Saturday, March 3, 2012

आनंदी जीवनाचे व्यवस्थापन कधी होईल अर्थसंकल्प ?



माणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आहे. मग व्यवस्थापनाच्या नावाखाली किती दलाली कराल? ठराविक माणसांसाठीची दलाली कधीही निषेधार्हच पण आता ती सहन करण्यापलीकडे गेली आहे. म्हणून माणसामाणसात , माणसांच्या समुहात, जात, धर्म, भाषा, राज्य आणि असे शेकडो भेद मांडून बसलेल्या व्यवस्थेची दलाली नाकारणारा आणि सर्व माणसांच्या आनंदी जीवनासाठीचे व्यवस्थापन करणारा अर्थसंकल्प आम्हाला हवा आहे.

गडचिरोलीच्या जंगलात दबा धरून बसलेले तरुणांचे गट जेव्हा दिल्लीच्या संसदेत चाललेली आकडेमोड लक्षपूर्वक ऐकायला लागतील, देशातला शेतकरी जेव्हा पुढील हंगामाची दिशा त्यावरून ठरवतील, आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल आता, असा विश्वास जेव्हा शहरातल्या आणि गावागावातल्या बेघरांना मिळेल, उद्याच्या जगात हातांना भरभरून काम मिळेल त्यामुळे नव्या जगात प्रवेश करायला आपण आता सज्ज झाले पाहिजे, अशा आशा जेव्हा तरूणाईत फुलतील आणि आपलं उदरभरण जगाला अजून जड झालेलं नाही, तेव्हा अजून जगलं पाहिजे भरभरून, अशी जगण्याची उर्मी आजीआजोबांना हेच आकडे देतील, तेव्हा देशाचा खरा अर्थसंकल्प सादर झाला, असे आम्ही म्हणू.
केवळ चार घास पोटात जाण्याचे गणित बिघडून जाईल म्हणून हॉस्पिटलमध्ये जाण्याचे टाळले जाणार नाही, कच्च्याबच्यांच्या मजुरीवर घर चालविण्याची नामुष्की ज्यादिवशी त्या वस्तीवर येणार नाही, शाळेच्या वर्गासाठी गावाकडे भीक मागण्याची वेळ मास्तरांवर येणार नाही, इच्छा नसताना गावगाडा सोडून केवळ पोट भरण्यासाठी लोंढ्यामध्ये सामील होणाऱ्यांचीच बकाल गावे तयार होणार नाहीत, त्यादिवशी आमच्या देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला, असे आम्ही म्हणू.
एक माणूस एक घर बांधतो, त्याची किंमत पाच हजार कोटी रुपये! एक माणूस फ्लॅट विकत घेतो, त्याची किंमत ३७ कोटी रुपये! एका माणसाला रोख सापडते तिची किंमत ३०० कोटी रुपये! एक माणूस कर चुकवितो त्याची किंमत ७० हजार कोटी रुपये! एक माणूस पैसे खातो त्याची किंमत उदा. १००० कोटी रुपये ! एक माणूस नोकरीसाठी लाच देतो ती उदा. पाच लाख रुपये, एका माणसाच्या मुलीचे लग्न अडले त्याची किंमत ५० हजार रुपये, एक माणूस आजारी पडला त्याच्या हास्पिटलचा खर्च उदा. २० हजार रुपये, एक माणूस राबराब राबतो, त्याचा महिना उदा. २००० रुपये. एक माणूस हातातोंडाची गाठ घालण्यासाठी भीक मागतो, त्याची किंमत पाच रुपये ! एकविसाव्या शतकातील आधुनिक माणसाच्या आयुष्यातला कागदी नोटांचा हा नंगानाच थांबेल, त्यादिवशी माणसांसाठीचा अर्थसंकल्प सादर झाला, असे आम्ही समजू.
गावात कोणी उपाशी राहिला नाही ना, याची खात्री करुन झोपणाऱ्या आजोबांची आणि एकच तीळ पाच भावांनी वाटून खाल्याची एक गोष्ट सांगतात. मान्य की जग आता फार पुढे निघून आले. एकविसाव्या शतकातील पाहिले दशक पण संपले. पण मग जग पुढे आले म्हणजे काय झाले? गावे वाढली, शहरे वाढली. सुखसोयी वाढल्या. तंत्रज्ञान वाढले. मग तर उपाशी माणूस शोधणे आता सोपे झाले असणार. तिळाची संख्या वाढली असणार. काही जण म्हणतात ही गोष्ट जुनी झाली. मान्य, पण मग आजही वस्त्या उपाशी झोपतात आणि काही गर्भ तर जगण्याआधीच मरतात, हे कसे? मानवजातीच्या आधुनिकतेवर आणि सुसंस्कृतपणावर प्रश्नचिन्ह उभे करून त्याचे उत्तर शोधणाऱ्यानी अर्थसंकल्प सादर करावा, असे प्रयत्न आम्ही करू.
जगातल्या साडेसहाशे अब्ज माणसांच्या व्यवस्थापनात खंडप्राय देशातल्या १२१ कोटी माणसांचे व्यवस्थापन करायचे, ही काही सोपी गोष्ट नाही. मागणी - पुरवठ्याचा मेळ घालणे, हेही सोपे नाही. नैसर्गिक साधनांची, उत्पादनांची, धनधान्याचे आणि मानवी आशाआकांक्षाचे हिशेब ठेवायचे, म्हणजे धोरण आलेच. धोरणांच्या या गुंत्यात धनधान्य आली, उत्पादने आली, नैसर्गिक साधने आली पण ज्यांच्यासाठी हे धोरण आहे, ती माणसे कोठे गेली? ती हरवलेली माणसे शोधणारा अर्थसंकल्प आपल्याला सादर करावयाचा आहे.
समुद्रातील पाण्याची ओंजळ कोठेही भरली तरी ती खारीच लागणार या न्यायाने आमच्यामध्ये जे गुण आहेत आणि दोष आहेत ते मान्यच करावे लागतील. दुसरे तत्व आहे, ते म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कसे येणार? कोणी आमच्या समुहाला दोष दिला की आम्ही म्हणतो, समुद्राचे पाणी सगळीकडेच खारे. मग ते म्हणतात की आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? मग सांगावे लागते की आड तर दुथडी भरून वाहायला लागला आहे. माणसाला निसर्गाने भरभरून दिले आहे. हे सर्व जे फळलेले आणि फुललेले दिसते आहे, ते तर सर्व निसर्गाचेच आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांसाठीचे आहे. मग व्यवस्थापनाच्या नावाखाली किती दलाली कराल? ठराविक माणसांसाठीची दलाली कधीही निषेधार्हच पण आता ती सहन करण्यापलीकडे गेली आहे. म्हणून माणसामाणसात , माणसांच्या समुहात, जात, धर्म, भाषा, राज्य आणि असे शेकडो भेद मांडून बसलेल्या व्यवस्थेची दलाली नाकारणारा आणि सर्व माणसांच्या आनंदी जीवनासाठीचे व्यवस्थापन करणारा अर्थसंकल्प आम्हाला हवा आहे.

No comments:

Post a Comment