Sunday, April 8, 2012

पैसा भारतीय, मग जाळे का परकीय ?

१२१ कोटी जनतेला सर्व सेवा सुविधा मिळाव्यात, याविषयी कोणाचेच दुमत नाही, मात्र त्यासाठी काळ्या पैशाऐवजी पांढऱ्या पैशाचीच निर्मिती झाली पाहिजे आणि तो पैसा पायाभूत सुविधांवर खर्च झाला पाहिजे, याविषयी कोणाचेच एकमत नाही. परिणाम - जो पैसा आमच्याकडे भरपूर आहे, तो आम्ही दडवून ठेवतो आणि त्याच पैशासाठी परदेशांकडे भीक मागतो. त्यामुळे जाळे टाकून परदेशी लुटतात आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहात बसतो ! अर्थतज्ञ आणि जाणत्या भारतीय जनतेला शालेय पुस्तकातील एका कथेची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असे आपण अभिमानाने म्हणतो आणि एकीच्या आणाभाका आपल्याला घ्याव्या लागतात. त्याचे कारण १२१ कोटी जनतेमधील ही जी विविधता आहे, ती नेहमीच देशाला पुढे घेवून जाते, असे होताना दिसत नाही. उलट त्या विविधतेत फुटीची विषवल्ली लपून बसलेली आहे, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत. या फुटीवर मात करावयाची असल्यास भारतीय जनतेला ऐक्यावर भर देण्याशिवाय पर्याय नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अलिकडे भारताच्या अर्थधोरणांमध्येही ही एकी दाखविण्याची वेळ आली आहे. ती कथा अशी आहे: कबुतरांचा थवा उडत असतो आणि त्यांची शिकार करू पाहणारा पारधी त्यांना दाणे फेकतो. दाण्यांचा कबुतरांना साहजिकच मोह होतो. कबुतर दाणे टिपायला लागतात. पारधी लगेच जाळे फेकतो आणि सर्व कबुतर त्याचे बंदी होतात. प्रत्येक कबुतर आपली सुटका करून घेण्यासाठी भरपूर धडपड करतात, मात्र कोणाचीच सुटका होत नाही. मग काही शहाणी कबुतरं विचार करतात आणि सर्व कबुतरांनी एकाचवेळी ताकद लावून जाळ्यासह उडून जाण्याचा संकल्प केला जातो. एक.. दोन..तीन... असा जोर लावला तर काय आश्चर्य... कबुतरांचा थवा जाळ्यासह उडून जातो. एका डोंगराच्या पायथ्याशी थवा थांबतो. तेथे त्यांचा मित्र उंदीर येतो आणि जाळे कुरतडून सर्वांची सुटका करून देतो. अशक्यप्राय वाटणाऱ्या संकटातून एकीच्या बळावर सर्वांची सुटका होते. शालेय पुस्तकातील या कथेचा बोध भारतीयांनी घेण्याची वेळ आली आहे, याची शेकडो उदाहरणे आपल्या आजूबाजूला आज दिसत आहेत. जग आज आर्थिक निकषांवर चालले असून त्या निकषांवर भारताची ताकद प्रचंड वाढली असूनही त्याचे फायदे मात्र भारतीयांना मिळेनासे झाले आहेत. एकीकडे भारताच्या आर्थिक प्रगतीचा अभिमान व्यक्त करतानाच अनेक नकारात्मक गोष्टींचा स्वीकार आपल्याला करावा लागतो आहे. कथेतील कबुतरांसारखी एकी दाखविली तर हा देश आहे त्या साधन सामुग्रीसह किती पुढे जाऊ शकतो, याची काही उदाहरणे आता आपण पाहू. १. सारे जग ग्राहकांच्या शोधात म्हणजे बाजारपेठांच्या शोधात फिरत असताना ३० कोटी मध्यमवर्गीयांची तर ९१ कोटी कमी उत्पन्न गटाची बाजारपेठ आपल्याला आपल्या घरातच उपलब्ध आहे. विकसित जगाच्या तोंडाला पाणी सुटते, इतकी ही बाजारपेठ मोठी आहे. चीनशिवाय एकाही देशाकडे इतकी मोठी बाजारपेठ नाही. ती वापरण्यासाठीची एकी मात्र आपल्यात अजून दिसत नाही. २. भारताची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकाची असली तरी सातव्या क्रमांकाची जमीनही आपल्याकडे आहे आणि हवामानाचे वैविध्यही आहे. त्यामुळेच अन्नधान्याच्या