Wednesday, October 5, 2011

गांधीजींनी असे का लिहून ठेवले असेल ?


गांधीजींनी सांगितलेली जीवनशैली आज आपण स्वीकारू शकणार नाही, कारण ती स्वीकारण्याची हिंमत आम्ही गमावून बसलो आहोत. ज्या आधुनिक पाश्चात्य सभ्यतेचे गोडवे गात आपला प्रवास सुरू आहे, तो प्रवास माणसाला कोठे घेऊन जाणार आहे, याची बटबटीत कुचिन्हं आता दिसायला लागली आहेत. त्यामुळेच हिद-स्वराज्यची आठवण करणे क्रमप्राप्त आहे.

केवळ 62 वर्षांपूर्वी होऊन गेलेला गांधी नावाचा महामानव आजच्या जागतिक सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोंधळाला काय म्हणाला असता? जगाचा जो प्रवास या महामानवाने आपल्या 79 वर्षांच्या आयुष्यात पाहिला, त्याविषयी त्याने काय भाष्य केले आहे? त्याने केलेल्या भाकितांचा विचार करता जग नेमके कोठे पोहोचले आहे? म्हणजे जगात पुढे काय होणार याचा काही अंदाज या माणसाला खरोखरच आला होता काय? जगात गांधीवादाच्या विरोधात सर्व गोष्टी चालल्या असताना गांधीजींना उद्याच्या युगाचा प्रवक्ता का म्हटले जाते? भोगवादाने उच्छाद मांडलेल्या जागतिकीकरणात गांधीजींच्या विचारांना खरोखरच काही स्थान आहे? असेल तर ते कोणते आणि नसेल तर आजही सर्व जग गांधीवादाकडे का खेचले जाते आहे? गांधीजींच्या 142 व्या जयंतीनिमित्त आज या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न विचाराला चालना देणारे तर ठरतीलच पण आजच्या जगण्यातील काही संभ्रमही दूर करण्यास मदत करतील.

गांधीजींसंबंधीच्या या प्रश्नाची उत्तरे मिळविणे ही सोपी गोष्ट नाही, मात्र गांधीजींचे सर्वात गाजलेले आणि क्रांतिकारी पुस्तक हिंद-स्वराज्यवाचले तर यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे मिळतात. 13 ते 22 नोव्हेंबर 1909 या 10 दिवसांत आणि वयाच्या 40 व्या वर्र्षी लिहिलेली ही पुस्तिका गांधीवादी क्रांतीचा जाहीरनामाम्हणून ओळखली जाते. म्हणजे आता या लेखनाला 102 वर्षे झाली आहेत. या कालखंडात जग कोठून कोठे आले, तरीही या पुस्तिकेचे वाचन जगभर केले जाते आहे, यावरून या विचारांची ताकद लक्षात येते.

आपण एक प्रयोग करू यात. या पुस्तिकेत गांधीजींनी केलेली काही विधाने मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या विधानाच्या संदर्भात आधुनिक काळातील काही घटनांकडे लक्ष वेधणार आहे. आपण त्या घटनांचा विचार करून गांधीजी त्यावेळी असे का म्हटले असतील, हे समजून घ्यायचे. आपल्याला त्या विचारांविषयी अधिक कुतूहल निर्माण झाल्यास ही पुस्तिका आपण मूळातूनच वाचणार, याची खात्री आहे. (परंधाम प्रकाशन, किंमत- 20 रुपये)

जितका वेळ आणि पैसा पालर्मेंट खचर्ते, तितका वेळ व पैसा जर काही थोड्या चांगल्या माणसांना मिळाला तर लोकांचा उद्धार होईल. हे पालर्मेंट लोकाचे एक खेळणेच आहे आणि हे खेळणे लोकांना फार खर्चात टाकते’.- हे विधान त्यावेळच्या ब्रिटिश संसदेविषयीचे आहे आणि आजची परिस्थिती पाहता त्याला कोणत्याही खुलाशाची गरज नाही. पाश्चिमात्य सभ्यता आणि तीमधील भोगवादावर गांधीजी तूटून पडतात. त्याविषयी ते एका ठिकाणी म्हणतात या पूर्वी माणसांना मारून ठोकून गुलाम करीत, आज माणसांना पैशाची आणि चैनीची लालूच दाखवून गुलाम बनवितात. पूर्वी लोकांत नव्हते ते रोग आज उत्पन्न झाले आहेत आणि त्याचबरोबर ते कसे नाहीसे करायचे याच्या शोधामागे डॉक्टर लोक लागले आहेत, यामुळे इस्पितळे वाढली आहेत आणि ही सुधारणेची खूण आहे!

