Thursday, August 14, 2014

ऑनलाईन बाजाराच्या स्पर्धेतील भारत !





फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील आणि अलिबाबा ही ऑनलाईन खरेदीच्या वेबसाइटची नावे आज शहरी तरुणांच्या तोंडी सतत ऐकू येवू लागली आहेत. पण येत्या दोन तीन वर्षांत ती सर्वांनाच परिचित होतील आणि आपल्या खरेदीविक्रीचा तो प्रमुख मार्ग होईल. जगातील हा बदल भारतीय ग्राहकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र झाली आहे. कशी असेल ती स्पर्धा ?

शेती आणि नंतरच्या कालखंडात औद्योगिक उत्पादन वाढले तेव्हा जगाची अर्थव्यवस्था खूपच स्थिर होती. मात्र तंत्रज्ञानाने जगाला जवळ आणले आणि व्यापारउदीमाच्या पद्धती पार बदलून गेल्या. अलीकडच्या काळात जागतिकीकरणाने इतका वेग घेतला की त्याच वेगाने अर्थव्यवस्थाही फिरू लागल्या. या बदलांचा आणि आपला किती जवळचा संबंध आहे, हे भारतीय गेले २३ वर्षे अनुभवत आहेत. या बदलांचा पुढील टप्पा जगात सुरु झाला असून तो पुन्हा आपल्या दाराशी उभा ठाकला आहे, असे गेल्या १५ दिवसांतील घटना आपल्याला सांगत आहेत.

ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्यांचे व्यवहार आताआतापर्यंत आपल्या गावीही नव्हते, मात्र इंटरनेटचा प्रसार मोबाईलच्या मार्गाने वेगाने होऊ लागला आणि फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील आणि अलिबाबा ही नावे किमान शहरी तरुणांच्या तोंडी सतत ऐकू येवू लागली. पण येत्या दोन तीन वर्षांत ती सर्वांनाच परिचित होतील आणि आपल्या खरेदीविक्रीचा तो प्रमुख मार्ग होईल की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाचे स्वागत करावे कि त्याला विरोध करावा, हे भारतीय समाजाला सुरवातीस कळू शकले नाही, मात्र त्याचे आक्रमण किंवा अपरिहार्यता आज सर्वांनाच स्वीकारावी लागली. तसेच ऑनलाईन व्यवहारांचे होणार आहे, अशीच सर्व लक्षणे दिसू लागली आहेत.

बंगळूर येथे मुख्यालय असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीने आपला व्यवसाय वाढविण्यास एक अब्ज डॉलर म्हणजे सहा हजार कोटी रुपयांचे भांडवल मिळविले आहे. आणि त्यानंतर २४ तासांच्या आत अमेझॉन या अमेरिकी कंपनीने भारतात विस्तारासाठी दोन अब्ज डॉलर म्हणजे १२ हजार कोटी रुपये भांडवल मिळविले. भारतीय क्रयशक्तीची किंमत जगात आज तिसऱ्या क्रमांकाची आहे आणि अशा महत्वाच्या बाजारावर जागतिक कंपन्यांचे बारीक लक्ष आहे. नाहीतर या घटना २४ तासाच्या अंतराने होण्याचे काही कारण नव्हते. एरवी या घटना आपल्या दृष्टीने महत्वाच्या नाहीत म्हणून सोडून दिल्या असत्या. मात्र तसे करणे हा कसा आत्मघात आहे, हे समजून घेतले पाहिजे. आज आपल्यातील अनेकजण कदाचित या कंपन्यांचे थेट ग्राहक नसतील, मात्र अनेकांची मुले इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करायला लागली आहेत, त्यालाही आता दोन तीन वर्षे उलटून गेली आहेत. एवढेच नव्हे तर संगणकाच्या स्क्रीनवर वस्तूंची दिसणारी ती रेलचेल, वैविध्य आणि दरांत सुट पाहून सर्वांनाच ऑनलाईन खरेदी आकर्षून घेणार आहे. हे सर्वांनाच मान्य होईल, असे नाही पण ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सर्वांची नजीकच्या भविष्यातला ग्राहक म्हणून मोजणी करूनही टाकली आहे!

भारतातील सध्याचे ‘ऑनलाईन रिटेल मार्केट’ अजून १२ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र गेल्या १५ दिवसांत फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने १८ हजार कोटी रुपयांचे भांडवल त्यासाठी सज्ज ठेवले आहे! आता त्यातून वस्तूंचे साठे करण्यास कोठारे बांधली जातील, आकर्षक जाहिराती केल्या जातील आणि तुम्ही ऑनलाइन जाताच तुमच्या आवडीच्या आणि गरजेच्या वस्तू तुम्हाला मोबाईल तसेच संगणकाच्या पडद्यावर खुणावू लागतील. अठरा हजार कोटी रुपये म्हणजे दिल्ली राज्याच्या सध्याच्या अर्थसंकल्पाच्या निम्मी रक्कम तर भारतातील सर्वात श्रीमंत मानल्या गेलेल्या आणि दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई महापालिकेच्या बजेटच्या फक्त १० हजार कोटींनी कमी किंवा पुणे महापालिकेच्या बजेटच्या हा निधी तब्बल चौपट आहे!

