Saturday, November 9, 2019

सोशल मिडीयावरील साथीच्या रोगांपासून सावधान !





साथीच्या रोगांचा प्रसार रोखताना जशी आपण आपली आणि आपल्या माणसांची काळजी घेतो आणि समाजातून ती साथ लवकर जावी, अशी प्रार्थना करतो, तशीच भूमिका सोशल मिडीयावरून येणारी ‘रोगराई’ रोखण्यासाठी असली पाहिजे. सत्तासंपत्तीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तंत्रज्ञानाधारित कंपन्यांना जग टाळू शकत नाही, मात्र त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.




जगात डूम्सडे क्लॉक नावाचे एक प्रतीकात्मक घडयाळ आहे. संपूर्ण मानवी विनाशाच्या आपण किती जवळ येऊन पोचलो आहोत, हे ते घड्याळ दर्शविते. नोबेल पुरस्कार विजेते आणि जगातील काही जबाबदार नागरिक त्याची वेळ ठरवीत असल्याने त्याला महत्व आहे. या घड्याळात रात्री १२ वाजले तर संपूर्ण मानवी विनाश जवळ आला आहे, असे मानले जाते. युद्धखोरीमुळे वाढलेली अण्वस्त्रे, हवामान बदल, नव-नवीन राक्षसी तंत्रज्ञान या सर्वांमुळे येत असलेल्या जगाच्या विनाशतेचे डूम्सडे क्लॉक हे आज, सर्व सुजाण नागरिकांनी दखल घेतलेले निदर्शक बनले आहे.

अण्वस्त्रे व हवामानातील बदल हे दोन धोके आता पर्यंत गंभीर मानले जात होते आणि त्यामुळे त्यासंदर्भात होत असलेल्या जागतिक घडामोडींची या घड्याळाची वेळ ठरविताना दखल घेतली जात होती. पण त्यात आता नव्या आव्हानांची भर पडली आहे. त्यातील एक आव्हान आहे, ते जगभरातील लोकशाही व्यवस्था दुर्बल करणाऱ्या माहिती युद्धाच्या अधिकाधिक वापराची. विशेषतः सोशल मेडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या माहिताचा जगात प्रसार होतो आहे, त्यातून नागरिकांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण होत असून काय खरे आणि काय खोटे, हे कळण्यास मार्ग राहिला नाही, अशी अनेकांची अवस्था झाली आहे. ज्यांना या माहितीयुद्धाचा अति त्रास होऊ लागला, असे नागरिक सोशल मिडियाला काही दिवस सुटी देण्याचा निर्णय घेतात आणि काही दिवसांतच पुन्हा त्यावर रुजू होतात. याचा अर्थ सोशल मिडीयाला आता तुम्ही टाळू शकत नाही, असाच आहे.

सोशल मिडीयावर सर्व भारतीय नागरिक एकाच वेळी येवू शकत नाहीत. कारण त्यापैकी अनेकांकडे त्यासाठीची सुविधाच नाही. तर काही जण इतके सक्रीय आहेत की त्यांना त्याशिवाय काही काम आहे की नाही, असा प्रश्न पडतो. एक खरे आहे, ते म्हणजे ज्याला त्यावर येण्याची संधी मिळाली, तो तो सोशल मीडियाशी जोडला गेला आहे. आज त्या मिडियामुळे अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा प्रसार सह्जपणे होतो आहे, त्यावर काही चळवळीही जन्म घेत आहेत आणि सरकारच्या विरोधात जनमत संघटीत करण्याची क्षमताही त्यात आहे. मात्र ती दुधारी तलवार आहे, याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, सोशल मिडियामुळे भारतात होणारे परिणाम, हे एकवेळ समजण्यासारखे आहेत, पण प्रगत जगाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ऑस्ट्रेलियात फेसबुकला जो निर्णय घ्यावा लागला, तो सोशल मिडीयाचा समाजावर किती खोलवर परिणाम होतो आहे, याचे निदर्शक आहे. फेसबुकच्या पोस्टवर किती लाईक पडले किंवा नाही पडले, यातून जी मानसिक आंदोलने जन्म घेत आहेत, त्याचे विपरीत परिणाम पाहता, ते हटविण्याचा निर्णय फेसबुक कंपनीला नुकताच घ्यावा लागला. फेसबुकचा भाऊ असलेल्या आणि प्रामुख्याने तरुणांत प्रिय असलेल्या इन्स्टाग्रामलाही हा प्रयोग काही देशांत करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियासह ब्राझील, जपान, न्यूझीलंड, आर्यलंड, इटली, आणि कॅनडा या देशांत एक प्रयोग म्हणून इन्स्टाग्रामवरील लाईक हटविण्यात आले होते. त्यामुळे त्यावरील मजकूर आणि चित्रांचा दर्जा सुधारला, असे फेसबुकचे म्हणणे आहे. ज्या सोशल मिडीयाचा वापर माहिती आणि आनंद वाढविण्यासाठी होईल, असे वाटले होते, त्याच्यावर अशी वेळ यावी, हे विचित्र आहे. अर्थात, माहिती आणि मत प्रसारणाचा वाढलेला प्रचंड वेग माणसाला झेपेनासा झाला आहे, हे यातून पुढे येते आहे, ही चांगली बाब आहे. माणसांवर होणाऱ्या विपरीत परिणामांची दखल अशा कंपनीला घ्यावी लागते, हा चांगला प्रघात यातून पुढे आला आहे. अर्थात, फेसबुक ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून तिचा विस्तारच मुळी अर्थकारणातून झाला आहे. त्यामुळे फेसबुकचा वापर किती वेगाने होईल, यावर त्या कंपनीचे लक्ष असते. त्यातून होणाऱ्या मानवी नुकसानाकडे नव्हे.

