Tuesday, September 6, 2011

जग निघाले नव्या व्यवस्थेच्या शोधात
मानवी उन्नतीसाठी ‘आपलाच मार्ग खरा’ असे सांगणार्‍या ‘इझम्स’ची मुदत संपूनही आता किमान तीन दशके झाली आहेत. नाहीतरी डावे, उजवे आणि मध्यममार्गी असे कोणीही सत्तेवर आले तरी ते सारख्याच पद्धतीने राज्य करतात, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे अख्खे जग आता नव्या प्रकारची समन्यायी, निरपेक्ष आणि पारदर्शी व्यवस्था मागू लागले आहे.

भ्रष्ट आचाराने आपल्या आयुष्याला कसे व्यापून टाकले आहे आणि ते आता लाखो माणसांच्या लक्षात यायला लागले आहे, हे अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ आणि अनेक राजधान्यांच्या रस्त्यावर उतरलेल्या जगाच्या नागरिकांनी दाखवून दिले. आम्हाला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे आणि प्रामाणिक, समृद्ध आणि शांत जीवन जगायचे आहे, हे केवळ भारतीयच नव्हे, तर या जगातल्या प्रत्येक नागरिकाला वाटते, मात्र काही माणसांनी अक्कलहुशारीच्या आणि भांडवलाच्या जोरावर सापळाच असा रचला आहे, की काही मोजक्या माणसांच्या ताटात आपोआप भरपूर वाढले जाते आहे. काही जण ते ओढून घेण्यासाठी धडपडत आहेत. काही जण ताटात पडले तेवढ्यावर समाधान मानत आहेत तर काही जणांचे ताट अजूनही रिकामेच आहे. म्हणजे माणसांनी जे भोग भोगावेत त्यापेक्षा कितीतरी अधिक भोग घेणारी, अंथरूण पाहून पाय पसरावेत अशा मध्यममार्गात समाधान मानणारी आणि माणसांच्या वाट्याला यावीत, अशीच दुःख द्या, अशी याचना करणारी मंडळी अशा तीन प्रकारची माणसे या जगात कित्येक शतकांपासून आहेत. एकविसाव्या शतकात त्यात एक महत्वाचा बदल झाला आहे, तो असा की आपल्याला मिळणारी सुखदुःख ही पूर्वजन्मातच निश्चित झाली आहेत, असे मानायला आता माणसे नकार देत आहेत. आता त्यांना कळाले आहे, की आपली सुखदुःखे जशी स्वतःवर अवलंबून आहेत, तेवढीच ती परस्परांवर अवलंबून आहेत. म्हणजे आपल्या सुखदुःखाचा आणि राजा, सरकार, प्रशासन याचा जवळचा संबंध आहे. तो संबंध आता खर्‍या अर्थाने प्रस्थापित झाला आहे. जागतिकरणाने त्याला असा जोराचा धक्का दिला की केवळ ‘ग्लोबल वॉर्मिंग’म्हणजे नैसर्गिकच नव्हे तर जगातील भौतिक व्यवहारही प्रत्येकाच्या आयुष्याला भिडायला लागले आहेत. महत्वाचे म्हणजे त्‍याचे भान आता बहुजनांना यायला लागले आहे. जगाच्या व्यवहारांचे आपल्यावर परिणाम तर होतात,मात्र मी काही करु शकत नाही, ही हतबलता वाढत चालली आहे. जगभर आज जी अस्वस्थता निर्माण झाल्यासारखे वाटते आहे, त्याचेही खरे कारण हेच आहे.

