Sunday, May 5, 2013

सर्वच गावांना बारामती, येवल्याचे भाग्य लाभू दे !

येवल्यात आज ज्या पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरु आहे, तो वेग लक्षात घेता येत्या वर्षभरात येवल्याचे रुप पालटून जाईल. एखादा दूर्लक्षित तालुका असा उभा राहू शकतो, याचे ते एक आदर्श उदाहरण ठरेल. राजकीय इच्छाशक्ती या देशात काम करायला लागली तर काय काय होऊ शकते, याचा अचंबित करणारा एक सुखद अनुभव येवल्यात येतो आहे.


पाच वर्षांपूर्वी एका व्याख्यानानिमित्त मी बारामती पाहिले आणि मला फार आश्चर्य वाटले. पालिका, न्यायालय, क्रीडांगणे, शिक्षणसंस्था, रस्ते, कारखाने या सर्वच बाबतीत ते शहर इतर शहरांपेक्षा उजवे होते. साधारण लाखभर लोकसंख्या असलेले हे शहर अजून जिल्ह्याचे ठिकाण नाही. ते एक तालुका मुख्यालय आहे. गेली चार दशके सत्तेत असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या बारामतीला हे भाग्य त्यांच्यामुळेच लाभले आहे. आपला मतदार असलेल्या बारामती भागात पवारांनी विकासगंगा आणली आहे. बारामतीत जे होऊ शकते ते इतर शहरांत का होऊ शकत नाही, असे प्रश्न विचारले जातात, मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. विविध मंत्रीपदावर असताना शरद पवारांनी बारामतीच्या विकासावर खास लक्ष ठेवले आणि जेथे अडचणी आल्या तेथे आपले माप बारामतीच्या तराजूत टाकले.
जी गोष्ट बारामतीची तीच काही प्रमाणात लातूरची. एकेकाळी लातूर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुका. पुढे लातूर जिल्हा मुख्यालय तर झालेच मात्र विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वामुळे त्या शहराचा मोठा विकास झाला. केवळ व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूरमध्ये एमआयडीसी झाली, ते एक शैक्षणिक केंद्र झाले. एवढेच नव्हे तर ज्या भागात कधी रेल्वे येण्याची शक्यता नाही, असे मानले जात होते तेथे सर्व अडचणींवर मात करून रेल्वेही आली. लातूरकर थेट मुंबईला जाऊ लागले. गेल्या काही वर्षांत लातूरने एका मोठ्या शहराचे बाळसे धरले. महापालिका तर झालीच पण मोठ्या शहरांची गरज असते तसा शहराच्या मधोमध उड्डाणपूलही झाला. आता विलासरावांनंतर लातूरच्या विकासाचे काय होणार असे बोलले जाऊ लागले आहे.
राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर विकसित झालेली अशी आणखी काही शहरे महाराष्ट्रात आहेत. त्यात आता एकेकाळी दुष्काळी मानल्या गेलेल्या येवला तालुक्याची भर पडली आहे. गेल्या आठवड्यात हे नवे येवला बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पाहायला मिळाले. ३५ ते ४० हजार लोकसंख्येचे हे शहर जणू कात टाकते आहे. रस्ते, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह, झाडी, सरकारी कार्यालये, स्मारके अशा सर्वच बाबतीत येवल्यात आमुलाग्र बदल पाहायला मिळतो आहे. येवला कोठून कोठे चालले आहे, हे समजण्यासाठी भुजबळ यांनी सांगितलेला एक प्रसंग असा: शरद पवार हे भुजबळांना सारखा एक प्रश्न विचारीत. तो म्हणजे येवल्याला पाऊस पडला काय? भुजबळांना या प्रश्नाचे त्यावेळी आश्चर्य वाटत असे. मात्र पवारांनी त्यांना सांगितले की येवल्यात पाऊस पडला हे महत्वाचे यासाठी की येवल्यात पाऊस पडला म्हणजे सर्व महाराष्ट्रात तो पडला, असे आम्ही मानतो. ते खरे असल्याचा अनुभव भुजबळांनी गेल्या काही वर्षांत घेतला आहे. कदाचित त्यामुळेच येवला शहर आणि तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा संकल्प भुजबळ यांनी केला आहे. आमदारनिधीची सर्व रक्कम आपण बंधाऱ्यासाठी वापरली आहे, असे भुजबळ आवर्जून सांगतात. हा निधी समाजमंदिर, गावाची वेस, मंदिर- मशिदीचे काम आणि बसथांबा यासाठी वापरण्याचा मोह ते टाळू शकले, हे विशेष.
येवल्यात आज ज्या पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरु आहे, तो वेग लक्षात घेता येत्या वर्षभरात येवल्याचे रुप पालटून जाईल. एखादा दूर्लक्षित तालुका असा उभा राहू शकतो, याचे ते एक उदाहरण होईल. तुम्ही नांदगावच्या दिशेने या, नाशिक, शिर्डी-कोपरगाव, मनमाड किंवा वैजापूरच्या दिशेने या. येवल्याकडे येताना चांगलाच फरक जाणवतो. नजर जाईल तोपर्यंत माळराने पाहायची असल्यास येवला नांदगाव असा प्रवास जरूर करून पहिला पाहिजे. मात्र त्या माळरानांतून जाणारा गुळगुळीत रस्ता आपले लक्ष वेधून घेतो. येवल्यात सर्वत्र दिसणारी तरुण झाडे येथे जाणीवपूर्वक वृक्षारोपण झाल्याचे सांगून जातात. कौलारू टुमदार सरकारी कार्यालयांसमोरची हिरवळ लक्ष वेधून घेते. विहिरींमधील गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे दिसते. रोजगार वाढल्याने बाजारपेठेत चहलपहल दिसते. राजकीय इच्छाशक्ती या देशात काम करायला लागली तर काय काय होऊ शकते, याचा अचंबित करणारा एक सुखद अनुभव येतो.
अर्थात एखाद्या माणसाने खिसे उलटे करून दाखवावेत, तसे आज सरकार तिजोरी उलटी करून आपल्याकडे पैसे नसल्याचे वारंवार सांगते आहे. त्या पार्श्वभूमीवर येवल्यालाही झुकते माप मिळालेच असणार. मात्र ते माप तर बारामती, लातूर आणि अशा अनेक शहरांनाही मिळालेच आहे. निधीचा हा मुद्दा थोडा बाजूला ठेवला तरी येवल्यात काही वेगळे घडते आहे, एवढे नक्की! अशा खास गावांना मिळालेले भाग्य सर्वच गावांना लवकर मिळू दे !येवल्यातील काही विकासकामे
१. अंगणगाव येथे पैठणी क्लस्टर, ट्राफिक पार्क आणि ग्रामीण पर्यटन केंद्राचे बांधकाम
२. येवल्यात ७५० आसनव्यवस्था असलेले वातानुकूलित नाट्यगृह
३. बाभूळगाव येथे आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळेचे काम
४. ३८ गावांसाठी असलेली आणि यशस्वी ठरलेली राज्यातील एकमेव पाणीपुरवठा योजना
५. जुन्या दगडी इमारतीचा वापर करून अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाची नवी इमारत
६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे (स्तूप) बांधकाम
७. शहरात सात ठिकाणी सुलभ शौचालये
८. सर्व सोयींनी युक्त असे तालुका क्रीडा संकुल
९. १७ एकर जागेत तालुका सचिवालय – जेथे सर्व शासकीय कार्यालये आहेत.
१०. नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधून येवला तालुक्यात पाणी आणणारा मांजरपाडा प्रकल्प