फेसबुकचे निर्माते मार्क झुबेनबर्ग यांनी आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांची एक ‘गुप्त’ बैठक जुलैमध्ये घेतली आणि कंपनीसमोर उभ्या राहात असलेल्या आव्हानांची चर्चा केल्याची एक बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्या बैठकीत काय चर्चा झाली, याचा एक व्हिडीओ लिक झाल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सोशल मिडीयाचा डोळा फेसबुकच्या गुप्त दालनांतही पोचला, असा होतो! फेसबुकला टक्कर देत असलेले चीनी अॅप टिक टॉकशी कसे दोन हात करायचे, अमेरिकी किंवा इतर कुठल्या सरकारने फेसबुकच्या विरोधात भूमिका घेतल्यास काय करायचे, फेसबुकच्या लिब्रा या चलनाला अध्यक्ष ट्रम यांनी विरोध केला आहे, तो कसा मोडून काढायचा, फेसबुकवर आपलेच (झुबेनबर्गचे) नियंत्रण का आवश्यक आहे, वादग्रस्त मजकूर आणि इतर आशयाचे काय करावयाचे, अशा काही नाजूक बाबींची चर्चा झुबेनबर्गने केली, असे या व्हिडीओवरून लक्षात येते. यावरून सोशल मिडियाचे नियंत्रण करणाऱ्या कंपन्यांचे महत्व तर लक्षात येतेच पण या राक्षसांमध्ये युद्ध पेटले तर जग कसे त्यात भरडून निघेल, याची चुणूकही पाहायला मिळते.

आपल्या देशातील ताजे उदाहरण पहा. रिझर्व बँकेने पीएमसी बँकेवर काही गंभीर बाबीमुळे कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर या बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास समजून घेतला पाहिजे. पण भारतातील बँकिंग व्यवस्थेवर सोशल मिडीयावर जी चर्चा सुरु झाली, त्यामुळे बँकिंग व्यवस्थेविषयी नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यासंबंधी अफवा सुरु झाल्या आणि भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत आहे, तिला काहीही धोका नाही, असा खुलासा रिझर्व बँकेला करावा लागला. काही बँकाच्या संदर्भात अशीच मोहीम काही नागरिकांनी सोशल चालविल्यामुळे त्या बँकांवर जाहीर खुलाशाची वेळ आल्याच्या घटना आपणास आठवत असतीलच.

गणपती दूध पितो, अशी अफवा म्हणता म्हणता देशभर पसरली आणि गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लागल्या, ही सोशल मिडिया येण्याच्या कितीतरी आधीची अफवा. पण तशी ती एखादीच घटना होती. पण आर्थिक आणि राजकीय स्वरूपाची अशी दुषित माहिती जर आज जगात वेगाने पसरू लागली तर काय होईल, याची नुसती कल्पना करून पहा. सर्वसत्ताधारी सरकारवर वचक बसण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे प्रभावी साधन म्हणून सोशल मिडियाचे स्वागत करावयाचे की न पेलवणारी मानसिक आंदोलने निर्माण करणारे साधन म्हणून त्यावर निर्बंध असले पाहिजे, यावर आज जगात एकमत होऊ शकत नाही. शिवाय ते सत्तासंपत्तीच्या केंद्रीकरणाचे साधन होऊ लागल्याने तसे निर्बंध येण्याची शक्यता नाही.

डूम्सडे क्लॉकसाठी जसे काही जागरूक नागरिक एकत्र आले, तसे या संकटासाठीही सुजाण नागरिकांना एकत्र यावे लागेल. पण तोपर्यंत आपण थांबता कामा नये. ते सुजाण नागरीक आपणच आहोत, असे मानून अशा फॉरवर्डला तर आपण आपल्यापुरते रोखू शकतो. साथीच्या रोगांचा प्रसार रोखताना जशी आपण आपली आणि आपल्या माणसांची काळजी घेतो तसेच समाजातून ती साथ लवकर जावी, अशी प्रार्थना करतो, तशीच भूमिका ही रोगराई रोखण्यासाठी असली पाहिजे. कारण त्यातच सर्वांचे हित आहे.

No comments:

Post a Comment