स्वराज्यासंबंधीच्या एका चर्चेत गांधीजींनी म्हटले आहे, या ज्या लोकांना स्वराज्य भोगायचे आहे, त्यांना आपल्या वडिलांचा तिरस्कार करून चालणार नाही. वडिलांना मान देण्याचे आपले वळण जर का नाहीसे झाले तर आपण आणखी कुचकामी ठरू. परिपक्व माणसेच स्वराज्य भोगू शकतात, उच्छृंखल नव्हे. दोन पिढ्यांमध्ये निर्माण झालेला तणाव आपण आज पाहत आहोतच. यांत्रिकीकरणास गांधीजींचा टोकाचा विरोध होता, तो नंतरच्या काळात कमी झाला होता, मात्र विरोध का होता, हे समजून घेतले पाहिजे. गांधीजी म्हणतात, ‘धनलोभामुळे यंत्रांच्या मागे लागणे, हे महापाप आहे. मनुष्याला कठोर वा निरस कामापासून वाचवायला हवे. अशा मानवप्रेमातून निर्माण झालेले यंत्रच कल्याणकारी असेल, जसे सिंगरचे शिलाई यंत्र. मनुष्याच्या अवयवांत कामाअभावी जडत्व आणणारी, त्यांना निरुपयोगी बनविणारी यंत्रे नकोत. लाखो लोकांवर कामाअभावी उपाशी फिरण्याची वेळ आणणा-या यंत्रवेडाला सर्वोदयाचा विरोध आहे’. यंत्राच्या अतिवापरामुळे संपत्तीचे केंद्रीकरण झालेले आणि लठ्ठपणा आणि हृदयरोग्यांचे वाढलेले प्रमाण आज आपण पाहतच आहोत.

स्वतंत्र भारतात सर्वांना सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही, हा इशाराही गांधीजींनी देऊन ठेवला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘स्वराज्य इच्छिणा-या ना मी एक इशारा देऊ इच्छितो की भिल्ल, पेंढारी आणि ठग हे आपले भाईबंद आहेत. त्यांची अंत:करणे जिंकून घेणे हे तुमचे माझे काम आहे. तुमच्याच भावाची जोपर्यंत धास्ती राहील तोपर्यंत ध्येयाप्रत आपल्याला पोचता येणार नाही.त्यावेळी गांधीजींनी जातींचा उल्लेख केला आहे, मात्र आज देशात अविकसित भागांमध्ये वाढत चाललेला नक्षलवाद पाहिल्यास त्यांच्या म्हणण्याचे गांभीर्य लक्षात येते.

पाश्चिमात्य सभ्यता किती वाईट आहे, भारतीय संस्कृतीमध्येच आपल्या प्रश्नांची उत्तरे का शोधली पाहिजेत, चांगल्या परिणामांसाठी चांगलीच साधने का वापरली पाहिजेत, इंग्रजांनी रुजविलेली शिक्षणपद्धती कशी फेकून दिली पाहिजे, सत्याग्रह आणि आत्मबळाचे महत्त्व किती आहे आणि त्याचा वापर कसा केला जावा अशा 20 विषयांचे गांधीजींनी विवेचन आणि त्यानंतरची 40 वर्षे म्हणजे मृत्यूपर्यंत त्याचे समर्थनही केले आहे. आजच्या काळाचा विचार करता काही गोष्टी (डॉक्टर आणि वकिली व्यवसायांवरील जहाल टीकेसारख्या) टोकाच्या वाटतात, मात्र ज्या कारणाने ते अशी टोकाची मते व्यक्त करतात, ती अंतिमत: आपल्याला पटतात.

गांधीजींनी सांगितलेली जीवनशैली आज आपण स्वीकारू शकणार नाही, कारण ती स्वीकारण्याची हिंमत आम्ही गमावून बसलो आहोत. ज्या आधुनिक पाश्चात्य सभ्यतेचे गोडवे गात आपला प्रवास सुरू आहे, तो प्रवास माणसाला कोठे घेऊन जाणार आहे, याची बटबटीत कुचिन्हं आता दिसायला लागली आहेत. त्यामुळेच हिद-स्वराज्यची आठवण करणे क्रमप्राप्त आहे.