Friday, August 1, 2014

कशासाठी समजून घ्यायची ही पैशांची भाषा ?





नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून देशातील वातावरण बदलून गेले असे आपण म्हणतो. पण हे वातावरण नेमके कशामुळे बदलले याचा शोध घेतला की आपल्या लक्षात येते की देशाच्या अर्थचक्राला वेग येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ते बदलले आहे. याचा अर्थ असा की आधुनिक जगात अर्थकारणाला सर्वाधिक महत्व प्राप्त झाले आहे. देश, राज्य, प्रदेश, जिल्हा, गाव, कुटुंब आणि माणूस या सर्वांचे महत्व आर्थिक व्यवहारांवर ठरू लागले आहे. हे चांगले की वाईट याची चर्चा होऊ शकते, मात्र व्यवहारात हे शंभर टक्के खरे आहे, एवढेच नव्हे तर पैशांअभावी सर्वांचीच कोंडी होऊ लागली आहे.

असे का होते आहे, याचा विचार करता लक्षात येते की पैसा माणसाने निर्माण केला तो, देवघेवीचे साधन म्हणून. पण आज त्याला खासगी मालकीच्या वस्तूचे स्वरूप आले आहे. याचा अर्थ असा की जो पैसा शरीरातल्या रक्तासारखा, नदीच्या पाण्यासारखा, आपला श्वास ज्या हवेवर अवलंबून आहे त्या हवेसारखा प्रवाही आणि शुद्ध असला पाहिजे, तो काही मोजक्या हातात गोठला आहे. तसेच तो अतिशय अशुद्ध झाला आहे. प्रवाही आणि शुद्ध रक्त, पाणी, श्वासाशिवाय जसे आपण जगू शकत नाही, तसेच प्रवाही आणि शुद्ध पैशांशिवाय आपण जगू शकत नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणून आपल्याला पैशांची भाषा समजून घ्यायची आहे.

आता आपण जी चर्चा करणार आहोत, तिच्यासाठी तुमच्या विचाराला थोडा ताण द्यावा लागेल. पण ते आवश्यक यासाठी आहे की तो एकदा दिला की आधुनिक जगात आपण नेमके काय केले पाहिजे, नेमके काय करण्याची गरज आहे, हे स्पष्टपणे दिसायला लागते. जग कळायला लागते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अर्थ लगेच समजायला लागतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समृद्ध आयुष्य म्हणजे काय, हेही लक्षात येते.

याची सुरवात आपण अर्थातच आपल्या देशापासून करू यात. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवू यात की आपला देश खूप समृद्ध आणि श्रीमंत आहे. उत्पादन, कष्ट, नवनिर्मिती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यात आपण जगातील १९३ देशांत कोठेही कमी नाही. इंधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सोडले तर आपण जगाकडून आयात करावे, असे काहीच नाही. १९७२ साली अमेरिकेकडून निकृष्ठ धान्य आयात करावे लागणाऱ्या या देशाने गेल्या ४० वर्षांत क्वचितच धान्य आयात केलेले आहे. उलट तो जगाला धान्य निर्यात करतो आहे आणि तेही लोकसंख्या १२५ कोटींवर पोहोचली असताना ! जगातली दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आणि सातव्या क्रमांकाची जमीन असलेला हा देश जगातला आज एक प्रमुख आणि सर्व क्षेत्रात चांगल्या अर्थाने दखलपात्र देश झाला आहे. क्रयशक्तीचा विचार केला तर भारत ही जगातील तिसरी आर्थिक शक्ती आहे, जीडीपीचा विचार करता तो नवव्या क्रमांकावर आहे. जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सोने (अंदाजे २३ हजार टन) आपला देश बाळगून आहे. जगातल्या आजच्या जवळपास सर्व आर्थिक निकषांवर आपल्या देशाचा क्रमांक आज पहिल्या दहा देशांत लागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आधी आपल्या सर्वांना त्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे.

अर्थात एवढी चांगली परिस्थिती असताना आज आपण देशात किती वाईट घटना घडत आहेत, याचीच प्रामुख्याने चर्चा करतो आणि त्याचे कारणही आपल्याला माहीत आहे. गेल्या काही वर्षांत आपला देश जगातला आर्थिकदृष्ट्या एक सक्षम देश झाला असला तरी ती सक्षमता देशातील फार कमी लोकांच्या वाट्याला आली आहे. वाढत्या संपत्तीत वाटा मिळाला नाही की कोणालाही अस्वस्थता येते, तशी अस्वस्थता आपल्या देशात सध्या सर्वत्र दिसते आहे. त्यातून नकारात्मक विचार उचल खातात आणि आपणच आपल्या देशाविषयी आणि देशबांधवांविषयी वाईट बोलायला लागतो. आपण एकमेकांविषयी इतके वाईट बोलतो की त्यातून भारत नावाच्या महान देशाची आपण बदनामी करतो आहोत, हेही आपल्या लक्षात येत नाही. ही वेळ आपल्यावर का आली, हे समजून घेऊ.