जगा आणि जगू द्या असा संदेश देणारी भारतीय संस्कृती एक श्रेष्ठ संस्कृती आहे, याविषयी दुमत नसले तरी जगात जे नको ते घडते आहे, तेच आज भारतातही घडते आहे. या जागतिक उलथापालथीमध्ये खरेतर श्रेष्ठत्वाच्या कसोटीत आपण पास व्हायला हवे होते, मात्र तसे काही झालेले दिसत नाही. ज्या समूहाचे मानसिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय स्थैर्य धोक्यात सापड्ले आहे, तो समूह स्वतंत्रपणे जगू शकत नाही. त्याला नाव काहीही दिले तरी ज्या आर्थिक व्यवहारांवर जग नाचायला लागले आहे, त्याच नाचात आज भारतीयही सहभागी झालेले दिसत आहेत. एकाप्रकारे या लाटेत सर्वच देशांनी आपले वेगळेपणाचे स्वातंत्र्य गमावले आहे. आता तुमचा धर्म, जात, देश, राज्य, भाषा, रूप, रंग महत्वाचा ठरत नसून तुमची आर्थिक पत महत्वाची ठरू लागली आहे. देशादेशाचे संबंध हे तर लांबची बाब झाली, ज्या नात्यांना आम्ही पैशात मोजायचे टाळत होतो, ती नातीही आता आर्थिक निकषांवर ठरू लागली आहेत. प्रत्येकाची आर्थिक पत वाढविणे हाच परिवर्तनाचा खरा मार्ग आहे, यावर तर महंमद युनुसांना नोबेल पुरस्कार देवून जगाने शिक्कामोर्तबच केले आहे.

जगाचा हा प्रवास असे सांगतो की आता जगाच्या हिताचे आर्थिक व्यवस्थापन करावे लागेल. मानवी उन्नतीसाठी ‘आपलाच मार्ग खरा’ असे सांगणार्‍या ‘इझम्स’ची मुदत संपूनही आता किमान तीन दशके झाली आहेत. नाहीतरी डावे, उजवे आणि मध्यममार्गी असे कोणीही सत्तेवर आले तरी ते सारख्याच पद्धतीने राज्य करतात, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे अख्खे जग आता नव्या प्रकारची समन्यायी, निरपेक्ष आणि पारदर्शी व्यवस्था मागू लागले आहे. अशी व्यवस्था जी अधिकाधिक माणसांना त्यांची प्रतिष्ठा त्यांचा मानवी हक्क म्हणून देणार आहे. जिच्यात मुजोरी नसेल आणि मिंधेपणाही नसेल. जिला मूलभूत गरजा भागविताना माणसामाणसामध्ये भेद करता येणार नाहीत. जी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होवून नकोशा मानवी हस्तक्षेपाला लगाम लावेल. जी मानवाचे निसर्गातील संवेदनशीलतेचे वेगळेपण पुन्हा बहाल करील. जी जगाला खर्‍या अर्थाने जवळ आणेल आणि जी माणसाला सर्वार्थाने मानवी आयुष्य जगण्याची मुभा देईल.

नव्या जगात गरीब देश आणि श्रीमंत देश असा भेद राहिला नसून गरीब देशातील गरीब आणि श्रीमंत देशातील गरीब तर दुसरीकडे गरीब देशातील श्रीमंत आणि श्रीमंत देशांतील श्रीमंत देश असे हे गट पडले आहेत.त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशांतील श्रीमंत आपले हितसंबंध जपण्यासाठी जगाचे आर्थिक व्यवस्थापन करत आहेत. ते तसे होण्याऐवजी सर्वांच्या हिताच्या आर्थिक व्यवस्थापनाकडे नव्या जगाला वळावे लागेल. तसे न झाल्यास जगातील अस्वस्थ गट जगाला कसे वेठीस धरु शकतात, हे आजच आपण जागतिक दहशतवादाच्या रूपाने पाहात आहोत. या दहशतवादाने उद्या अक्राळविक्राळ रुप धारण केले तर जगात अशी असुरक्षितता निर्माण होईल, ज्यात माणसाने सर्वश्रेष्ठ जन्म म्हटलेले मानवी आयुष्य जगता येणार नाही. एकविसाव्या शतकात माणूस यापैकी कोणत्या दिशेला वळतो, हे येत्या एकदोन दशकातच निश्चित होणार आहे.
www.arthakranti.org