Sunday, December 6, 2015

झुबेरबर्ग, तुझे खूप आभार...




फेसबुकचा संस्थापक आणि जगातील अतिश्रीमंत तरुण मार्क झुबेरबर्ग याने आपली कन्या मॅक्सला उद्देश्यून एक पत्र लिहिले आणि ४५ अब्ज डॉलर लोककल्याणासाठी देऊन टाकले. या पत्रात त्याने उद्याच्या सुंदर जगाची हाक तर दिलीच पण एक बाप म्हणून आपल्या भावना व्यक्त करून समानतेवर आधारित जगाची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे...


फेसबुकचा संस्थापक मार्क झुबेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रीसिला चानने आपली मुलगी मॅक्सच्या जन्माच्या आनंदात लोककल्याणासाठी ४५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत दोन लाख ७० हजार कोटी रुपये दान केले आहेत! या ३१ वर्षांच्या तरुणाने एवढी प्रचंड संपत्ती दान केली यावर अजून विश्वास बसत नाही. डॉलर समोर आले की आम्ही त्याचे रुपयांत रुपांतर करणारी माणसं. तसे रुपांतर करायचे तर आमच्या देशात वर्षाला जेवढा इन्कम टॅक्स जमा होतो त्यापेक्षा जास्त किंवा ११ कोटीच्या आपल्या महाराष्ट्रावर जेव्हढे कर्ज आहे, त्यापेक्षा थोडे कमी, एवढे हे पैसे आहेत! लोककल्याणासाठी भरभरून पैसा देणाऱ्या अमेरिकन समाजात पैसा देण्याचे कौतुक आपल्याएवढे असण्याचे कारण नाही. उद्याचा दिवस अधिक चांगला उगवला पाहिजे, असे मानणारा आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणारा समाज तो. झुबेरबर्गच्या देणगीचे वैशिष्ट असे की त्याने तरुण वयात देणगी दिली आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्याने आपली लाडकी मुलगी मॅक्सला जे पत्र लिहिले आहे, ते पत्र. जगाकडे नवीन पिढी कसे पाहते आहे, त्याचा हे पत्र म्हणजे एक आश्वासक आवाज आहे. त्याच्यासाठी झुबेरबर्ग, आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत.

मानवतावाद, आरोग्य आणि समानतेसाठी हा पैसा वापरला जाणार आहे, असे तू जाहीर केले आहेस. तुझा समाज आम्ही भांडवलशाही समाज म्हणून ओळखतो, तरीही तू या शब्दांचा इतक्या ठामपणे उल्लेख केला आहेस! तुझ्याच फेसबुक नावाच्या व्यासपीठावर १४४ कोटी लोक आज बोलू लागले आहेत, त्यामुळे जगाच्या व्यापकतेचा आणि मानवाच्या सुखदु:खाचा त्याच व्यासपीठावर उच्चार केलास. विशेषत: मानवी जगण्यातील आईवडील होण्याचा आनंद आणि काळजी या जैविक म्हणून ज्या गोष्टी आहेत, त्या तू सामान्य माणसासारख्या व्यक्त केल्या, हे आपल्याला आवडलं. नाहीतर त्यातही भेद असला पाहिजे, असे मानणारे काही कमी नाहीत. या मानवी जगण्यात जात, धर्म, देश प्रदेशांचे कोणतेही भेद नाहीत, याची तू जाणीव करून दिलीस, हे फार चांगलं झालं. ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचे लोक मन लावून ऐकतात, त्यामुळे तू ही बाजू घेतलीस, याबद्दल तुझे आभार मानलेच पाहिजेत.

तुझी पत्नी प्रीसिला चान असं म्हणाली आहे की तू काम खूप करतोस, आणि ते तू सिध्दही केलं आहेस. हॉरवर्ड विद्यापीठाचे कम्युनिकेशन जोडताना ही फेसबुकची कल्पना तुला सुचली. सारं जग आपण यातून जोडू शकतो, असा विचार फायद्यासाठीही येण, हे मोठेपणच आहे. पण गेल्या १० – १२ वर्षात तू ज्या पद्धतीने वावरतो आहेस, कार्पोरेट जगाचे कोड झुगारतो आहेस, कधी टी शर्ट, जीनचा स्वीकार करून, कधी बाप म्हणून रजा घेऊन तर कधी कामाला मानवी चेहरा कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करून. अमेरिकेतील कामाची संस्कृती आम्ही जाणून आहोत, जिच्यात माणसाला ‘ह्युमन रिसोर्स’ म्हणतात आणि तो रिसोर्स पिळून घेतला जातो. तू त्याविषयी काही वेगळे बोलण्याचा प्रयत्न करतो आहेस, त्याचे जे परिणाम होतील, त्याबद्दलही तुझे आभार.

