छिक आठवडा २. नाविन्यपूर्ण पाकीट ३. पिनकोड परिसरांचे प्रमाणीकरण करून सर्व खात्यांच्या कार्यकक्षा पिनकोड परिसराशी जोडून समविभागीय प्रशासन पद्धतीचा पाया रचणे. ४. शहरातील मोकळ्या जागांवर भाजीपाला पिकविणे.
जागेच्या मर्यादेमुळे या पुस्तिकेतील सर्वच कल्पनांचा खुलासा येथे करता येणे शक्य नाही. त्या सर्व कल्पना व्यवहार्य आहेत, असेही म्हणता येणार नाही. मात्र हा विषय यासाठी महत्वाचा वाटतो की आपल्या देशाला आज अशा कल्पनांची खरी गरज आहे. आपल्या देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या देशातील विविध क्षेत्रातील तज्ञ पाश्चात्य देशांकडे डोळे लावून बसले आहेत. अमेरिका आणि पाश्चात्य देशांतील हवामान, लोकसंख्या आणि संस्कृती इतकी भिन्न आहे की त्याचा विचार केल्याशिवाय तेथील सुधारणा उसन्या घेणे, हे आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे आहे. मात्र गेली काही वर्षे आपण त्याच चुका पुनःपुन्हा करतो आहोत. वास्तविक आपल्या देशाच्या गरजा पूर्ण वेगळ्या असून त्यांचा विचार याच देशातील संवेदनशील माणसे करू शकणार आहेत. बल्लाळ जोशी यांच्या कल्पनांचे मोल मला त्यादृष्टीने वाटते. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये लोकांच्या गरजा भागविणाऱ्या, त्यांचे जीवन सुखकर करणाऱ्या नवनव्या कल्पनांचे धुमारे फुटावेत, अशी अपेक्षा आहे, मात्र तेथील ‘इनोव्हेशन’ डिग्र्या आणि पॅकेजेसमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे बल्लाळ जोशींसारख्या समाजजीवन विद्यापीठातील ‘इनोव्हेशन’ चा विचार स्वतन्त्रपणे झाला पाहिजे. (संपर्कासाठी – ९४२३० ११४७९)


संचित झाले हे विषयघन


ज्या देशाने मला घडविले,
त्यासाठी मी काही न केले,
कृतघ्नता वा ते कोतेपण,
विचार चिंतन करुनी दिनदिन,
संचित झाले हे विषयघन,
कृतार्थ झालो आज मनोमन,
समाजपुरुषा करुनी अर्पण,
या देशाचे गुणीजन अगणित,
सक्षम, विद्वत देशहित प्रेरित,
विचारधनी होऊनी कार्यरत,
कष्टनी करतील सुवर्ण भारत

(बल्लाळ जोशी यांची भावना)