Friday, August 30, 2013

‘चिल्लर’ची महाभयंकर गोष्ट!


रुपयाची किंमत घसरली, हे केवळ अर्थशास्त्रीय सत्य नसून आमचे आयुष्य कवडीमोल बनले आहे, आणि तेही आज नीट जगू दिले जात नाही, याविषयीची हतबलता आहे. सुट्या पैश्यांची टंचाई ही अशी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गोंधळाशी जाऊन भिडते, हे समजून घेण्याची गरज आहे.

पुण्यातील सहासात लाख पीएमपीएमएल म्हणजे शहर बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाश्यांच्या दृष्टीने एक आंनदाची घटना गेल्या बुधवारी घडली आहे. खरे म्हणजे आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात असे तीत काही नाही. मात्र सामान्य माणसाची जेव्हा सर्व बाजूंनी कोंडी होते, तेव्हा अशा छोट्या छोट्या आनंदावरच तो जगत असतो. घटना अगदीच साधी आहे. पीएमपीएमएलने आपल्या तिकीट दरांची पुर्रचना केली आहे. ही भाडेवाढही नाही आणि भाडेकपातही नाही. तरीही ती आनंदाची घटना आहे! आता हा प्रवास करणाऱ्यांना सुट्या पैशांची म्हणजे चिल्लरची फार चिंता करावी लागणार नाही. आता त्यांच्याकडून स्टेज किंवा अंतरानुसार पाचच्या पटीत म्हणजे ५, १०, १५, २०, २५ अशा दराने भाडे घेतले जाणार आहे. याचा अर्थ आता ७, ९, १२, १४, १७ असे भाडे असणार नाही. सुट्या पैशांअभावी सारा देश परेशान आहे. त्यावर या महामंडळाने हा स्थानिक मार्ग शोधला आहे.

सुटे पैसे नसतील तर कंडक्टरने प्रवाश्यांना बसमधून उतरवून दिलेले मी पाहिले आहे. सुटे पैसे असतील तर रिक्षात बसा, असे रिक्षाचालक म्हणत आहेत. बस, रिक्षा, टोलनाके आणि असे व्यवहार असणाऱ्या सर्व ठिकाणी सुट्या पैशांवरून तणाव निर्माण होतो आहे. पैसे सुटे करण्यासाठी आपल्याला त्याक्षणी गरज नसलेल्या वस्तू घेण्याची वेळ अनेकांवर येते आहे. मुद्दा पैसा कमावण्याचा नाही. कमावलेल्या पैशांतून अत्यावश्यक सेवा मिळविण्याचा आहे. सामान्य माणूस सर्व आघाड्यांवर भरडला जातो, हे आता नवे राहिलेले नाही. मात्र चिल्लरअभावी त्याची अशी कोंडी होऊ शकते, ही फारच भयंकर गोष्ट आहे.

पीएमपीएमएल नोटा छापत नाही आणि चिल्लर टाकसाळीतून काढत नाही. त्यामुळे त्यांना जे करण्यासारखे होते, ते त्यांनी केले. अर्थातच त्यामुळे काही प्रवाश्यांना एक, दोन रुपये जादा द्यावे लागतील आणि बहुतेक प्रवाश्यांना एक, दोन रुपये कमी द्यावे लागतील. महिन्याला त्यामुळे पीएमपीएमएलला अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. म्हणजे म्हटले तर प्रवाश्यांना या बदलाचा फायदाच होणार आहे. मात्र आपल्याकडील काही शहाणी म्हणविणारे आणि स्वयंघोषित समाजसेवक या पुनर्रचनेला विरोध करत आहेत, हे दुर्दैव होय. बदल हवा असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली, ही चांगली गोष्ट आहे, मात्र नेमका काय बदल हवा, हे सांगायला कोणी तयार नाही. एखादा संवेदनशील अधिकारी त्याच्या मर्यादेत स्थानिक पातळीवर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रोत्साहन देण्याचे सोडून सरकारी किंवा सार्वजनिक संस्थांना सतत बदनाम करण्याचा करंटेपणा केला जात आहे. सुट्या पैशांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्यात सुरु झालेल्या प्रयोगाच्या विरोधातील प्रतिक्रिया, हा असा करंटेपणाच आहे.

सुट्या पैशांची इतकी मारामार का आहे, हेही आता मुळातून समजून घेतले पाहिजे. साठ कोटी भारतीयांचे दररोजचे उत्पन्न ५० ते ६० रुपयांपेक्षा जास्त नाही, असे सुरेश तेंडूलकर समितीने म्हटले आहे. याचा अर्थ ६० कोटी सर्वसामान्य भारतीयांना ५० आणि त्यापेक्षा कमी मूल्याचे चलन (२०,१०,५,२,१ रुपये) वापरण्यासाठी लागते. मात्र आज १०००,५०० आणि १०० रुपये म्हणजे उच्च मूल्याच्या चलनाचे प्रमाण ९५ टक्क्यांवर गेले आहे! त्यामुळेच आज १००,५०० रुपयांची नोट जितक्या सहजपणे दिसते, तितक्या सहजपणे ५० रुपयांची नोट दिसत नाही. सुटे पैसे तर सहजपणे कोठेच मिळत नाही. २५ पैसे म्हणजे चार आणे दोन वर्षांपूर्वी अधिकृतपणे चलनातून बाहेर गेले. आता ५० पैसे बाहेर फेकले गेले आहेत आणि १,२ रुपये कमी जास्त मिळाले तर त्याविषयी फार कोणाची तक्रार राहिलेली नाही.

रुपयाची किंमत घसरली, हे केवळ अर्थशास्त्रीय सत्य नसून आमचे आयुष्य कवडीमोल बनले आहे, आणि तेही आज नीट जगू दिले जात नाही, याविषयीची हतबलता आहे. सुट्या पैश्यांची टंचाई ही अशी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गोंधळाशी जाऊन भिडते, हे समजून घेण्याची गरज आहे. (सोबतची आकृती पहा,अधिक माहितीसाठी पहा www.arthakranti.org)

अर्थव्यवस्थेत गेल्या काही दिवसात आलेल्या फुगवट्यामुळे सर्वसामान्य माणसाचा जीव गुदमरतो आहे. कारण त्याला या लाटेत तग धरण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. सामाजिक, सांस्कृतिक बदलापासून तो दूर फेकला जातो आहे. त्याचे दैनंदिन जीवन असह्य होत चालले आहे. वाईट याचे वाटते की त्याची करणे माहित असूनही हे कळणारी माणसे मूग गिळून गप्प आहेत. पुण्यातील शहर बससेवेचे दर सुट्या पैशांअभावी बदलावे लागणे ही सामान्य प्रवाश्यांना दिलासा देणारी घटना आहे खरी मात्र सर्व भारतीयांची हतबलता व्यक्त करणारी आहे.