ज्याला अत्याधुनिक जग म्हणतात, त्या आजच्या जगात आपल्या सर्वांची प्रकृती बिघडत चालली आहे आणि एक सर्वव्यापी अस्वस्थता भरून राहिली आहे, असं तू या पत्रात म्हटलं आहे. हे फेसबुकचा संस्थापक आणि जगातला एक अतिश्रीमंत माणूस बोलत नाही, हा मॅक्स या गोड चिमुरडीचा बाप बोलतो आहे. असा बाप ज्याला माहीत आहे की आपल्या मुलीला एक ना एक दिवस स्वत:च्या पंखांनीच या जगात विहार करायचा आहे. जेव्हा ती वेळ येईल, त्यावेळी आजूबाजूचं जग सुंदर आणि संवेदनशील असावे लागेल. तसं ते व्हावं, असे सर्वांनाच वाटतच असते. पण एक बाप म्हणून त्यासाठी मी काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव आजच्या बापांच्या पिढीला करून दिलीस, त्याबद्दल विशेष आभार.
दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या म्हणून तुझे भारतावर एक व्यावसायिक म्हणून प्रेम असणे साहजिकच आहे. जग खुले झाले आहे आणि त्याचा तू फायदा घेतो आहेस. पण तू जेव्हा संभ्रमात होतास तेव्हा याच भूमीवर फिरून तू तुझा संभ्रम दूर करून घेतलास, असेही तू म्हटले आहे. ते बरोबरच आहे. तत्वज्ञानाची एक प्रचंड ताकद या भूमीत अगदी पूर्वीपासून आहे. अमर्याद काळ आणि आकाशाची सतत आठवण ठेवून या समाजाने जगण्यातील ‘निरर्थक’तेकडे जगाचे लक्ष वेधले आहे. पण याचा अलीकडे आम्हालाच विसर पडला असे वाटू लागले असताना चक्क पश्चिमेकडून तुझ्यासारख्या एका तंत्रज्ञाने त्याची हाक द्यावी, याच्याइतका आनंद तो कोठला! आता खरे जग एक झाले आहे, तत्वज्ञानाच्या गोष्टी तू करतो आहेस आणि त्याच्या प्रसारासाठी तुझ्या फेसबुकचा वापर आम्ही करतो आहे..! असेच झाले पाहिजे, असे किती थोर माणसे म्हणून गेली. ते होऊ शकते, याचे आश्वासन तू दिलेस, त्याबद्दलही आभार.

इंटरनेटने जग जोडलं गेलं, जग अतिवेगवान झालं, तंत्रज्ञानाने सर्व काही बदलून गेलं. आता जगात काही भव्यदिव्य घडवून आणण्याच्या गोष्टी होतात, तेव्हा तंत्रज्ञानाचा आधी विचार होतो. साधनांचा विचार केला जातो. ही जी भौतिक मुबलकता आहे, ती मात्र अजूनही सर्वत्र सारखी नाही. जगात एक मोठेच असंतुलन तयार झाले आहे. हे असंतुलन हीच संधी मानणारे जग आजूबाजूला असताना तू समानतेचा जाहीरपणे पुरस्कार करतो आहेस, एवढेच नव्हे तर काटकसर आणि पुर्नवापराची गरज व्यक्त करतो आहेस! तंत्रज्ञानाची गाडी कितीही वेगाने पळविली तरी त्याचे इंजिन तत्त्वज्ञानच असले पाहिजे, असे तंत्रज्ञानाच्या जीवावर अतिश्रीमंत माणूस म्हणतो, याचे महत्व अधोरेखित केलेस, त्याबद्दल तर आभार मानलेच पाहिजे.

मॅक्स घरात आल्याने एक अवर्णनीय आनंद तुला झाला आहे आणि तो तू लिहिलेल्या पत्रात दिसतोच आहे. त्या आनंदात तू ४५ अब्ज डॉलर चांगल्या, सुंदर जगासाठी देऊन टाकले आहेस. तो आनंद आता द्विगुणित होणार आहे, कारण त्या आनंदाची नाळ तू सुंदर अशा उद्याच्या जगाशी जोडली आहेस. तू या प्रसंगाने जगाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागलास, ती दृष्टी आम्हा सगळ्यांना मिळो...!



No comments:

Post a Comment