भारतातील ऑनलाईन व्यवहार कसा राक्षसी वेगाने वाढतो आहे, यासंबधीची जी आकडेवारी समोर येते आहे, ती पाहिल्यावर भारत आणि भारतीय नागरिक कसे बदलून चालले आहेत, याची चुणूक पाहायला मिळते. त्याची काही उदाहरणे अशी

१. फ्लिपकार्टकडे सध्या खरेदी करणाऱ्या दोन कोटी २० लाख ग्राहकांची नोंद आहे. तर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या २० कोटींवर पोहचली आहे, म्हणजे तो उद्याचा ऑनलाईन ग्राहक आहे.
२. इंटरनेटची सुविधा मोबाईलवर सहजपणे मिळू लागल्याने ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या पुढील पाच वर्षांत ४० कोटींवर जाईल.
३. भारताचे ‘ऑनलाईन रिटेल मार्केट’ सध्या १२ हजार कोटी असून ते २०२० मध्ये १९ हजार कोटींवर जाणार, असा अंदाज आहे.
४. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सध्या साडे सहा कोटी असून २०२० अखेर ती चौपट म्हणजे २५ कोटींवर जाईल. या फोनमार्फत ऑनलाईन व्यवहार सहजपणे करता येतात. फ्लिपकार्टचा निम्मा व्यवसाय सध्या स्मार्टफोनद्वारे होतो आणि अमेझॉनही त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
५. ऑनलाईन विक्रीत होत असलेली ही वाढ लक्षात घेता रिलायन्स रिटेल, टाटा, आदित्य बिर्ला आणि फ्युचर ग्रुप हेही या स्पर्धेत उतरतील आणि ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांशी करार करतील.
६. क्रयशक्ती वाढत चाललेल्या भारतात ५०० अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू विकल्या जाणार असून त्यात ऑनलाइन विक्रीचा वाटा वाढविण्याची मोठी संधी या क्षेत्रातील कंपन्या शोधत आहेत.
७. ग्राहकाच्या खिशातील पैसा जेथे जातो, त्या कंपन्या श्रीमंत होतात. गेल्या काही वर्षांत ऑनलाइन विक्री वाढल्याने फ्लिपकार्ट या अलीकडील कंपनीचे मूल्य आज सहा अब्ज डॉलर (पुण्याच्या बजेटपेक्षा दोन हजार कोटी अधिक!) झाले आहे आणि तिचे मालक सचिन आणि बिनी बन्सल ते १०० अब्ज डॉलरवर जाईल, असे प्रयत्न करत आहेत. तर अमेझॉनचे आजचे मूल्य १५० अब्ज डॉलर असून ते थेट उत्पादन करणाऱ्या टाटा ग्रुपच्या (१३८ अब्ज डॉलर) एकूण बाजारमुल्यापेक्षा १२ अब्ज डॉलरने अधिक ठरते.
८. ऑनलाईन व्यवहारांमुळे बरेच खर्च वाचतात, त्यामुळे या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किंमतीत देणे शक्य होते. शिवाय आपल्याच साईटवरून वस्तूंची खरेदी व्हावी म्हणून मोठी सुट देवून ऑनलाईनद्वारे खरेदी करणारे वाढावेत असे प्रयत्न केले जात आहेत. कंपन्यांच्या स्पर्धेत ते आणखी वाढणार आहेत.
९. बाजारात येवू घातलेल्या काही नव्या वस्तू किंवा मॉडेल फक्त ऑनलाईन उपलब्ध आहेत, असे प्रयोग आता सुरु झाले आहेत. याचा अर्थ जो ऑनलाईन नाही, त्याला ती वस्तू मिळणार नाही. अलीकडेच गुगलने मोटो ई आणि मोटो जी मोबाईल फोन मॉडेल फक्त अशा मोजक्या साईटवर विक्रीस ठेवले होते. त्या फोनचा साठा पुढील २४ तासात संपलाही, यावरून या बाजाराची क्षमता आणि कुतूहल लक्षात येते.
१०. अमेझॉन साईटवर विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या आता साडे आठ हजारांवर गेली आहे. तर फ्लिपकार्टवरील अशा कंपन्यांची संख्या पुढील वर्षभरात तब्बल ५० हजारांवर नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या या साईटवर चार हजार कंपन्या असून वर्षभरात सहा हजार कोटी रुपयांची विक्री करण्यात आली आहे.
११. ब्रंडेड वस्तू विकून या साईट ३५ टक्के तर ब्रंडेड नसलेल्या वस्तू विकून ६० टक्के नफा मिळवीत आहेत.
१२. ऑनलाईन बाजारामुळे प्रत्यक्ष बाजारातील किती रोजगार कमी होईल, हा अभ्यासाचा विषय आहे, मात्र वर्षभरात फ्लिपकार्टमध्ये २६ हजार कर्मचारी काम करत असतील तर अमेझॉनमध्ये दोन वर्षात ४० लाख कर्मचारी काम करत असतील.
१३. ऑनलाईन बाजारात आता पैसा आहे, हे हुशार गुंतवणूकदारांना लगेच लक्षात येते आणि ते त्या क्षेत्रात पैसे गुंतवू लागतात. आयटी कंपन्याचे अजीम प्रेमजी आणि नारायणमूर्तीसारखे मालक आणि त्यांच्यासारखे गुंतवणूकदार अशा कंपन्यांत आपला पैसा गुंतवीत आहेत.
१४. २४८ अब्ज डॉलर इतक्या किंमतीच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या अलिबाबा या चीनच्या ऑनलाईन कंपनीचेही लक्ष भारतीय ग्राहकांकडे असून तिनेही भारतात पूर्ण क्षमतेने उतरण्याची तयारी सुरु केली आहे. तिने मुंबईसह चार महानगरांत आपली कार्यालये थाटली आहेत.

तात्पर्य, ऑनलाईन खरेदीविक्री ही भविष्यात आमबात होणार असून त्यातील पैसा आपल्या तोजोरीत पडावा, याची स्पर्धा आता तीव्र झाली आहे.

No comments:

Post a Comment