Sunday, April 15, 2012

‘पैशीकरण’ माणसाला शरण येईल, तो सुदिन !

सत्ता आणि संपत्तीसाठी जशी गल्लीत भांडणे होताहेत तशीच जागतिक पातळीवर होताहेत, असे कोणी म्हटले तर राजकारण आणि अर्थकारणातील नेते ते ऐकून घेणार नाहीत. जागतिक अर्थशास्र आणि राजकारण हा कसा गहन विषय आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील. जगाच्या सुरवातीपासूनचा माणसाचा इतिहास समजून घ्यायला सांगतील. जगात आधी कशी कृषी संस्कृती होती, नंतर युरोपात औद्योगिकीकरण झाले, जागतिक व्यापाराला गती आली, मग कशी दोन महायुद्धे झाली, त्यानंतर भांडवलशाही आणि साम्यवादात कसे शीतयुद्ध सुरु झाले आणि ते गेल्या शतकाच्या अखेरीस संपले तेव्हा भांडवलशाहीचा विजय झाला आणि आता जग उदारीकरणाच्या वळणावर उभे आहे. म्हणजे ज्याला आपण जग म्हणतो, त्या जगाच्या देशांदेशांमध्ये कशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या आधारे सत्ता स्थापन झाल्या, त्या कशा बदलत गेल्या, त्यांना विचारसरणीचा आधार घ्यावा लागला, आमचे राज्य धर्मवादी, साम्यवादी, समाजवादी की भांडवलदारी असे सत्ताधारी नेत्यांना सांगावे लागले. हे सर्व समजल्याशिवाय जगाचे राजकारण आणि अर्थकारणाविषयी आपल्याला बोलता येणार नाही, हे तर खरेच आहे. मात्र आज अखिल मानवजातीला प्रचंड असुरक्षित करणाऱ्या जगाचा कारभार नेमक्या कोणत्या विचारानुसार सुरु आहे, असे आपण विचारले तर धुरीणांनाही विचारमग्न व्हावे लागेल. साम्यवादी चीनमध्ये आज जे व्यवहार चालले आहेत, ते किती साम्यवादी आहेत, महासत्ता अमेरिका इराणच्या मागे का लागली आहे, कठोर धर्मसत्ता म्हणविणाऱ्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये जो रक्तपात माजला आहे, तो कोणत्या धर्मविचारांत बसतो, भारतासारख्या समाजवादी लोकशाही म्हणविणाऱ्या देशात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील नकारांना नेमके काय नाव द्यायचे, उत्तरप्रदेशात पुन्हा समाजवादी पक्षाची सत्ता आली म्हणजे नेमके काय बदलणार आहे, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ता होती, म्हणजे तेथील समाज नेमका काय बदलला, मुंबईत भाजप शिवसेना युतीची सत्ता पुन्हा आली आणि बाहेर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काग्रेस आणि काग्रेसाची सत्ता आली म्हणजे आता नेमका काय बदल होणार आहे ? सामाजिक आणि राजकीय विचारांचा एवढा जप सुरु असताना आणि मानवी समूह सुखी समाधानी व्हावेत, यासाठीच हा सगळा जागर चालला असे म्हटले जात असतांना माणसे का त्रासली आणि गांजली आहेत, याचे उत्तर मात्र कोणीच देवू शकत नाही. उत्तर कोणी देत नसले तरी ते सर्वांना माहीत आहे. सर्वाना माहीत आहे की सर्वच विचार चांगले आहेत, मात्र व्यवहारात भेसळ आहे. इतकी भेसळ आहे की कोण कोणत्या विचाराचा हेही आता कळेनासे झाले आहे. मानवाच्या कल्याणासाठीच विचारसरणीना जन्म देणारा माणूस व्यवहाराने इतका करकचून बांधला गेला आहे की भौतिक प्रगती हेच त्याला जीवनसार्थक वाटायला लागले आहे. मानवी कल्याणाचा जागर करणाऱ्या विचारसरणीनी जणू हार पत्करली आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की भौतिकवाद आणि व्यक्तीवादाचा वर्तमानातील हा मानवी प्रवास आता आपल्याला समजून घ्यावा लागेल. मानवाच्या