गरजेत आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो ही अभिमानाची गोष्ट असली तरी शेतकरी वर्गाचे शोषण करून ते आपण मिळविले असल्याने तेथेही आपण ऐक्य सिद्ध करू शकलेलो नाही. त्यामुळेच शेती क्षेत्रातल्या भविष्यातील प्रवासाची आपल्याला खात्री वाटेनाशी झाली आहे. ३. भारताला भांडवलाची नेहमीच कमरतता पडते. त्याचे एक कारण आपल्याला असलेला सोन्याचा सोस हे आहे. जगातील ११ टक्के (२० हजार टन) सोने भारतीयांकडे आहे. ही गुंतवणूक देशाच्या दृष्टीने अनुत्पादक आहे, मात्र वैयक्तिकदृष्ट्या फायद्याची आहे. भारतीयांच्या मनात भविष्याविषयी जी असुरक्षितता आहे, त्यामुळे आम्ही सोन्यात सुरक्षितता शोधतो आहोत. शत्रूने हल्ला केल्यानंतर जसे आम्ही एक होतो, त्याप्रकारची एकी सोन्याच्या गुंतवणुकीतही दाखविण्याची गरज आहे. ४. भारतीय शेअर बाजार हा परदेशी संस्था चालवितात, अशा नामुष्कीला आपण पोहचलो आहोत. आपल्यातल्या दुहीचा फायदा उचलून ते देशाला लुटत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांवर काही निर्बंध लावण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात होतो तेव्हा बाजार कोसळतो कारण त्या गुंतवणूकदारांना ते नको आहे, ते गुंतवणूक काढून घेण्याची धमकी देतात आणि सरकारला नमावे लागते. (सध्या हा वाद सुरूच आहे) देशात ३० कोटी मध्यमवर्ग असूनही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या किरकोळ आहे. ही एकी जर शेअर बाजारात दिसली तर आमच्या गुंतवणुकीवर आमचे नियंत्रण असेल. ५. पाणी, वीज, वाहतूक याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो. या सुविधांमध्ये आपल्या देशाचा १३९ देशांमध्ये ८६ वा क्रमांक लागतो. याचे कारण या सुविधा उभ्या करण्यासाठी आपण आज सर्वस्वी परदेशी गुंतवणुकदारांवर अवलंबून आहोत. वास्तविक आपल्या देशांत प्रचंड पैसा आहे, मात्र तो बँकांमध्ये नसून रोखीत आहे. त्या पैशाचा भांडवल उभारणीसाठी उपयोग होत नाही. ज्या पायाभूत सुविधांना टाळून भविष्यात विकासाचे पान हलणार नाही, त्याविषयीही आपले आज एकमत नाही ! ६. आता आपण एक थेट उदाहरण पाहू यात. पायाभूत सुविधांना निधी मिळावा म्हणून सरकारने अलीकडेच एक प्रस्ताव मांडला. त्यात कर्मचारी भविष्य निधी संघटनेला (ईपीएफओ) आवाहन केले की त्यांच्याकडील तीन लाख कोटी रुपयांमधील काही भाग त्यांनी पायाभूत विकास फंडात (आयडीएफ) गुंतवावा. फंड निवडताना सुरक्षिततेचे विशिष्ट रेटिंग असलेले फंड निवडावे, असेही संघटनेला सुचविण्यात आले. असे केल्याने कर्मचाऱ्यांना तर अधिक लाभ होईलच, पण पैसा देशाच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च होईल, असा विचार मांडण्यात आला. मात्र तोही स्वीकारला जाईल याची खात्री नाही, कारण आमच्या संस्थांवर आमचाच विश्वास नाही. १२१ कोटी जनतेला सर्व सेवा सुविधा मिळाव्यात, याविषयी कोणाचेच दुमत नाही, मात्र त्यासाठी काळ्या पैशाऐवजी पांढऱ्या पैशाचीच निर्मिती झाली पाहिजे आणि तो पैसा पायाभूत सुविधांवर खर्च झाला पाहिजे, याविषयी कोणाचेच एकमत नाही. परिणाम - जो पैसा आमच्याकडे भरपूर आहे, तो आम्ही दडवून ठेवतो आणि त्याच पैशासाठी परदेशांकडे भीक मागतो. त्यामुळे जाळे टाकून परदेशी लुटतात आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहात बसतो !