गेल्या तीन चार दशकांमध्ये जगात प्रचंड पैशीकरण झाले आहे. पैशीकरण याचा अर्थ असा की जगातल्या सर्व गोष्टींचे मूल्यमापन पैशांत होऊ लागले आहे. पैशांचे महत्व प्रचंड वाढले आहे. खिशात पैसे नसतील तर आपण घराबाहेर पडू शकत नाही. कुटुंब, घर, शिक्षण, आरोग्य, करियर असा आजचा आयुष्यातील कोणताही महत्वाचा पैलू घ्या... त्यासाठी पैसा लागतोच. तो कसा मिळवावा आणि तो कसा वाढवावा, हे दोन्हीही महत्वाचे विषय आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे निर्णय आपण घेऊ शकतो काय?, हा आहे. तो निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे जीवन जगताना लागणारा आत्मविश्वास. पैशांचे हे व्यवहारच केले जाऊ दिले नसतील तर दुर्बल घटकांना हा आत्मविश्वास येणार कोठून? तो देण्याचे काम आर्थिक साक्षरता करते. या दशकात याचे महत्व सरकारनेही जाणले आणि ‘स्वाभिमान’ नावाची योजना हाती घेतली, ज्यामध्ये नागरिकांचे बँकेत खाते काढण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. मात्र आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण आजही आपल्या देशात फक्त ४५ टक्के लोक बँकिंग करतात. पैसा प्रवाही आणि शुद्ध राहण्यासाठी तो बँकेत असणे अतिशय महत्वाचे आहे. युरोप, अमेरिका प्रगत देश आहेत, असे आपण म्हणतो तेव्हा तेथे सर्व पैसा बँकेत खेळत असतो तर आपल्याकडे तो रोखीत लपत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेत निम्म्यापेक्षा अधिक पैसा काळा आहे, असे आपण म्हणतो.

पैशांच्या व्यवहारांना किती महत्व द्यायचे हा एकेकाळी वादाचा मुद्दा होता, मात्र आज तसा तो राहिलेला नाही. आयुष्यातल्या सर्व सुखदुःखात पैसा अतिशय महत्वाची भूमिका बजवायला लागला असल्याने त्यापासून आपल्याला दूर राहता येणार नाही, एवढे नक्की. कोऱ्या नोटांचा वास, पैसे बँकेत जमा झाल्याची नोंद, आपली पत वाढली आहे, याचा पुरावा असलेली चेकवरील सही, घरी बसून केले जाणारे ऑनलाईन व्यवहार, पैशाने किंवा कार्डाने साध्य होणारे शॉपिंग, कोणाच्या उपकाराचे ओझे होत असल्यास ते नाकारण्याचे बळ देणारे हक्काचे कर्ज, गुंतवणुकीचे निर्णय आपण आपले घेत असताना होणारी जबाबदारीची जाणीव, आपल्या कमाईतून गरजू मित्राला किंवा नातेवाईकांना केलेली मदत आणि पैसे आहेत म्हणून साजरे केले जाणारे सणवार.... हे आणि असे हजारो प्रसंग जर आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग भरतात तर त्या प्रसंगांचे स्वागत का नाही करायचे ?

अर्थात हेही सांगितले पाहिजे की आपल्या देशात सध्या शुद्ध भांडवलासाठी सरकारची आणि सुजाण नागरिकांची धडपड सुरु आहे. आपल्या देशातील धन सोन्याचांदीत अडकल्यामुळे आपल्याला परदेशी भांडवलावर अवलंबून राहावे लागते आहे. पैशीकरणाने जग इतके जवळ आणले आहे की जगाच्या दुसऱ्या टोकाचे परिणाम आपल्यावर होत आहेत. काळा पैसा वाढतच चालल्याने आपले सार्वजनिक आयुष्य कमी प्रतीचे होत चालले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या आयुष्यात ताणतणाव वाढत चालले आहेत. ते कमी करण्याचा एक मार्ग आहे, जगातल्या आणि आपल्या आजूबाजूच्या आर्थिक घटना समजून घेणे. पैशांचा विषय, गुंतवणूक हा आपला विषय नाही, असे म्हणणे आता परवडणारे नाही. त्यामुळे आयुष्याच्या नियोजनात त्याला महत्वाचे स्थान देण्याची गरज आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशुद्ध झालेला पैसा शुद्ध करण्याची तसेच रोख आणि सोन्याच्या माध्यमातून सडत असलेल्या पैशाला मुक्त करून देशाच्या विकासकामात लावण्याची एक व्यापक चळवळ हाती घेण्याची. अशी एक चळवळ गेली १४ वर्षे आपल्या देशात सुरु आहे, तिचे नाव आहे अर्थक्रांती. आपल्या देशाचे प्रगत देश होण्याचे घोडे कोठे अडले आहे, याची अनेक कारणे सांगितली जातात. मात्र त्यातील सर्वात मोठा अडथळा कशाचा असेल तर तो काळ्या अर्थव्यवस्थेचा. ती आपल्या देशातून समूळ काढून टाकण्यासाठी अर्थक्रांती एक ऑपरेशन सुचविते. (पहा – अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव) अर्थक्रांतीचे एक सादरीकरण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशा अनेक नेत्यांसमोर झाले असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता त्यासाठीचा जनरेटा उभा करणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. कारण भारताला केवळ उपदेशबाजीची नव्हे, तर एका अर्थक्रांतीची गरज आहे!

No comments:

Post a Comment