आतापर्यंतच्या प्रवासाला सरंजामशाही, भांडवलशाही, लोकशाही, समाजवाद, साम्यवाद अशी नावे दिली गेली आणि ती त्या त्या वेळी बरोबरच होती. मात्र आताच्या जगाचे व्यवहार या ‘वादां’मध्ये मावेनासे झाले आहेत. माणसाने ज्या अत्याधुनिक यंत्रांचा आणि तंत्रांचा वापर सुरु केला आहे, ते ना वाद ओळखत ना, देश ओळखत. ना जात ओळखत ना धर्म ओळखत. ना पक्ष ओळखत ना संघटना. यंत्र आणि तंत्रांनी केवळ विचारांचे आणि वादांचेच नव्हे तर पर्यायाने जगाचे आणि समाजाचेच सपाटीकरण करून टाकले आहे. असे नसते तर मानसिक शांततेचा पुरस्कार करणाऱ्यानी जीवनाचा वेग कृत्रिमरित्या वाढविणाऱ्या साधनांना आपलेसे केले नसते आणि जगाला जिंकण्याची स्वप्न पाहिली नसती. मानवी प्रवास समृद्धीच्या दिशेने सुरु आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना संपत्तीचा इतका मोह पडला नसता की त्यांची अखेर हत्येत किंवा तुरुंगातील बराकीत व्हावी. जगातले मानवी व्यवहार बदलून टाकणारी यंत्र आणि तंत्र व्यवहाराच्या वाटेने माणसाच्या सुखदुःखात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे आता केवळ विचार समजून घेवून माणसाचे किती भागेल, हे माहीत नाही, मात्र मानवी व्यवहार मुठीत घेणाऱ्या यंत्र आणि तंत्राना समजून घेणे बंधनकारक झाले आहे. पटते का पहा. पेच असा आहे. आता जगातील देशांचे, देशांमधील राज्यांचे, जातीधर्मांचे, पक्षसंघटना आणि लोकांचे .. अशा सर्वांचे एकमेकांवरील अवलंबित्व इतके वाढले आहे, की ते मान्य करण्यावाचून कोणाचीच सुटका नाही. हे अवलंबित्व मान्य करायचे म्हणजे अशा रचनेचा शोध घ्यायचा जीमध्ये सर्वांचे भले होणार आहे. सर्वांचे भले याचाच अर्थ माझेही भले. असे काही घडवून आणायचे असेल तर सर्वांना समजेल अशा ‘भाषेत’ बोलायला सुरवात करावी लागेल. ती ‘भाषा’ म्हणजे पैशांची भाषा. जी सर्वांना समजते आणि आपल्यातले केवळ अप्रियच नव्हे तर माणुसकीला काळीमा लावणारे, मनाला सतत टोचणारे भेदभाव विसरायला भाग पाडते. तुम्ही कोणत्या विचाराचे आहात, कोणत्या जातीधर्माचे आहात, कोणत्या देशाचे आहात, कोणत्या पक्षाचे आहात, हे मग महत्वाचे ठरत नाही. माणसातील भेदभावांच्या भावनिक लढाया जिंकूनच सत्तासंपत्ती मिळविण्याचे दिवस केंव्हाच मावळायला हवे होते. मात्र त्यासाठी आपल्याला एकविसाव्या शतकाच्या पहाटेची वाट पाहावी लागली. मानवजातीची यापेक्षा अधिक मानहानी आता मान्य करता येणार नाही. व्यवस्थांचे ‘पैशीकरण्’ व्हायला नको होते, मात्र आता ते झालेच आहे, आता ते माणसाला शरण येईल अशी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. जगाला दिशा देण्यास सर्वच विचारसरण्या असमर्थ ठरल्या आहेत, असे आज दिसते आहे, मात्र त्यांना कवटाळून बसलेली माणसे त्याला काही वेगळे नाव देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्या विचारांचे केवळ ओझे वाहिल्याने तो विचार ज्यांच्यासाठी मांडला गेला त्यांच्यासाठीची लढाई जिंकता येत नाही, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. सत्ता आणि संपत्तीसाठी जशी गल्लीत भांडणे होताहेत तशीच जागतिक पातळीवर होताहेत, असे सिद्ध करण्यासाठी आता वेगळ्या निकषांची गरज राहिलेली नाही. ‘पैशीकरणा’ ने ते सिद्धच केले आहे.
(अर्थपूर्ण मासिकाचे संपादकीय - एप्रिल २०१२ )